केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज जम्मूमध्ये एका उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स' धोरणाचा पुनरुच्चार करत, त्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे (IB) संचालक, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPFs) प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत अमित शहा यांनी २०२२५ ची श्री अमरनाथजी यात्रा शांततेत पार पाडल्याबद्दल केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यासोबतच, जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच आलेल्या महापुरात सर्व सुरक्षा दलांनी बचाव आणि मदतकार्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचीही त्यांनी प्रशंसा केली. जवानांच्या या कार्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचण्यास मदत झाली, असे ते म्हणाले.
अमित शहा यांनी आश्वासन दिले की, जम्मू-काश्मीरमधील नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडून (CAPFs) पूर्ण सहकार्य केले जाईल.