व्यसनमुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारा महिना

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

हजरत महंमद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना करण्यापूर्वी अरबस्तानची परिस्थिती फार वाईट होती. लोकांना जुगाराचे जबरदस्त व्यसन होते. सर्वांत मोठे न सुटणारे व्यसन म्हणजे दारू पिणे. पवित्र कुरआनमध्ये (२:२१९, ५:९०) दारू पिणे हे निषिद्ध मानले गेले आहे. पवित्र कुरआनच्या आज्ञेनुसार दारू पिणे पाप समजले जाते. आज काल सुधारणांचे वारे मुस्लीम राष्ट्रासही लागले असताना ही राष्ट्रे दारूपासून अलिप्त आहेत. पवित्र कुरआनमधील दिव्य आज्ञा किती जीवन उपयोगी आहे व कुरआन म्हणजे कसा जीवनग्रंथ आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. फक्त गरज आहे, इस्लामच्या अनुयायांनी/मुस्लिमांनी या आज्ञेवर प्रत्यक्ष अंमल करावयास हवा.

रमजानच्या पवित्र महिन्याचा केवळ मुस्लिमच नाही, तर मुस्लिमेत्तर बांधवदेखील अत्यंत आदर करतात. आपल्या मुस्लिम नोकरवर्गाला उपवास सोडण्यासाठी लवकर सुट्टी देतात. त्यांना तहान लागू नये म्हणून कमी श्रमाचे काम देतात. एवढेच नव्हे तर काही मुस्लिमेत्तर बांधव अथवा संघटना उपवास सोडताना (इफ्तारी) उपवासधारकांचे अभिनंदन करून त्यांना उपवास सोडतेवेळी फराळ अथवा मेजवानी देतात. विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेच्यावतीने कोथरूड, पिंपळेगुरव येथील जामा मशिदीत इफ्तारी देण्याची दरवर्षांची प्रथा आहे. त्यामुळे प्रत्येक मशिदीत हिंदू-मुस्लिमांमध्ये सौहार्दाचे व खेळीमेळीचे वातावरण तयार होण्यास मदत होते. विविधतेतून एकता या आमच्या भारतीय संस्कृतीचे यातून सुंदर दर्शन होते.

माझे अनेक हिंदू मित्र आहेत, जे रमजानचे उपवास अत्यंत श्रद्धेने करतात. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे रमजानचे तीसही उपवास अत्यंत श्रद्धेने व नित्याने करतात. काय महान आहे आमचा भारत देश! आम्हाला आमच्या देशाचा सतत अभिमान वाटला पाहिजे.

कोणत्याही व्यक्तीला एखादे व्यसन त्याच्या जन्मापासून जडलेले नसते. पण तो जसजसा मोठा होऊ लागतो, तसतसे त्याचे मित्र त्याला विडी, सिगारेट ओढायला शिकवतात. त्यामुळे आयुष्यात चांगली संगत फार महत्त्वाची आहे. व्‍यसनी माणूस जेव्‍हा रमजानचा उपवास करतो. अगदी विनम्रपणे अल्लाहचरणी उपवास धरतेवेळी सर्व पथ्ये कटाक्षाने पाळण्याची प्रतिज्ञा करतो, (त्याला सेहरीची दुआँ म्हणतात) तीच प्रतिज्ञा त्या माणसाच्या तीव्र तलफेच्या वेळी (तलब) त्याच्या बाजूने उभी राहते आणि माझा ईश्वर मला पाहतोय! मी ईश्वराची आज्ञा कशी मोडू? या प्रखर शक्तीने त्याला त्रास होत नाही व तो माणूस व्यसनापासून मुक्त होऊ शकतो.

परंतु काही व्यसने लोकांना दिसत नाहीत. ती सर्व व्यसने माणसाच्या नेत्र, मेंदू व हृदयाला लागलेली असतात. मग रमजानचा उपवास केलेला हा माणूस परस्त्रीकडे मुद्दामहून पाहणार नाही. तो ईश्वराला लीन झालेला असतो. पवित्र रमजानच्या महिन्यातील हे तीस उपवास म्हणजे ‌‘व्यसनमुक्ती‌’चा एक अतिशय उपयुक्त कोर्सच म्हणावा लागेल. कारण उपवासाच्‍या माध्यमातून त्याला व्यसनमुक्तीची संजीवनी सापडलेली असते.
 
 
- एस एन पठाण 
लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु आहेत.
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter