नवरोज : धर्माच्या सीमारेषा ओलांडणारा सांस्कृतिक सण!

Story by  sameer shaikh | Published by  sameer shaikh • 1 Years ago
नवरोजच्या शुभेच्छा देणारे फारसी भाषेतले शुभेच्छापत्र
नवरोजच्या शुभेच्छा देणारे फारसी भाषेतले शुभेच्छापत्र

 

२१ मार्च या दिवसाचे भौगोलिक महत्त्व आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते. या दिवशीच सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो आणि त्यामुळे या दिवशी १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असते. मात्र या दिवसाचा विशेष इतकाच नाही. अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये या दिवसाला वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवसही मानला जातो. निसर्गाशी जोडला गेल्यामुळे विविध संस्कृती आणि धर्म यांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. मात्र आजचा दिवस सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ‘नवरोज’ (नवा दिवस) या नावाने. हा सण पारशी धर्मियांशी जोडून बघितला जात असला तरी अनेक मुस्लीम राष्ट्रांतही नवरोज राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. या सांस्कृतिक मिलाफाचा आढावा घेणारा हा विशेष लेख.   

साधारणपणे आजपासून तब्बल ३५०० वर्षांपूर्वी फारस (सध्याच्या इराण) येथे झोरास्टार नावाच्या प्रेषिताने जगातल्या सर्वांत जुन्या ‘झोरास्ट्रियन’ धर्माची स्थापना केली. इस्लामच्या आगमनानंतर या मंडळींनी तत्कालीन हिंद म्हणजे आजच्या भारत आणि पाकिस्तान येथे स्थलांतर केले. या फारसमधून आलेल्या झोरास्ट्रियन निर्वासितांना गुजराती भाषेत ‘पारसी’ म्हणत असत. त्यामुळे या धर्माच्या अनुयानांना भारतीय उपखंडात ‘पारसी’ असा शब्दप्रयोग रूढ झाला. 

सध्या आपण ग्रेगरियन कालगणना प्रमाण मानतो, वापरतो. ती सुरु होते येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून. मात्र त्यापूर्वी सव्वा हजार वर्षे आधी म्हणजे आजपासून ३००० वर्षांआधी फारसचा राजा जमशेदने पारसी कालगणना म्हणजे पारसी कॅलेंडर सुरु केले असे वर्णन इराणी महाकाव्य ‘शहनामा’मध्ये आढळते. वसंत ऋतूच्या आगमनाचा पहिला दिवस हाच या कॅलेंडरचा पहिला दिवस. त्याला फारसीमध्ये नवरुज म्हणजे नवा दिवस म्हटले जाऊ लागले. तेव्हापासून म्हणजे तीन हजार वर्षांपासून हा दिवस पारसी नववर्ष म्हणून साजरा केला जातो. 

या धर्माचे अनुयायी दोन कालगणना वापरतात. त्यापैकी फसली कालगणनेनुसार वसंत ऋतूच्या आगमनाची म्हणजे पारसी नववर्ष नवरोजची तारीख २१ मार्च ठरवण्यात आली आहे. भारतीय उपखंडातील बहुतांश पारसी मात्र शेहेनशाही कालगणना वापरतात. या कालगणनेत लीप वर्षे गृहीत धरले जात नसल्यामुळे यानुसार नवरोजची तारीख बदलत राहते. त्यामुळे जगभर हा सण २१ मार्चला साजरा होत असला तरी भारतात मात्र या सणाची तारीख बदलत राहते. २१ मार्चला जगभर साजरा होणाऱ्या नवरोजला आपल्याकडे ‘जमशेदी नवरोज’ म्हटले जाते. 

इस्लामी राजवटीतही साजरा केला जातो नवरोज 
झोरास्ट्रियन धर्माची मुळे इराणमध्ये आहेत. या सणाची मुळेही तिथेच आहेत. मात्र आता इराण हे इस्लामी राष्ट्र असल्यामुळे तिथे हा सण साजरा केला जात असेल का याविषयी अनेकांच्या मनात शंका असते. मात्र इराणच नव्हे तर अफगाणिस्तान, इराक आणि तुर्कीये यांसारख्या डझनभर इस्लामी राष्ट्रांमध्ये हा सण उत्साहाने साजरा केला जातो. कारण नवरोज हा सण धर्मामध्ये अडकून राहिला नाही. वसंत ऋतूशी असलेल्या संबंधामुळे तो निसर्गाशी जोडला गेला आणि त्याला वैश्विक परिमाण लाभले. आता तो या देशांतील तीस कोटीहून अधिक मुस्लीमांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला. 

इराणमध्ये बहुसंख्य शिया पंथीय मुस्लीम राहतात. या देशात १९७९ मध्ये इस्लामी धर्मक्रांती झाली. आयतुल्ला खोमेनी या सर्वोच्च धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर आधुनिक इराण पुन्हा धर्मवादी झाला. आता इराणमध्ये नवरोजवर गंडांतर येईल अशी शंका अनेकांना वाटली. पण या काळातही, आणि अगदी आजही नवरोज हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. वसंत ऋतूच्या आगमनाच्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण इस्लामच्या मूल्यांविरोधात नाही यावर तिथल्या मुस्लीम धर्मगुरुंचे एकमत आहे. 

शिया पंथीय मुस्लीम या दिवसाला ईद-ए-नवरोज असं म्हणतात. ईद म्हणजे आनंदाचा मुबारक दिवस. त्यांच्या मते, अल्लाहने ‘कून फाया कून’ म्हटले आणि पृथ्वीवर जीवसृष्टी अवतरली ती याच दिवशी. पृथ्वीवर पहिला माणूस - आदम- पाठवला आजच्या दिवशी. ज्यू प्रेषित मोजेस म्हणजे इस्लामी प्रेषित मुसा. त्याने तूर पर्वतावर ईश्वराशी संवाद साधला तो आजचाच दिवस होता. नोवा म्हणजे प्रेषित नूह प्रलयातून वाचला तो आजच. येशू ख्रिस्त म्हणजे इस्लामच्या दृष्टीने प्रेषित इसा. इस्लामी मान्यतेनुसार त्याला सुळावर टांगण्यात आले नव्हते, तर ईश्वराने त्याला सदेह आकाशात नेले. हा दिवसही २१ मार्चचाच होता असा एक समज आहे. 

इस्लामचे शेवटचे प्रेषित मोहम्मद यांना देवदूत जिब्राईल (बायबलमधील गॅब्राइल) करवी पहिला साक्षात्कार २१ मार्च ६१० रोजी झाला अशीही एक मान्यता आहे. पुढे घदीरच्या युद्धात प्रेषितांनी जमलेल्या लोकांना उद्देशून अलीविषयी (मोहम्मदांचा जावई आणि इस्लामचा चौथा खलिफा) ‘मन कुंतो मौला, फ हाझा अलीयून मौला’ (म्हणजे मी ज्यांचा मार्गदर्शक आहे, अलीसुद्धा त्यांचा मार्गदर्शक आहे) असे उद्गार काढले होते, ते आजच्याच दिवशी. त्यामुळे इस्लाममध्येही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, असं शिया पंथीय मानतात.  

पारशी नववर्षाचे ब्रीद ‘हमता, हकता आणि हवरठरा' म्हणजे ‘चांगले विचार, चांगल्या गोष्टी, चांगल्या शब्दासाठी सदैव लढा देणे’ असे आहे. या पारसी समाजात ‘नवरोज' पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी दोन पदार्थांना विशेष मान असतो. नाश्‍त्याला ‘रावो' अर्थात सूजी, दूध आणि साखर यांचे खास मिश्रण अर्थात त्यामध्ये शेवया ज्या साखरेच्या पाकामधून पाहुण्यांना आवर्जून दिले जाते. नाश्‍त्यानंतर सर्व कुटुंबे देवळाकडे धाव घेतात, ज्याला ‘अगियारी' म्हटले जाते. जेथे ‘जशन' पूजापाठ होते. धर्मगुरुद्वारा ईश्‍वराचे नामस्करण करत ‘संदल'चा धूप केला जातो. पारशी धर्माच्या रितीनुसार या ठिकाणी सर्व लहान-थोर पुरुष पारशी टोपी घालतात. स्त्रिया डोक्‍यावर वस्त्र अथवा साडीचा पदर घेतात. ‘जश्‍न'च्या कार्यक्रमानंतर प्रत्येक जण ‘साल-मुबारक'च्या संदेशाने एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करतात.

- समीर दि. शेख 
[email protected]