'द हार्ट ऑफ इस्लाम' पुस्तक म्हणजे मजहबाच्या नावावरील गैरसमजांना छेद देणारा फलसफी खयाल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
'द हार्ट ऑफ इस्लाम' हे पुस्तक आणि त्याचे लेखक सय्यद हुसेन नसर
'द हार्ट ऑफ इस्लाम' हे पुस्तक आणि त्याचे लेखक सय्यद हुसेन नसर

 

अमीर सुहैल वानी

सय्यद हुसेन नसर यांचं 'द हार्ट ऑफ इस्लाम' हे एक चिंतनशील पुस्तक आहे. सध्याच्या काळात इस्लामला केवळ सियासी बातम्यांपुरतं आणि चुकीच्या पद्धतीने मांडण्यापुरतंच मर्यादित ठेवलं जातंय. मात्र हे पुस्तक इस्लामची खरी रुहानी आणि इल्मी रूह पुनर्प्रस्थापित करण्याची कोशिश करतं. ९/११ च्या हल्ल्यानंतर हे पुस्तक लिहिलं गेलं. इस्लामची मांडणी त्याच्या स्वतःच्या मुकद्दस आणि फलसफी चौकटीतून करण्याचा हा एक इल्मी प्रयत्न आहे, असं म्हणावं लागेल.

नसर इस्लामविषयीचे गैसमज दूर करण्याची कोशिश करतातच. शिवाय ते वाचकांना एका महान रिवायतीशी पुन्हा जोडण्याचाही प्रयत्न करतात. विशेषतः पाश्चात्य वाचकांना ते एक नवा नजरिया देतात. कारण, आजवर या रिवायतीकडे कायम त्रयस्थाच्या नजरेतूनच पाहिलं गेलंय.

नसर हे इस्लामिक फलसफ्याचे आघाडीचे अभ्यासक आहेत. विविध मजहबी रिवायतींमधली रुहानी एकता स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण जिंदगी दिली आहे. त्यांची तालीम इराण आणि अमेरिकेत झाली. त्यांनी अनेक दशकं पाश्चात्य विद्यापीठांमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं. नसर यांनी आपल्या लेखनातून विविध तहजीबांना जोडणारा एक भक्कम पूल उभारण्याचं काम केलं. त्यांनी आंतरधर्मीय चर्चेला नेहमीच प्रोत्साहन दिलं. मुस्लिम-ख्रिश्चन चर्चेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पण म्हणजे त्यांची ही भूमिका संस्थात्मक सहभागापुरती मर्यादित राहिली असं नव्हे तर ती त्यांच्या कार्याचा मुख्य गाभा बनली.

त्यांच्या मते वरवरची सहिष्णुता म्हणजे खरी चर्चा नव्हे. विविध रिवायतींचं स्वरूप वेगळं असू शकतं. पण त्या सर्व रिवायती अंतिमतः सत्याकडेच नेतात, या समजुतीवर ही चर्चा आधारित असावी. त्यांच्या याच व्यापक नजरियामुळे, मौजूदा आंतरधर्मीय चर्चेमधला एक अत्यंत गंभीर आणि फलसफी आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

'द हार्ट ऑफ इस्लाम' हे पुस्तक इस्लामच्या मुख्य शिकवणींचा सखोल वेध घेतं. पुस्तकाची सुरुवात 'तौहीद' (ईश्वरीय एकता) या तत्त्वाने होते. नसर यांच्या मते, हाच इस्लामचा मुख्य कणा आहे. इस्लामिक जीवनाचे सर्व पैलू याच अक्षाभोवती फिरतात. या पायावर उभं राहून ते कानून, अखलाक, सामाजिक जिम्मेदारी आणि रुहानियत यांवर भाष्य करतात. हे सर्व पैलू एकमेकांपासून वेगळे नसून, ते एकाच व्यापक नजरियाचे परस्परांशी जोडलेले हिस्से आहेत, असं ते उदाहरणांसहित स्पष्ट करतात.

त्यांनी शरिया कायद्याचं केलेलं विश्लेषण विशेष लक्षवेधी आहे. ते शरियाला कोणतीही कठोर किंवा केवळ सजा देणारी व्यवस्था मानत नाहीत. उलट, माणसाला इन्साफ, तवाझुन आणि सुसंवादाकडे नेणारा तो एक अखलाकी आणि रुहानी रस्ता आहे, असं ते ठामपणे मांडतात.

या पुस्तकाचा एक मोठा हिस्सा इस्लामबद्दलच्या गैरसमजांवर भाष्य करतो. विशेषतः इस्लाम आणि हिंसाचार यांच्यातील कथित संबंधांवर यात सविस्तर चर्चा केली आहे. जिहादसारख्या संवेदनशील विषयाला नसर अत्यंत बारकाईने आणि ऐतिहासिक संदर्भांसह हाताळतात. ते जिहादचा अखलाकी आणि रुहानी अर्थ स्पष्ट करतात. त्याचबरोबर, आजच्या काळात या शब्दाचा कसा विपर्यास केला जातोय आणि त्याचा मूळ अर्थ काय, यातला फरकही ते दाखवून देतात.

ते कोणत्याही वादात अडकत नाहीत. त्याऐवजी ते प्रत्येक संकल्पनेची सुकूनने मांडणी करतात आणि याच चौकटीत या कल्पना समजून घेतल्या पाहिजेत, असा आग्रह धरतात. यामुळे वाचकांना धर्माची खरी तालीम आणि तिचा केला जाणारा विपर्यास, यातला फरक स्पष्टपणे समजतो.

नसर यांनी इस्लामच्या आंतरिक पैलूवर दिलेला भर तितकाच महत्त्वाचा आहे. सुफीवादातून हा पैलू सर्वाधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होतो. त्यांच्या मते, हाच रुहानी गाभा वैयक्तिक परिवर्तन आणि आंतरधर्मीय सुसंवादाची मुख्य गुरुकिल्ली आहे. मोहब्बत, खुदाचा जिक्र आणि रुहची पाकीजगी यांसारख्या वैश्विक विषयांवर ते प्रकाश टाकतात. याद्वारे ते इतर मजहबी रिवायतींशी इस्लामचं असलेलं साधर्म्य दाखवून देतात. याच आंतरिक पातळीवर खरी चर्चा शक्य होते, असं ते सुचवतात. हा नजरिया हिंदू-मुस्लिम भाईचाऱ्यासह व्यापक धार्मिक सुसंवादाच्या प्रयत्नांना मोठं बळ देणारा आहे. केवळ मतभेदांवरून लक्ष हटवून, हा विचार आपल्याला समान रुहानी ध्येयांकडे घेऊन जातो.

त्याच वेळी, नसर मुस्लिम दुनिया किंवा आधुनिक पाश्चात्य दुनियेचं कोणतंही उदात्तीकरण करत नाहीत. ते अत्यंत संतुलित टीका करतात. मुस्लिमांनी आपल्या रिवायतीतल्या अखलाकी आणि रुहानी शिकवणींशी इमानदार राहावं, असं आवाहन ते करतात. तसेच, आधुनिक समाजानेही स्वतःमधली अर्थहीनता आणि अखलाकी ऱ्हासाचा सामना करावा, असा सल्ला ते देतात. आधुनिकतेवरची त्यांची टीका पूर्णपणे फलसफी आहे. पवित्रतेचा लोप झाल्याने इंसानियत आणि विश्वाविषयीची समज कमी झाली आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. या अर्थाने 'द हार्ट ऑफ इस्लाम' हे पुस्तक इस्लामची मालूमात देण्याबरोबरच मौजूदा परिस्थितीवर भाष्य करणारं एक महत्त्वाचं पुस्तक ठरतं.

वाचकांचं मन वळवण्यासाठी नसर कोणत्याही अलंकारिक भाषेचा वापर करत नाहीत. तसेच, ते गुंतागुंतीच्या कल्पना अतिशय सोप्या करून सांगण्याच्या भानगडीतही पडत नाहीत. त्याऐवजी, ते वाचकांना एका जिवंत रिवायतीशी सखोलपणे जोडून घेण्याचं आवाहन करतात. या रिवायतीचा रुहानी आणि फलसफी पाया समजून घेतल्याशिवाय ती पूर्णपणे समजणं कठीण आहे. यामुळे हे पुस्तक काही वाचकांसाठी थोडं कठीण वाटू शकतं. पण याच कारणामुळे या पुस्तकाचं गांभीर्य आणि मूल्य अबाधित राहतं.

'द हार्ट ऑफ इस्लाम' हा एक इल्मी आणि अखलाकी वैचारिक हस्तक्षेप आहे. सय्यद हुसेन नसर यांनी मजहबी आणि तहजीबी सरहद्दी ओलांडून भाईचारा वाढवण्यासाठी आयुष्यभर कोशिश केली. हे किताब म्हणजे त्यांच्या त्याच प्रयत्नांचं फळ आहे. दोन मजहबांमधला फरक पुसून टाकण्यावर ते भर देत नाहीत.  त्या फरकांच्या तळाशी असलेल्या सखोल एकतेवर प्रकाश टाकतात. आजकाल मजहबाचा वापर अनेकदा अवाममध्ये फूट पाडण्यासाठी केला जातो. अशा वेळी, नसर यांचं हे काम आपल्याला एका अटळ सत्याची आठवण करून देतं. इंसानियतला सत्य, रहम आणि अंतिमतः एकतेकडे घेऊन जाणं, हाच मजहबाचा खरा मकसद आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter