दिवाळीतील 'या' सायबर फ्रॉड्सपासून रहा सावध!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

ब्रिजेश सिंह 

कृत्रिम बुद्धिमत्ता आजवर आपल्यासाठी अनेक कामे करणारी एक मदतनीस ठरली होती, तिच्यामुळे काही नवीन धोके निर्माण होऊ शकतात. गुन्हेगार एआय तंत्रज्ञानाचा वापर फसवणूक करण्यासाठी करू शकतात. अशा फसवणुकीचे केवळ आर्थिकच नव्हे; तर मानसिक परिणामही खूप मोठे आहेत. एआयचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करू शकतो. लक्षात ठेवा, यंदाच्या दिवाळीत फक्त आकाशातच रंग उधळले जावेत... आपल्या बँक खात्यातून पैसे नाही!

दिवाळी... दिव्यांचा, प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव. हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाने, असत्यावर सत्याने आणि निराशेवर उत्साहाने मिळवलेल्या विजयाचा सोहळा; पण या वर्षी, या उत्सवाच्या उत्साहात एक नवीन आव्हान समोर आले आहे. हे आव्हान म्हणजे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निर्माण झालेली एक नवी परिस्थिती. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जी आजवर आपल्यासाठी अनेक कामे करणारी एक मदतनीस ठरली होती तिच्यामुळे काही नवीन धोके निर्माण होऊ शकतात. गुन्हेगार या तंत्रज्ञानाचा वापर फसवणूक करण्यासाठी करू शकतात. त्यामुळे या उत्सवात सतर्क राहणे आवश्यक आहे. या वर्षी आनंदासोबतच थोडी जागरूकता बाळगून आपण या नवीन परिस्थितीचा सामना करू शकतो.

हे धोके तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या रूपात येतात. कधी तुमचा आवडता चित्रपट नायक तुम्हाला 'आताच क्लिक करा' असे सांगणारा व्हिडिओ पाठवतो; तर कधी व्हॉट्सअॅपवर आलेल्या शुभेच्छांमध्ये एक छुपा धोका दडलेला असतो. कधी कधी वस्तूंच्या किमती इतक्या अविश्वसनीयरीत्या कमी असतात, की अनुभवी खरेदीदारही क्षणभर थांबून विचार करतात: 'खरंच हे शक्य आहे का?' उत्सुकता आणि सावधगिरी यांच्यातील याच एका क्षणाचा फायदा घेऊन ही फसवणूक यशस्वी होते.

फसवणुकीचा बदललेला चेहरा
आता आपल्याला दूरच्या देशातील राजकुमाराकडून आलेले, व्याकरणाच्या चुकांनी भरलेले जुने ई-मेल येत नाहीत. आताची फसवणूक अत्यंत सफाईदार, वैयक्तिक आणि अचूक लक्ष्य साधणारी आहे. गेल्या वर्षी झालेल्या डेटा लीकमध्ये तुमची माहिती उघड झाली होती, त्यामुळे तुम्ही कोणत्या कंपनीचा मोबाईल शोधत आहात, हे या नव्या फसवणुकीला माहीत आहे. तिला हेही माहीत आहे, की तुम्ही रात्री उशिरा खरेदी करता, तुम्हाला इंग्रजी शब्द मिसळलेली हिंदी भाषा आवडते आणि 'काउंटडाऊन टायमर' पाहून तुम्ही लगेच प्रतिसाद देता. लाखो लोकांच्या अशा सवयींवर प्रशिक्षित केलेले लँग्वेज मॉडेल (Language Model) दिवाळी 'फ्लॅश सेल'चा असा संदेश तयार करू शकते, जो जणू तुमच्या ओळखीच्या दुकानदारानेच पाठवला आहे मैत्रीपूर्ण, तातडीचा आणि विश्वासार्ह. त्या लिंकवर क्लिक करताच तुम्ही एका अशा वेबसाईटवर पोहोचता, जी देशातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स पोर्टल्सची हुबेहूब नक्कल असते. लोगोची चमक, अक्षरांचा आकार आणि 'Buy Now' बटणाचा केशरी रंगही अगदी अचूक असतो. त्यात अपूर्ण असते ती फक्त एकच गोष्ट - त्यांचा हेतू.

