'दीन और दुनिया' : डॉ. नजीब जंग यांनी उलगडले भारतीय मुस्लिमांच्या प्रगतीचे सूत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
डावीकडून डावीकडून प्रसिद्ध इतिहासकार साकिब सलीम आणि दिल्लीचे माजी नायब राज्यपाल आणि जामिया मिलिया इस्लामियाचे माजी कुलगुरू नजीब जंग
डावीकडून डावीकडून प्रसिद्ध इतिहासकार साकिब सलीम आणि दिल्लीचे माजी नायब राज्यपाल आणि जामिया मिलिया इस्लामियाचे माजी कुलगुरू नजीब जंग

 

'आवाज द व्हॉइस'ने आपला नवीन पॉडकास्ट कार्यक्रम 'दीन और दुनिया' सुरू केला असून, या मालिकेच्या पहिल्या भागाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पहिल्या भागात दिल्लीचे माजी नायब राज्यपाल आणि जामिया मिलिया इस्लामियाचे माजी कुलगुरू नजीब जंग यांनी पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. भारतीय मुस्लिमांची सद्यस्थिती, शेजारील देशांतील घडामोडींचे परिणाम आणि शिक्षण यांसारख्या गंभीर विषयांवर त्यांनी या भागात सविस्तर आणि सडेतोड भाष्य केले आहे.

शेजारील देशांतील हिंसेचा भारतीय मुस्लिमांशी संबंध नाही

बांगलादेश किंवा पाकिस्तानमध्ये होणाऱ्या जातीय हिंसेचा परिणाम भारतीय मुस्लिमांवर व्हायला हवा का, या प्रश्नाला उत्तर देताना नजीब जंग म्हणाले, "ही अत्यंत चुकीची बाब आहे की तिथे जे घडते त्याची प्रतिक्रिया येथील मुस्लिमांनी द्यावी. कोणत्याही प्रगल्भ समाजात याची गरज नसते. अल्पसंख्याकांवर होणारा अन्याय ही या उपखंडाची दुर्दैवी बाजू आहे. पण जेव्हा अन्याय होतो, तेव्हा केवळ मुस्लिमांनीच नाही, तर हिंदू, शीख आणि ख्रिश्चन अशा सर्वांनीच मानवतेच्या दृष्टीने त्याचा निषेध केला पाहिजे."

मुख्य प्रवाहाची व्याख्या चुकीची! 

मुस्लिम समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या चर्चेवर त्यांनी स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले, "नंबर वन, हा मुख्य प्रवाह म्हणजे नक्की काय आहे? आम्ही कधी मुख्य प्रवाहात नव्हतो? मी या देशाचा नागरिक आहे आणि मी नेहमीच मुख्य प्रवाहात होतो. ही 'मुख्य प्रवाहात आणणे' ही शब्दावलीच मला मान्य नाही." भारतीय मुस्लिमांच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी सुनावले की, "आजचा तरुण मुस्लिम जो भारतात जन्मला आहे, त्याला कोणत्याही न्यूनगंडाची गरज नाही. जर तसा तो असेल, तर ती त्याची स्वतःची उणीव आहे, दुसऱ्या कोणाची नाही."

सोशल मीडिया आणि इतिहासाचे विकृतीकरण

सोशल मीडियाला त्यांनी 'Necessary Evil’ असे संबोधले. ते म्हणाले, "सोशल मीडिया हे एक अतिशय धोकादायक माध्यम आहे, जिथे कोणालाही काहीही लिहिण्याचे स्वातंत्र्य मिळते. यामुळेच चुकीचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचण्याची भीती आहे. जर आपल्याला विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर इतिहासाची पाने उलटून जुने वाद उकरून काढण्यापेक्षा नवीन भारताची कल्पना मांडली पाहिजे." त्यांनी शिक्षणावर भर देताना सांगितले की, केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नाही, तर खरे ज्ञान हे तत्वज्ञानातून येते, जे आजच्या शिक्षण पद्धतीत मागे पडत आहे.

मुस्लिम समाज आणि प्रगतीची नवी दिशा

भारतीय मुस्लिमांच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, "आजचा मुस्लिम समाज स्वतःच्या हिमतीवर उभा राहायला शिकत आहे. तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि इतर कारागीर हे बहुसंख्येने मुस्लिम आहेत. ते आता कष्ट करून आपल्या मुलांना चांगल्या शाळा-कॉलेजांत पाठवत आहेत. हे एक मोठे सामाजिक परिवर्तन आहे, ज्याला वेळ लागेल पण त्याचे परिणाम नक्कीच दिसतील."

दीन आणि दुनियाचा समतोल

कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी 'दीन' (धर्म) आणि 'दुनिया' (जग) यांच्यातील संबंधावर आपले मत मांडले. ते म्हणाले, "दीन हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टींची गल्लत करता, तेव्हा जातीयवाद निर्माण होतो. तुम्ही नमाज वाचता की नाही, यापेक्षा तुम्ही एक चांगले माणूस आहात का, हे महत्त्वाचे आहे. कोणताही धर्म दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही, सर्व रस्ते एकाच ध्येयाकडे जातात, हे समाजाने जितक्या लवकर स्वीकारले तितके चांगले."

'आवाज द व्हॉइस'चा हा नवीन उपक्रम केवळ माहिती देणारा नसून, समाजात चालणाऱ्या गैरसमजांना सडेतोड उत्तर देणारा एक भक्कम वैचारिक मंच ठरत आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter