Eid ul Azha Delhi : दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्थेत बकरी ईद साजरी!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
दिल्लीतील जामा मस्जिद
दिल्लीतील जामा मस्जिद

 

देशाची राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदचा सण अत्यंत शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संपूर्ण शहरात, विशेषतः संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भागांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. प्रमुख मस्जिदी, ईदगाह आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, दंगल नियंत्रण वाहने आणि क्विक रिएक्शन टीम (QRT) तैनात करण्यात आल्या होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संवेदनशील भागात पोलिसांचे कडक बंदोबस्त आणि गस्त
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य आणि उत्तर दिल्लीतील प्रमुख भागात पहाटेपासूनच विशेष सुरक्षा दले तैनात करण्यात आली होती. ईदच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांकडून कोणत्याही अफवा पसरू नयेत किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत, यासाठी सायबर पथके सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत लक्ष ठेवून आहेत. 

ईशान्य दिल्लीचे पोलीस उपायुक्त राहुल अलवाल यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या भागात सुमारे ११०० पोलीस कर्मचाऱ्यांसह केंद्रीय दलाच्या २३ अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.

शांतता कमिटीच्या बैठका आणि नागरिकांचे सहकार्य
पहाटे ५ वाजेपासूनच सर्व प्रमुख नमाज पठणाच्या ठिकाणांवर आणि मंदिरांच्या जवळील संवेदनशील पॉईंट्सवर पोलीस तैनात होते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ठिकठिकाणी पिकेट्स, क्विक रिएक्शन टीम आणि बाईक पेट्रोलींग सक्रिय करण्यात आले होते. गेल्या काही आठवड्यांपासून पोलीस सहाय्यक आयुक्त (ACP) आणि ठाणे अंमलदारांनी स्थानिक अमन कमिटी (शांतता समिती) आणि दोन्ही समुदायांच्या प्रमुखांसोबत सातत्याने बैठका घेतल्या होत्या, ज्यामुळे सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.

नियमांचे पालन आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज
उत्तर दिल्लीचे पोलीस उपायुक्त राजा बंथिया यांनी सांगितले की, सदर बाजार, ईदगाह, कुरेश नगर, कुतुब रोड आणि बारा हिंदू राव या भागात शांततापूर्ण वातावरणासाठी पोलिसांनी फ्लॅग मार्च काढले होते. बकरी ईदच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन व्हावे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. 

स्थानिक महापालिका (MCD), दिल्ली जल बोर्ड आणि वीज विभागाशी समन्वय साधून विविध ठिकाणी पाण्याचे टँकर आणि इतर मदत वाहने तैनात करण्यात आली होती. कोणत्याही उघड्या जागेवर प्राण्यांची कुर्बानी दिली जाणार नाही आणि जनावरांचे अवशेष रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकले जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.