एआय : भ्रमाचा कारखाना आणि खोट्या वस्तूंचा बाजार
अशा परिपूर्ण दिसणाऱ्या वेबसाईटच्या मागे एक एआय इमेज जनरेटर बसलेला असतो, जो काही सेकंदांत उत्पादनाचे उच्च-गुणवत्तेचे फोटो तयार करू शकतो. तुम्हाला एखाद्या मनगटी घड्याळावर ८२ टक्क्यांसारखी अविश्वसनीय सूट हवी आहे का? ही प्रणाली त्या घड्याळाचे विविध कोनांमधून फोटो, एखाद्या सेलिब्रिटीच्या मनगटावर तेच घड्याळ आणि पार्श्वभूमीवर सणासुदीचे दिवे असलेले ग्राहकांचे फोटोही तयार करते.

अल्गोरिदम वस्तूंच्या साठ्यावरही (Inventory) नियंत्रण ठेवत असल्याने, तो तुम्हाला खरेदीसाठी उद्युक्त करण्यासाठी वस्तूंची संख्या रिअल-टाइममध्ये कमी झाल्याचे दाखवतो. तुम्ही विचार करत असतानाच, एक चॅट-बॉट (Chatbot) समोर येतो : 'मॅडम, तुमच्या शहरात फक्त दोनच नग शिल्लक आहेतः त्या बॉटच्या प्रोफाइल फोटोमध्ये कपाळावर टिकली लावलेली एक हसरी महिला दिसते हा फोटोही कृत्रिमरीत्या तयार केलेला असतो. तुमच्या कॉम्प्युटरमधील कुकीजमधून तुमचे नाव चोरून तो तुम्हाला नावाने हाक मारतो. हा भ्रम इतका परिपूर्ण असतो, की तो क्षणार्धात हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. प्रत्येक ग्राहकाला त्याच्या आवडीनुसार तयार केलेला; पण तितकाच धोकादायक सापळा दिसतो.

सेलिब्रिटींचा मोहजाल आणि डीपफेकचा धोका
कधी कधी आमिष एखाद्या वस्तूचे नसते; तर बक्षिसाचे असते. तुमच्या सोशल मीडिया टाइमलाइनवर एक व्हिडिओ येतो : एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता 'दिवाळी धमाका लकी ड्रॉ'ची घोषणा करत असतो. त्याचे ओठ, आवाज आणि बोलण्याची खास लकब, सर्व काही अगदी हुबेहूब असते. तुमच्या प्रोफाईलमधून माहिती चोरून तुम्हाला कॅप्शनमध्ये नावाने संबोधले जाते. 'तुमचा स्मार्टफोन जिंकण्यासाठी क्लिक करा, फक्त जीएसटी भराः तीन क्लिकनंतर तुम्ही तुमचे कार्ड तपशील आणि ४९९ रुपयांसारखी क्षुल्लक 'कुरिअर फी' दिलेली असते. तो व्हिडिओ गायब होतो, ते अकाउंट डिलीट होते आणि तुमचे पैसे गेलेले असतात. सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, अशा डीपफेक जाहिराती आता नवीन नाहीत; सणासुदीच्या काळात फसवणुकीच्या घटनांमध्ये त्यांची वाढती नोंद आहे.

