अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात 'फिटनेस'च्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाल्याने भारतीय क्रिकेट वर्तुळात खळळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात निवड न झाल्याने नाराज झालेल्या शमीने, "जर मी चार दिवसांची रणजी मॅच खेळू शकतो, तर ५० षटकांचा सामना का नाही?" असा थेट सवाल उपस्थित केला होता. यावर आता अजित आगरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना आगरकर म्हणाले, "जर शमी फिट असता, तर तो इंग्लंड दौऱ्याच्या विमानात असता. दुर्दैवाने, तो फिट नव्हता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही आम्ही त्याला संघात घेण्यासाठी आतुर होतो, पण त्याचा फिटनेस तिथेही नव्हता. गेल्या ६-८ महिन्यांपासून आम्ही हेच पाहत आहोत."
यापूर्वी, संघ निवडल्यानंतर आगरकर यांनी 'शमीच्या फिटनेसवर आपल्याकडे कोणतीही अपडेट नाही,' असे म्हटले होते. यावर शमीने नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, "फिटनेसची अपडेट देणे हे माझे काम नाही. माझे काम एनसीएमध्ये जाऊन सराव करणे आणि मॅच खेळणे आहे."
शमीच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना आगरकर म्हणाले, "जर त्याने हे मला थेट म्हटले, तर मी त्याला उत्तर देईन. कदाचित मी त्याला फोन करेन. माझा फोन बहुतेक खेळाडूंसाठी नेहमीच चालू असतो. गेल्या काही महिन्यांत माझे त्याच्याशी अनेकदा बोलणे झाले आहे."
आगरकर यांनी स्पष्ट केले की, शमी भारतासाठी एक अविश्वसनीय गोलंदाज आहे आणि जर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला फिटनेस सिद्ध करू शकला, तर त्याच्या नावाचा नक्कीच विचार केला जाईल. "जर तो चांगली गोलंदाजी करत असेल, तर शमीसारखा गोलंदाज संघात कोणाला नको असेल?" असेही ते म्हणाले.
या दोघांच्या वक्तव्यांमुळे, खेळाडू आणि निवड समिती यांच्यात संवादाचा अभाव आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.