भारतात २१ मार्च रोजी साजरी होणार ईद-उल-फित्र; शव्वालचा चंद्र न दिसल्याने ३० रोजे पूर्ण होणार!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतात गुरुवारी शव्वाल महिन्याचा चंद्र दिसला नाही. त्यामुळे आता देशभरात २१ मार्च रोजी ईद-उल-फित्र साजरी केली जाणार आहे. लखनौ ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी चंद्र दिसला नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याचाच अर्थ रमझानचा पवित्र महिना ३० दिवसांचा असेल. "आज शव्वाल महिन्याचा चंद्र दिसला नाही. उद्या ३० वा रोजा पाळला जाईल आणि शनिवार, २१ मार्च रोजी ईद-उल-फित्र साजरी होईल," असे त्यांनी सांगितले. लखनौ ईदगाहमध्ये सकाळी १० वाजता ईदची नमाज अदा केली जाईल आणि त्यानंतर जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

ऑल जम्मू आणि काश्मीर शिया असोसिएशनने देखील चंद्र दिसला नसल्याचे स्पष्ट केले आहे. काश्मीरमधील ढगाळ वातावरण आणि देशाच्या इतर भागांतून खात्रीशीर पुरावे न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला. "ढगाळ हवामानामुळे चंद्र दर्शन झाले नाही. परिणामी, शनिवार, २१ मार्च रोजी ईद साजरी होईल," असे असोसिएशनने म्हटले आहे.

इस्लामिक कॅलेंडरमधील नववा महिना असलेला रमझान हा मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. याच महिन्यात कुराणचे अवतरण झाले होते. ईदचा सण उपवासाची सांगता करतो. या दिवशी कुटुंबे एकत्र येऊन प्रार्थना करतात, मेजवानीचा आनंद घेतात आणि दानधर्म करतात.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत, ओमान आणि मलेशियासह अनेक देशांच्या नेत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिथे शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

मात्र, सध्याच्या भूराजकीय परिस्थितीचा परिणाम भारतातील काही भागांतील उत्सवावर झाला आहे. इराणमधील घडामोडींमुळे राजस्थानमधील शिया समुदायाने यंदा ईद साजरी न करण्याचा आणि शोक पाळण्याचा निर्णय घेतला आहे. जयपूरच्या शिया जामा मशिदीचे इमाम सय्यद नाझिश अकबर काझमी यांनी सांगितले की, समुदायातील सदस्य नमाज पठण करतील, परंतु नवीन कपडे घालणे किंवा शुभेच्छांची देवाणघेवाण करणे टाळतील. जागतिक स्तरावर, काही प्रदेशांमध्ये स्थानिक चंद्र दर्शनानुसार २० मार्च रोजी देखील ईद साजरी होऊ शकते.