ओडिसामधील बालेश्वरच्या जुन्या ट्रंक रोडवर एक विलक्षण दृश्य पाहायला मिळाले. डोक्यावर उघडे आकाश आणि समोर डांबरी रस्ता... तिथे बसलेली बारीपाडा येथील चांदनी खातून ही मुस्लिम तरुणी पूर्ण एकाग्रतेने तांदळाच्या पांढऱ्या पेस्टमध्ये बोटे बुडवून आपली कला सादर करत होती. पाहता पाहता तिच्या कलेतून साक्षात मां गजलक्ष्मी साकारली. कमळ, हत्ती आणि देवीची तेजस्वी मुद्रा... सर्व काही इतके रेखीव होते की, तिथून जाणाऱ्या प्रत्येकाची पावले थबकत होती.
पाहणाऱ्यांना कल्पनाही नव्हती की, इतकी सुंदर आणि शास्त्रशुद्ध ओडिया कलाकृती साकारणारी मुलगी धर्माने मुस्लिम आहे. हा क्षण केवळ कलात्मक कौशल्यापुरता मर्यादित नव्हता. यातून जातीय सलोख्याचा संदेश मिळत होता. संस्कृती अनेकदा धार्मिक ओळखीच्या पलीकडे असते, हेच यातून सिद्ध होत होते.
परंपरेचा पुनरुज्जीवन सोहळा
ओडिया संस्कृतीत 'झोटी' (तांदळाच्या पिठाने काढलेली रांगोळी/कला) ला मोठे महत्त्व आहे. विशेषतः मार्गशीर्ष महिन्यात आणि मकर संक्रांतीला देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराघरांत झोटी काढली जाते. मात्र आधुनिक काळात प्लास्टिक स्टिकर्समुळे ही कला मागे पडत चालली आहे. ही लुप्त होत चाललेली कला वाचवण्यासाठी 'उत्कलिया झोटी इन्स्टिट्यूट' ने एका स्पर्धेचे आयोजन केले होते. यात सुमारे एक किलोमीटरचा रस्ता शेकडो तरुणींच्या कलाकृतींनी सजला होता.
चांदनीच्या कलेचा सन्मान
या स्पर्धेतील चांदनी खातूनची कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या स्पर्धेत चांदनीने काढलेल्या गजलक्ष्मीच्या चित्राला पुरस्कार मिळाला. जिल्हा दंडाधिकारी सूर्यवंशी मयूर विकास यांच्या हस्ते तिला गौरवण्यात आले. आपल्या प्रवासाबद्दल सांगताना चांदनी म्हणाली, "मी कधीच माझ्या घरी झोटी काढली नाही. पण लहानपणी शेजाऱ्यांच्या घरी ही कला पाहून मला त्याचे आकर्षण वाटले. शाळेत आणि महाविद्यालयात असताना मी स्पर्धेत भाग घेऊ लागले आणि ही आवड वाढत गेली."
परंपरा जपणे ही सर्वांची जबाबदारी
पुरस्कार स्वीकारल्यानंतर चांदनीने दिलेला संदेश आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, "झोटी कला जिवंत ठेवणे ही कोण्या एका धर्माची मक्तेदारी नाही. हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असो, परंपरा जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही धर्माच्या आधी आपण सर्व 'भारतीय' आहोत."
आयोजकांची भूमिका
महोत्सवाचे आयोजक शिल्पी केशू दास यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, "राजस्थानची रांगोळी आणि केरळचे कुमकुम जगभर प्रसिद्ध आहे, तशीच ओळख ओडिया 'झोटी'ला मिळवून देण्यासाठी ही चळवळ आहे." तर उत्कल झोटी फाउंडेशनच्या अर्चना नंदी यांनी सांगितले की, "घरातून हद्दपार होत चाललेली ही कला पुन्हा रुजवण्यासाठी हा प्रयत्न आहे."
रस्त्यावर तांदळाच्या पेस्टने काढलेली ती कलाकृती कदाचित काळाच्या ओघात पुसली जाईल. परंतु चांदनी खातूनने आपल्या कलेतून दिलेला एकतेचा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश लोकांच्या मनात कायमचे घर करून राहील.