नंदनवनात पुन्हा लोटला पर्यटकांचा जनसागर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमरनाथ यात्रा यंदा तीन जुलैपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये देशभरातून शेकडो भाविक दाखल होत असून, पर्यटनावरच उपजीविका अवलंबून असलेल्या काश्मिरी नागरिकांसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक दिवस येथील अनेक पर्यटन स्थळांवर सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध लादण्यात आले होते. 

मागील काही दिवसांपूर्वी सरकारने हे निर्बंध हटवले असून टप्प्याटप्प्याने येथील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. अशातच अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने काश्मीरमध्ये मोठ्यासंख्येने भाविक दाखल होत असून येथील पर्यटनालाही चालना मिळाली आहे.

अमरनाथ यात्रेकरूंचा तळ असलेल्या पहलगाम येथे या आठवड्याच्या सुरुवातील पासूनच पर्यटकांच्या आणि भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने येथील मार्गावर रविवारी संध्याकाळी वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे सोमवारी देखील अनंतनाग आणि पहलगाम येथे पर्यटक आणि भाविक मोठ्यासंख्येने आल्यामुळे वाहतूक कोडी झाली.

"येथे सलग दुसऱ्या आठवड्यात पर्यटकांच्या आणि भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होतच आहे. रविवारी संध्याकाळी आमच्या हॉटेलमधील सुमारे ८० टक्के खोल्यांसाठी नोंदणी झाली आहे, अशी माहिती पहलगाम येथील हॉटेल व्यावसायिक फयाज अहमद यांनी दिली. तर, "पहलगाम हल्ल्यानंतर येथे पर्यटक येतील की नाही, अशी भीती आम्हाला वाटत होती मात्र पुन्हा येथे पर्यटक येऊ लागले असल्याने मागील आठवड्यापासून समाधानकारक विक्री होते, आहे अशी प्रतिक्रिया येथील हस्तकलेच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या अस्मा जान यांनी दिली आहे.

सुरक्षेबाबत काळजी
आम्ही विविध विभागांच्या संपर्कात राहून येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत आहोत, अशी माहिती पर्यटनविभागाच्या वतीने देण्यात आली. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असल्याचेही पर्यटन विभागाने सांगितले.