दरवर्षी रक्षाबंधनला गुजरातच्या अहमदाबादमधील एका गजबजलेल्या बाजारपेठेत डोळ्यांना सुखावणारं एक दृष्य पाहायला मिळतं. मिल्लत नगरमध्ये असलेलं राखीचं रंगीबेरंगी दुकान एक वेगळीच कहाणी सांगतं. या दुकानाचा मालक राखी विक्रेता मोहम्मद इम्रान आपल्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हसतमुखाने सामोरं जातो. गेली अनेक वर्षं तो राखी विक्रीचा व्यवसाय करतोय, परंतु त्याची कहाणी फक्त व्यापारापुरती मर्यादित नाही. तर त्याच्या या कार्यातून धार्मिक सलोखा आणि माणुसकीचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.
इम्रानच्या दुकानात राख्या तयार करणाऱ्या महिला मुस्लीम आहेत आणि त्यांनी बनवलेल्या या राख्या हिंदू बांधवांच्या मनगटावर बांधल्या जातात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या या सणाला सौहार्दाचा अनोखा रंग चढलेला पाहायला मिळतो. इम्रानच्या दुकानातून अनेक वर्षांपासून राखी खरेदी करणाऱ्या मोनिका शाह माध्यमांशी बोलताना सांगतात की, "आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून इथेच राखी खरेदी करतो. इम्रान भाई आणि त्याच्या सहकारी महिलांनी बनवलेल्या राख्या रंग, आकार आणि डिझाईनच्या बाबतीत वैविध्यपूर्ण असतात."
त्या पुढे म्हणतात, "इथे आल्यावर मुस्लीम महिलांना राखी बनवताना पाहून खूप आनंद वाटतो. कारण आपला सण चांगला साजरा व्हावा यासाठी ते खूप मेहनत घेताना दिसतात. त्यामुळे याठिकाणी मला हिंदू-मुस्लीम एकच असल्याची अनुभूती मिळते. इम्रान भाईंचे हे कार्य खरोखरंच समाजाला एक सुंदर संदेश देणारं आहे."
इम्रानचा हा व्यवसाय म्हणजे केवळ उपजीविकेचं साधन नाही तर सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. राखीच्या धाग्यातून तो बंधुभावाचा संदेश समाजात पेरत आहे. त्याच्या दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक त्याच्यासाठी ईश्वरासमान आहे. इम्रान सर्वांकडे माणुसकीच्या नजरेने पाहतो, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो. माध्यमांशी बोलताना मोहम्मद इम्रान आपल्या व्यवसायाविषयी सांगतो की, "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करतोय. इथे वर्षभर राखी बनवण्याचे काम सुरू असते. रक्षाबंधनाच्या चार महिने आधीच आमचा होलसेलचा धंदा सुरु होतो."
तो पुढे म्हणतो की, "आमच्याकडे राखी बनवणारे सर्वच मुस्लीम नाही तर त्यात हिंदू बांधवांचा देखील समावेश आहे. आमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक हा आनंदी होऊन समाधानाने दुकानाच्या बाहेर पडतो. आपल्या देशातील कौमी एकता अशीच राहावी हीच माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे."