"झाडाला हसता आले असते तर...", केरळ उच्च न्यायालयाचा शेजाऱ्यांमधील वादावर उपरोधिक निकाल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 50 m ago
नारळाच्या झाडावरून शेजाऱ्यांमधील वाद; केरळ उच्च न्यायालयाने निकालात वापरले विनोदी अन्वेषण
नारळाच्या झाडावरून शेजाऱ्यांमधील वाद; केरळ उच्च न्यायालयाने निकालात वापरले विनोदी अन्वेषण

 

कोची

नारळाच्या एका साध्या झाडावरून शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद केरळ उच्च न्यायालयात पोहोचला होता. या प्रकरणावर निकाल देताना केरळ उच्च न्यायालयाने अत्यंत विनोदी आणि भावूक टिप्पणी केली आहे. जर नारळाच्या झाडाला हसता आले असते, तर ते या वादात गुंतलेल्या शेजाऱ्यांना पाहून नक्कीच हसले असते, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले आहे.

झाडाचे कायदेशीर पेच

थिरुवनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम गावात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये हा वाद होता. एका शेजाऱ्याच्या घराजवळील नारळाचे झाड धोकादायक असल्याचे सांगत याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी या खटल्याचे वर्णन 'निरर्थक वादातून उद्भवलेली अनावश्यक याचिका' असे केले आहे. जो वाद चहा किंवा कॉफी पिताना सहज मिटवता आला असता, त्याचे रूपांतर संपूर्ण कायदेशीर लढाईत झाले, असेही न्यायालयाने म्हटले.

बायबलचा आधार घेत आवाहन

केरळ पंचायत राज कायद्यांतर्गत झाडापासून धोका नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. तरीही याचिकाकर्त्याने आपला वाद सुरूच ठेवला. निकाल देताना न्यायमूर्तींनी बायबलमधील 'मॅथ्यू २२:३९' या श्लोकाचा हवाला दिला, ज्याचा अर्थ 'आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखेच प्रेम करा' असा होतो. दोन्ही शेजाऱ्यांनी एकत्रित बसून हा वाद चर्चेतून सोडवावा आणि एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहन न्यायालयाने केले.

अनेक सरकारी यंत्रणा आणि वकिलांमार्फत या झाडाची पाहणी झाली होती. झाड पडण्याचा कोणताही धोका नाही आणि सुरक्षेसाठी जाळीही बसवण्यात आली आहे, असे अहवालातून स्पष्ट झाले होते. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल दोन्ही पक्षांना दंड आकारण्याऐवजी, न्यायालयाने त्यांच्यातील सुसंवाद वाढावा अशी अपेक्षा व्यक्त करत हा वाद संपवला. शेजाऱ्यांचे एकमेकांशी असलेले नाते संकटकाळात सर्वात जास्त महत्त्वाचे असते, ही जाणीव न्यायालयाने करून दिली आहे.