गणेश मंडळाद्वारे मुस्लिम, ख्रिस्तीधर्मीय विणतात माणुसकीचा धागा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
श्री श्रीराम मंदिराचे अध्यक्ष आसिफ शेख व श्रीकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष लॉरेन्स फ्रान्सिस फर्नांडिस
श्री श्रीराम मंदिराचे अध्यक्ष आसिफ शेख व श्रीकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष लॉरेन्स फ्रान्सिस फर्नांडिस

 

ते मुस्लिम आहे, ते ख्रिश्‍चन आहे, ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत. पण ते गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आहेत. ते मंडळाद्वारे गोरगरीबांना फक्त अन्नदान, कपडे वाटपच करीत नाहीत तर बेरोजगारांच्या हाताला रोजगार देतात. या सगळ्यांपेक्षा ते एक काम करतात, ते काम असतं माणसाला जातीधर्माच्या नव्हे, तर माणुसकीच्या धाग्यात विणण्याचे! या नात्याला नेमके काय म्हणायचे, असा प्रश्‍न जेव्हा पडतो तेव्हा नटसम्राट चित्रपटातील ‘नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही’... या गीताची आठवण नक्की येते.
- पांडुरंग सरोदे 

मुस्लिम धर्माचे अनोखे नाते!
महात्मा फुले मंडई परिसरात सर्वधर्मीय नागरिक राहतात. तांबोळी, आत्तार, नालबंद अशी मुस्लिम धर्मीय कुटुंब मंडळाच्या कार्यात सक्रिय असतात. विशेषतः गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी श्रींच्या आरतीचा मान मुस्लिम धर्मीयांना आहे. ही आजची नव्हे, तर तब्बल १२९ वर्षांपासूनची परंपरा आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव व पवित्र रमजान सण एकत्र आल्यास मंडई मंडळात मुस्लिम धर्मीयांचा उपवास सोडण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर मंडळ ‘हिंदू-मुस्लिम एकता भाईचारा’ हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करतो, असे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले.

कोणताही धर्म माणुसकी शिकवतो
लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावरील राम मंदिरासमोर श्री श्रीराम मंदिर आहे. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी या मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा आसिफ शेख या मुस्लिम तरुणाच्या खांद्यावर आली. रमेश विचारे व सुरेश राजगे या ज्येष्ठांनी आसिफमधील प्रामाणिक कार्यकर्त्याला अध्यक्षपदी नेमले, त्यानुसार, मागील ११ वर्षांपासून आसिफ आपल्या मंडळात धार्मिक वसा पुढे नेण्याबरोबरच विधायक, सामाजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य देत आहे. एकीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा करतानाच, दुसरीकडे डेकोरेशन, मिरवणुकीवर पैसे खर्च करण्याऐवजी गरीब, भिक्षेकऱ्यांना अन्नदान, कपडे, ब्लॅंकेट, विकलांग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप करतात. त्यांनी मंडळामार्फत अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले. व्यवसायांना बळ दिले. अपघातामधील तरुणीला तत्काळ रुग्णालयात पोचवून तिला जीवदानही दिले. तसेच नैसर्गिक किंवा कोणत्याही संकटात नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम आसिफ, त्याच्या मंडळाचे कार्यकर्ते आजही करत आहेत. ‘‘कोणताही धर्म हा माणुसकी शिकवतो. गणेशोत्सव कार्यकर्ते कुठल्याही धर्माचे असले तरी समाजाला दिशा देण्याचे काम ते करतात,’’ असे आसिफ सांगतो.

जातीभेद, धर्मभेदाला थारा देत नाही
ख्रिस्ती धर्मीय लॉरेन्स फ्रान्सिस फर्नांडिस २०१८ मध्ये लष्कर परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष झाले. ते जानेवारी २०२३ पर्यंत अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. फर्नांडिस यांचे बालपण मंडळाच्या परिसरात गेले. कार्यकर्ता म्हणून त्यांनी मंडळात पडेल ते काम केले. विविध पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. दुबई, मस्कत येथे नोकरी करत असतानाही ते मंडळासाठी स्वतः येत होते. मंदिर उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी विधायक व सामाजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले. ‘‘गणेशोत्सव मंडळ जातीभेद, धर्मभेदाला थारा देत नाही. मंडळात सर्वधर्मीय कार्यकर्ते कायम एकोप्याने राहून, उत्साहाने उत्सव साजरा करतात. अप्रत्यक्षरीत्या ते भाईचारा टिकविण्याचेच काम करतात,’’ असे फर्नांडिस यांनी सांगितले.

हिंद तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून अक्रम शेख अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासह विविध धर्मीय कार्यकर्ते उत्सवासह वर्षभर सामाजिक कार्यात सक्रिय असतात. याच पद्धतीने अनेक मुस्लिम तरुण व अन्य धर्मांचे नागरिक गणेशोत्सव मंडळात सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते अध्यक्षपदापर्यंत विविध पदांद्वारे विधायकतेत भर टाकत आहेत.

(सौजन्य : दै. सकाळ)