यशस्वी जयस्वाल मैदानात असेपर्यंत सुस्थितीत असलेल्या भारतीय संघाची अवस्था तो बाद झाल्यानंतर पाच बाद २११ धावा झाली. याप्रसंगी कर्णधार शुभमन गिल (नाबाद ११४ धावा) याने शतकी खेळी साकारत भारतीय संघाचा डाव सावरला. त्याने सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावण्याची किमया करुन दाखवली. रवींद्र जडेजा याच्यासोबत ९९ धावांची भागीदारी करीत त्याने भारतीय संघाला पहिल्या दिवसअखेरीस पाच बाद ३१० धावसंख्या उभारुन दिली.
त्याआधी कर्णधार बेन स्टोक्सने दुसऱ्या कसोटी सामन्यातसुद्धा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. एजबॅस्टन क्रिकेट मैदानाच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करायला भारतीय संघाला मिळाली. यशस्वी जयस्वालने पहिल्यापासून पुढे पडलेल्या चेंडूंवर फटके लगावणे चालू केले. दुसऱ्या बाजूने खेळणारा के. एल. राहुल जरा जास्त सावध वाटला. बराच वेळ खेळून मग तिरक्या बॅटने आणि काहीसे डोक्याच्या रेषेच्या मागे बचावात्मक खेळताना राहुल ख्रिस वोक्सला दोन धावांवर बाद झाला.
संघ बदलामुळे करुण नायरला मानाच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची संधी मिळाली होती. नायरने त्याचा फायदा घेत अत्यंत विश्वासाने फटकेबाजी केली. जयस्वालन धावांचा ओघ कायम ठेवलाच होता. उपहाराअगोदर जयस्वालचे अर्धशतक पूर्ण झाले होते. भागीदारी जमली असताना व पाच मिनिटे उपहाराला बाकी असताना ब्रायडन कार्सने करुण नायरला अचानक उसळणारा चेंडू टाकून स्लीपमध्ये झेल द्यायला भाग पाडले. कडक उन्हामुळे एजबॅस्टनची खेळपट्टी जरा अजून कोरडी दिसू लागली. जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलने गोलंदाजांना यशापासून लांब ठेवणारा खेळ केला. बेन स्टोक्सने टप्प्याटप्प्याने आपल्या हातातील सर्व गोलंदाज आलटून पालटून वापरून बघितले.
एका बाजूला क्षेत्ररचना लावून गोलंदाजी करताना फलंदाजांचा संयम तपासला जात होता. बेन स्टोक्सने त्याच संयमाला आव्हान देत जयस्वालला अत्यंत साध्या चेंडूवर बाद केले. काही गरज नसलेल्या उजव्या स्टंपबाहेरचा चेंडू मारताना १३ चौकारांसह ८७ धावांवर खेळणारा जयस्वाल झेल देऊन बाद झाला. त्यानंतर पहिल्या कसोटीतील शतकवीर रिषभ पंत व शुभमन गिल ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच शोएब बशीरच्या गोलंदाजीवर पंत २५ धावांवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. ख्रिस वोक्सचा आत येणारा चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात नितीशकुमार रेड्डी एक धावेवरच त्रिफळाचीत झाला. त्यानंतर शुभमन गिल व रवींद्र जडेजा या जोडीने ९९ धावांची भागीदारी करीत भारताला सन्मानजनक स्थितीमध्ये नेले. गिल १२ चौकारांसह ११४ धावांवर, जडेजा पाच चौकारांसह ४१ धावांवर खेळत आहे.
अनपेक्षित बदल
इंग्लंडने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नसताना दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन बदल केलेले दिसले. शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा आणि एकच कसोटी सामना खेळलेल्या साई सुदर्शनला बाहेर ठेवले गेले. त्यांच्या जागी नितीशकुमार रेड्डी, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर संघात आले. सगळ्यांना कुलदीप यादवला जागा मिळेल असे वाटले होते, पण संघव्यवस्थापनाने गोलंदाजीपेक्षा फलंदाजी करू शकणाऱ्या गोलंदाजाचा विचार केला. थोडक्यात, भारतीय कप्तानाने फलंदाजीची खोली वाढवताना सुरक्षेचा विचार जास्त केला.
अचूक गोलंदाजी
एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी चांगलाच टप्पा दिशा पकडून मारा केला. सर्वांत पुढे होता ख्रिस वोक्स. वोक्सने पहिल्या सत्रात फलंदाजांना हलूच दिले नाही. एकदम अचूक मारा करताना त्याने पाच षटकांत चार निर्धाव षटके टाकताना एकच चौकार मारून दिला आणि राहलचा बळी घेतला. बऱ्याच वेळा फलंदाज वोक्सला पायचीत होताना वाचले. दोन वेळा केवळ पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवले म्हणून निर्णय कायम राहिला.
संक्षिप्त धावफलक भारत
पहिला डाव ८५ षटकांत ५ बाद ३१० (यशस्वी जयस्वाल ८७, के. एल. राहुल २, करुण नायर ३१, शुभमन गिल खेळत आहे ११४, रिषभ पंत २५, नितीशकुमार रेड्डी १, रवींद्र जडेजा खेळत आहे ४१, ख्रिस वोक्स २/५७).