वासिफी कुटुंबायांकडून २७ हस्तलिखित कुराण आणि ५०० दुर्मिळ ग्रंथांचे पुनरुज्जीवन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
टोंकचे प्रसिद्ध खत्तात (कॅलिग्राफर) कारी मुतिउल्लाह वासिफी
टोंकचे प्रसिद्ध खत्तात (कॅलिग्राफर) कारी मुतिउल्लाह वासिफी

 

फरहान इसराइली 

जेव्हा जग डिजिटल फॉन्ट आणि कृत्रिम डिझाइनकडे वेगाने धावत आहे, अशा काळात टोंकच्या एका कुटुंबाने हाताने लिहिलेल्या अक्षरांचे (कॅलिग्राफी) महत्त्व जागतिक स्तरावर पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

शहरातील काली पलटन भागातील खादी भांडाराजवळील एका घरातून सुरू झालेली ही कलेची शाई थेट न्यूयॉर्कपर्यंत पोहोचली आहे. टोंकचे प्रसिद्ध खत्तात (कॅलिग्राफर) कारी मुतिउल्लाह वासिफी यांना न्यूयॉर्कमध्ये द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे.

न्यूयॉर्कमधील 'इस्लामिक आर्ट सोसायटी'तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी स्पर्धेत कारी वासिफी यांनी हे यश मिळवले. जगभरातील ४०० हून अधिक कलाकारांमध्ये मिळवलेले हे यश म्हणजे डिजिटल युगातही जिवंत राहिलेल्या एका समृद्ध परंपरेची पावती आहे.

चार वर्षे, चार पुरस्कार आणि एक कुटुंब

हे यश अचानक मिळालेले नाही. गेल्या चार वर्षांपासून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नाव वासिफी कुटुंबाने सातत्याने गाजवले आहे. २०२२ मध्ये कारी मुतिउल्लाह वासिफी यांना स्वतःला प्रथम पुरस्कार मिळाला होता.

२०२३ मध्ये त्यांचा मुलगा हारिस वासिफी याने दुसरे स्थान पटकावले, तर २०२४ मध्ये हारिसने पुन्हा पहिले पारितोषिक मिळवले. आता २०२६ मध्ये मुतिउल्लाह वासिफी यांनी पुन्हा एकदा विजेत्यांच्या यादीत आपले नाव कोरले आहे.

पाच खंडांतील कलाकारांमध्ये हे सातत्य टिकवून ठेवणे ही एक असाधारण बाब मानली जात आहे. यावर्षी पहिला पुरस्कार इजिप्तला, दुसरा भारताला, तिसरा पाकिस्तानला आणि चौथा तुर्कीला मिळाला आहे.

घर हीच पहिली शाळा

कारी मुतिउल्लाह वासिफी यांचा प्रवास कोणत्याही आर्ट कॉलेजमधून सुरू झाला नाही, तर त्यांचे घरच त्यांची पहिली शाळा होती. त्यांचे वडील दिवंगत कारी सलीमुल्लाह वासिफ फुरकानी हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध खत्तात आणि विद्वान होते.

अरबी, फारसी आणि उर्दू भाषेवर वडिलांची मोठी पकड होती. बालपणात मुतिउल्लाह यांनी आपल्या वडिलांना तासनतास अक्षरे रेखाटताना पाहिले. लेखणीची धार आणि शाईचे प्रमाण हे त्यांच्यासाठी केवळ खेळ नसून ती एक शिस्त होती.

पुढे त्यांनी टोंक येथील 'मौलाना अबुल कलाम आझाद अरबी-फारसी रिसर्च इन्स्टिट्यूट' (APRI) मधून पदविका पूर्ण केली. ही संस्था टोंकची कला जोपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

टोंकमधील समृद्ध परंपरा

टोंक शहर हे मदरसे आणि इस्लामिक शिक्षणासोबतच कॅलिग्राफीच्या सखोल परंपरेसाठीही ओळखले जाते. नवाबी काळात इराण आणि मध्य आशियातून आलेल्या कलाकारांनी येथे या कलेचा पाया रचला होता.

कारी मुतिउल्लाह वासिफी यांच्यासाठी कॅलिग्राफी हे केवळ सजावटीचे साधन नसून ती त्यांच्या उपासनेचाच एक भाग आहे. त्यांनी आतापर्यंत स्वतःच्या हाताने २७ पूर्ण कुराण-ए-मजीद हस्तलिखित स्वरूपात लिहिले आहेत.

त्यापैकी काही कुराण अतिशय सूक्ष्म अक्षरांमध्ये आहेत, तर काही सोने-चांदीच्या नक्षीकामाने सजवलेले आहेत. एकाच मोठ्या पानावर संपूर्ण कुराण लिहिण्याचा अनोखा प्रयोगही त्यांनी यशस्वीपणे केला आहे.

दुर्मिळ ग्रंथांना नवजीवन

वासिफी यांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे दुर्मिळ हस्तलिखितांचे जतन करणे. काळाच्या ओघात अपूर्ण राहिलेले किंवा खराब झालेले कुराण आणि अरबी, फारसी, उर्दूची दुर्मिळ पुस्तके पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

आतापर्यंत त्यांनी सुमारे ५०० अपूर्ण कुराण आणि शेकडो जुन्या ग्रंथांना नवजीवन दिले आहे. ही पुस्तके कदाचित काळाच्या पडद्याआड गेली असती, पण वासिफी यांच्या कलेमुळे त्यांना पुन्हा संजीवनी मिळाली आहे.

त्यांची ही कला केवळ कागदापुरती मर्यादित नाही. त्यांनी कापड, चामडे, लाकूड, धातू, तांदळाचा दाणा, डाळीचा दाणा, संगमरवर आणि अगदी बाटलीच्या आतही अतिशय सुंदर कॅलिग्राफी केली आहे.

देश-विदेशात सन्मान

कारी मुतिउल्लाह वासिफी यांनी आतापर्यंत ३० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. तुर्कीमधील इस्तंबूल आणि दुबईमधील प्रतिष्ठित स्पर्धांमध्येही त्यांनी आपली कला सादर केली आहे.

२००९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. २०१० मध्ये इराण कल्चर हाऊस, दिल्लीतर्फे आयोजित स्पर्धेतही त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला होता.

वारसा पुढच्या पिढीकडे

वासिफी कुटुंबातील ही कला आता पुढच्या पिढीकडे पोहोचली आहे. त्यांचा मोठा मुलगा हारिस वासिफी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित कलाकार आहे. दुसरा मुलगा अब्बास वासिफी नदवतुल उलमा, लखनौ येथे शिक्षण घेत आहे.

मुलगी सिदरा वासिफी देखील विद्यार्थिनींना कॅलिग्राफीचे धडे देत आहे. वासिफी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ 'बझ्म-ए-वासिफ'ची स्थापना केली असून, टोंक येथे कॅलिग्राफीचे एक विशेष संग्रहालय उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter