केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज जम्मू विभागातील पाऊस, पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झालेल्या भागांचा दौरा करून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. मोदी सरकार जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, सुरक्षा, पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी तात्काळ मदत, आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक सहकार्य पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले.
जम्मूतील मंगू चक गावात गृहमंत्र्यांनी पूरग्रस्त लोकांना भेटून त्यांचे सांत्वन केले. यानंतर, त्यांनी जम्मूतील बिक्रम चौकातील तावी पूल, शिवमंदिर आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.
या दौऱ्यानंतर, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ताज्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी, केंद्रीय गृमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या घटनांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. अमित शहा म्हणाले की, "या संकटकाळात, पहिल्या दिवसापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे आणि भारत सरकारने बचाव कार्यात आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे."
अमित शहा म्हणाले की, "केंद्रशासित प्रदेश आणि सर्व यंत्रणांनी मिळून संभाव्य नुकसान लक्षणीयरीत्या कमी केले आहे आणि समन्वित प्रयत्नांमुळे आपण अनेक जीव वाचवण्यात यशस्वी झालो आहोत."
अमित शहा यांनी सांगितले की, सर्व 'पूर्व चेतावणी ॲप्स' (Early Warning Apps), त्यांची अचूकता आणि त्यांची तळागाळापर्यंत पोहोच यांचे गंभीर विश्लेषण करणे आवश्यक आहे. "आपल्या प्रणालींमध्ये गंभीर विश्लेषणाद्वारे सुधारणा करणे हाच शून्य-मृत्यूच्या दृष्टिकोनाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे," असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, "हवामान विभाग आणि एनडीएमएने (NDMA) ढगफुटीला कारणीभूत ठरणाऱ्या प्रवृत्ती आणि ढगांमधील आर्द्रतेचे प्रमाण यांच्यातील संबंधांचा संयुक्तपणे अभ्यास करावा, कारणे ओळखून एक पूर्व चेतावणी प्रणाली स्थापित करावी." गृहमंत्रालयाने डेटा ॲनालिटिक्स आणि एआयचा (AI) वापर करून या दिशेने पावले उचलली पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.
अमित शहा म्हणाले की, गृहमंत्रालयाची प्रगत सर्वेक्षण पथके नुकसानीचे मूल्यांकन करतील आणि त्यानंतर पुढील मदत पुरवली जाईल. त्यांनी जाहीर केले की, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या संबंधित विभागांची बैठक केंद्रीय गृह सचिवांसोबत १-२ दिवसांत होईल.
अमित शहा यांनी निर्देश दिले की, आरोग्य आणि जल विभागांनी पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवांवर सक्रियपणे लक्ष केंद्रित करावे. लष्कर, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि हवाई दलाच्या वैद्यकीय तुकड्यांनीही सहकार्य करावे, यावर त्यांनी भर दिला.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीर हे नैसर्गिक आपत्तीप्रवण क्षेत्र असल्याने, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी (SDRF) केंद्राचा वाटा म्हणून २०९ कोटी रुपयांची रक्कम केंद्रशासित प्रदेशाला वाटप करण्यात आली आहे, ज्यामुळे मदतकार्य सुरू झाले आहे.
अमित शहा यांनी सांगितले की, लोकांच्या खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे आणि एसडीआरएफ अंतर्गत नुकसान झालेल्या घरांसाठी मदतीचे मूल्यांकन केले जात आहे आणि ती लवकरात लवकर वितरित केली जाईल. अनेक रस्त्यांचे नुकसान झाले असून दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. बहुतेक रस्त्यांवर वाहतूक सुरू झाली आहे आणि जिथे गरज आहे तिथे मदतही पोहोचू लागली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि सांगितले की, केंद्रशासित प्रदेश सरकारने यशस्वी बचावकार्य अत्यंत जलद आणि कार्यक्षमतेने पार पाडले. खबरदारीचा उपाय म्हणून ५,००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफच्या १७ टीम आणि लष्कराच्या २३ तुकड्या, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर, UTDRF, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान अजूनही संपूर्ण ऑपरेशनमध्ये गुंतलेले आहेत आणि लोकांना मदत करत आहेत.