रोजच्या आयुष्यातील अत्याधुनिक सापळे
हा धोका केवळ शॉपिंग पोर्टल्सपुरता मर्यादित नाही. 'तुमची डिलिव्हरी अयशस्वी झाली' असे संदेश भारतीय पोस्ट खाते किंवा प्रसिद्ध कुरिअर कंपन्यांच्या नावाने येतात. त्यात स्थानिक सणांच्या शुभेच्छाही असतात, ज्यामुळे ते खरे वाटतात. लिंकवर क्लिक केल्यावर एक बनावट ट्रॅकिंग पेज उघडते, जे 'डिलिव्हरी पुन्हा शेड्युल करण्यासाठी' तुमचा यूपीआय पिन मागते. आजकाल भारतीयांना जवळपास दररोज पॅकेज येत असल्याने, हा संदर्भ लोकांना खरा वाटतो. एक मशीन-लर्निंग इंजिन वेगवेगळ्या संदेशांची छोट्या गटांवर चाचणी करते, ज्याला सर्वाधिक क्लिक मिळतात. तो संदेश लाखो लोकांपर्यंत पोहोचवला जातो. या प्रक्रियेला मार्केटिंगच्या भाषेत 'ए-बी टेस्टिंग' म्हणतात. इथे मात्र त्याचा वापर अचूक दरोडा टाकण्यासाठी होतो.

आवाजाचा धोका आणि विश्वासाचा घात
आता या गुन्हेगारांच्या ताफ्यात व्हॉईस क्लोनिंग (Voice Cloning) तंत्रज्ञानही सामील झाले आहे. महाराष्ट्रातील एका छोट्या व्यापाऱ्याला नुकताच एक फोन आला. आवाज त्याच्या पुण्यातील नेहमीच्या पुरवठादारासारखा होता, अगदी नेहमीप्रमाणे 'काय म्हणतोस?' म्हणण्याची पद्धत आणि पार्श्वभूमीतून येणारा मशिनरीचा आवाजही तसाच होता. फोनवरील व्यक्तीने दिवाळीपूर्वी मालाच्या किमतीत अचानक वाढ झाल्याचे सांगून आगाऊ रक्कम मागितली. व्यापाऱ्याने काही रक्कम ट्रान्स्फर केली. नंतर त्याला कळले, की त्या आवाजातील प्रत्येक बारकावा खऱ्या पुरवठादाराने फेसबुकवर पोस्ट केलेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओमधून तयार केला होता. तज्ज्ञांच्या मते, आता एखाद्याच्या आवाजाची विश्वासार्ह नक्कल करण्यासाठी फक्त काही सेकंदांचा स्पष्ट ऑडिओ पुरेसा आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांनी रील्स, पॉडकास्ट आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या माध्यमातून यापेक्षा कितीतरी जास्त ऑडिओ सार्वजनिक केला आहे.

डिजिटल युगातील फसवणूक : यूपीआयचा वापर
यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) हे देशातील जलद आणि सुलभ पेमेंटचे माध्यम बनले आहे; परंतु याच सुलभतेचा गैरवापर करून फसवणूक करणारे नवनवीन मार्ग शोधत आहेत. 'झटपट दिवाळी कॅशबॅक' किंवा आकर्षक बक्षिसांचे आमिष दाखवून अनेक संदेश पाठवले जातात. या संदेशांमध्ये पैसे स्वीकारण्याची (Collect-Request) विनंती असू शकते, जी बँकेच्या अॅपसारखीच दिसते. त्यामुळे, अनेकदा वापरकर्ते फसवणुकीला बळी पडतात आणि नकळत पैसे गमावून बसतात. हे गुन्हेगार अशा विनंत्या बहुतांश वेळा सणासुदीच्या काळात किंवा पगाराच्या आसपास पाठवतात, जेव्हा लोकांच्या खात्यात अधिक पैसे असण्याची शक्यता असते. तसेच, '२००० जिंकण्यासाठी ही लिंक पाच ग्रुप्समध्ये शेअर करा' अशा लोभस ऑफर देऊन ते लोकांकडून ही लिंक पुढे पाठवतात आणि संभाव्य बळी शोधतात. त्यामुळे यूपीआय वापरताना सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

फसवणुकीची मानसिक किंमत
अशा फसवणुकीचे केवळ आर्थिकच नव्हे; तर मानसिक परिणामही खूप मोठे आहेत. एका अभ्यासानुसार, अनेक पीडितांना राग, चिंता आणि शरमेची भावना येते आणि काही जण तर याची तक्रारही करत नाहीत. या मौनामुळे ते एकटे पडतात; तर दुसरीकडे त्याच एआय प्रणाली फसवणुकीची पुढची लाट तयार करत असतात. हे एक दुष्टचक्र आहे: शरमेमुळे गुप्तता वाढते, गुप्ततेमुळे गुन्हेगारांना अभय मिळते आणि त्यातूनच ते अधिक हुशार फसवणुकीसाठी भांडवल उभे करतात.

