मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा एका दिवसासाठी स्थगित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सततच्या मुसळधार पावसामुळे बुधवारी पहलगाम आणि बालटाल या दोन्ही छावण्यांमधून अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली. जम्मू आणि काश्मीरच्या माहिती व जनसंपर्क विभागाने एक्सवर पोस्ट केलं की, “पहलगाम आणि बालटालमधून श्री अमरनाथजी यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे.”  

काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधूडी म्हणाले, “३० जुलै २०२५ च्या सकाळपासून सतत आणि मुसळधार पावसामुळे बालटाल आणि नुनवान/चंदनवाडी या दोन्ही आधार छावण्यांमधून यात्रा सुरू होऊ शकली नाही.”  भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी म्हणून तीर्थयात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरनाथ यात्रा या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झाली आणि ९ ऑगस्टला ती संपणार आहे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या म्हणण्यानुसार, ३ जुलैला यात्रा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ३.९३ लाखांहून अधिक तीर्थयात्रींनी अमरनाथ गुफा मंदिराचे दर्शन घेतले आहे. विभागाने पोस्टमध्ये लिहिले की, “श्री अमरनाथजी यात्रा २०२५ मध्ये आतापर्यंत ३.९३ लाखांहून अधिक तीर्थयात्रींनी पवित्र गुफा मंदिरात दर्शन घेतलं आहे.”  

दक्षिण काश्मीरमध्ये ३,८८८ मीटर उंचीवर असलेलं पवित्र अमरनाथ मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. तीर्थयात्री पारंपरिक ४८ किलोमीटर लांब पहलगाम मार्गाने किंवा कमी लांबीच्या पण जास्त उताराच्या १४ किलोमीटर लांब बालटाल मार्गाने यात्रा करतात. देश-विदेशातून भाविक उत्साहाने या तीर्थयात्रेत सहभागी होत आहेत. ते प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेच्या नियोजनाचं कौतुक करत आहेत.  

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी जम्मूतून बूढा अमरनाथ यात्रेसाठी तीर्थयात्रींच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. यामुळे या भागातील भगवान शिवाच्या मंदिराची वार्षिक तीर्थयात्रा अधिकृतपणे सुरू झाली.  झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात बोलताना सिन्हा म्हणाले, “एक हजाराहून अधिक लोक नुकतेच बूढा अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने अमरनाथ यात्रेसाठी उत्तम व्यवस्था केली आहे.”