दहशतवादाविरोधात उभारणार 'अभेद्य सुरक्षा ग्रीड'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी देशात एक 'अभेद्य सुरक्षा ग्रीड' तयार करण्याचे आवाहन केले आहे. नवी दिल्लीत आयोजित 'दहशतवादविरोधी परिषद-२०२५' च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संघटित गुन्हेगारीचे जाळे मुळासकट उखडून टाकण्यासाठी एका विशेष '३६० डिग्री स्ट्राइक प्लॅन'ची घोषणा केली. दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे त्यांचा सामना करण्यासाठी एकत्रित आणि कठोर रणनीती आखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादाविरोधात 'शून्य सहिष्णुता' (झिरो टॉलरन्स) धोरण स्वीकारले आहे. गेल्या १० वर्षांत भारताने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मोठे यश मिळवले आहे. आता या लढाईला निर्णायक टप्प्यावर नेण्याची वेळ आली आहे. यासाठी तपास यंत्रणा, गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिसांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. दहशतवादाची इकोसिस्टम आणि नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व राज्यांनी समान कायदेशीर निकष आणि कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे आहे.

डाव्या विचारसरणीचा अतिरेक अर्थात नक्षलवादावर सरकारने बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवले आहे. येत्या काही काळात नक्षलवाद देशातून पूर्णपणे हद्दपार केला जाईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. तसेच, सायबर स्पेस आणि सीमेपलीकडून होणारी घुसखोरी हे सध्याचे मोठे आव्हान आहे. दहशतवादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणांनीही तंत्रज्ञानाच्या बाबतीत दोन पावले पुढे राहणे आवश्यक आहे. 'डेटा' हेच नवीन शस्त्र असून माहितीच्या देवाणघेवाणीत अधिक तत्परता असायला हवी.

संघटित गुन्हेगारी टोळ्या या दहशतवाद्यांना रसद पुरवण्याचे काम करतात. अमली पदार्थांची तस्करी, हवाला व्यवहार आणि बेकायदेशीर शस्त्रसाठा यांवर कडक कारवाई केल्यास दहशतवादाचे आर्थिक स्रोत बंद होतील. यासाठीच सरकारने '३६० डिग्री प्रहार' करण्याची योजना तयार केली आहे. यात तपास, खटला आणि शिक्षा या सर्व स्तरांवर वेगाने हालचाली केल्या जातील. कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी आणि सुरक्षित भारत घडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.