सायबर सुरक्षेचे प्रतिउत्तर: तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर
पण ही बाब निराशेवर संपत नाही. जी संगणकीय शक्ती गुन्हेगारीला खतपाणी घालते, तीच आता तिला रोखण्यासाठीही वापरली जात आहे. सायबर गुन्हेगारी विभाग आता संशयास्पद हालचाली शोधणारी प्रणाली (Suspicious Activity Detection System) वापरत आहेत, जे बनावट डोमेनची नोंदणी होताच त्यांना शोधून काढतात. पेमेंट अॅप्सनी सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे संशयास्पद व्यवहार ओळखले जाऊ शकतात. बँका आता तुमच्या सवर्यांचे विश्लेषण (Behaviour Analytics) करतात : जर तुमच्या कर्सरची हालचाल नेहमीपेक्षा वेगळी असेल किंवा तुमच्या टायपिंगचा वेग अचानक बदलला; तर व्यवहार थांबवला जातो आणि त्याची खात्री केली जाते. अनेक कंपन्यांनी ग्राहकांनी क्लिक करण्यापूर्वीच हजारो धोकादायक वेबसाईट आणि दूरध्वनी क्रमांक ब्लॉक केले आहेत - हे सिद्ध करते की बचावात्मक एआयदेखील वेगाने शिकत आहे.

सर्वात मोठी ढालः मानवी विवेक
तरीही, अंतिम निर्णय मानवी असतो. कोणताही अल्गोरिदम तुम्हाला 'पे' बटण दाबण्यास भाग पाडू शकत नाही; तो फक्त तुम्हाला मोहात पाडू शकतो. म्हणूनच, सर्वात प्रभावी संरक्षण सर्वात जुने आहे: थांबा, तपासा आणि सांगा.

थांबा : जेव्हा एखादी ऑफर अविश्वसनीय वाटेल, तेव्हा क्षणभर थांबा.
तपासा : आलेल्या संदेशातून बाहेर पडा. कंपनीची अधिकृत वेबसाईट स्वतः टाईप करा, त्यांच्या अधिकृत नंबरवर फोन करा किंवा मित्राला विचारा.
सांगा : तुमचा अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट, इतरांना सांगा. जेणेकरून फसवणुकीच्या जाळ्यापेक्षा जागरूकतेचे जाळे अधिक वेगाने पसरेल. जेवणाच्या टेबलवर झालेली दोन मिनिटांची चर्चा संपूर्ण कुटुंबाला या धोक्यांपासून वाचवू शकते.

जसजसे दिवे लागतील आणि आकाशात फटाक्यांची रोषणाई होईल, तसतसा हा प्रकाश केवळ हवेतूनच नव्हे; तर आपल्या घरातील इंटरनेटच्या तारांमधूनही (फायबर ऑप्टिक केबल्स) प्रवास करायला हवा. दिवाळीची खरेदी आनंदाची बाब आहे, ती भीतीदायक नसावी. उत्सुकता कायम ठेवा, पण डोळे आणि कान उघडे ठेवून सजगता वाढवा. आज जे तंत्रज्ञान आव्हान वाटत आहे, तेच उद्या आपल्या मदतीला धावून येऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करू शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, की या दिवाळीत फक्त आकाशातच रंग उधळले जावेत, आपल्या बँक खात्यातून पैसे नाही! आणि फसवणूक झाल्यास, त्वरित १९३० या क्रमांकावर संपर्क साधा, जेणेकरून आपले पैसे जाण्यापासून रोखता येतील. तसेच cybercrime.gov.in या वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवा.

(लेखक मंत्रालय माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आहेत. त्यांचे 'द क्लाऊड चॅरियट' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter