धकाधकीच्या जीवनात वाढतोय मधुमेहाचा धोका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

डॉ. साकिब सय्यद

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मधुमेह (डायबिटीज) हा आजार झपाट्याने वाढत आहे. भारतात सुमारे नऊ कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. ही संख्या दरवर्षी वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मधुमेह हा हृदयरोग, किडनी निकामी होणे, अंधत्व आणि पक्षाघात यांसारख्या गंभीर गुंतागुंतांचे प्रमुख कारण आहे. मात्र, वेळीच जागरूकता आणि योग्य जीवनशैलीने हा आजार नियंत्रित करता येऊ शकतो किंवा टाळताही येऊ शकतो.

मधुमेह हा एक जुनाट आजार आहे, ज्यात रक्तातील साखरेची (ग्लुकोजची) पातळी असामान्यपणे वाढते. शरीरातील स्वादुपिंड (पॅक्रियास) पुरेसे इन्शुलिन हार्मोन तयार करत नाही किंवा तयार झालेले इन्शुलिन योग्यरीत्या काम करत नाही. इन्शुलिन हे हार्मोन अन्नातील साखरेला ऊर्जेत रूपांतरित करण्यासाठी आवश्यक असते.

टाइप एक मधुमेहात बहुतेकदा बालपणी किंवा तरुण वयात होतो. यात स्वादुपिंड इन्शुलिन तयार करतच नाही. यासाठी आयुष्यभर इन्शुलिन इंजेक्शनची गरज असते. टाइप दोन मधुमेह हा सर्वात सामान्य प्रकार (९० टक्के रुग्णांमध्ये). यात शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही. जीवनशैली, लठ्ठपणा आणि आनुवंशिकता यामुळे होतो. गर्भावस्थेतील मधुमेह असतो. गर्भधारणेदरम्यान होतो आणि बहुतेकदा बाळंतपणानंतर बरा होतो, मात्र भविष्यात टाइप २ होण्याचा धोका वाढतो.

मधुमेहाची लक्षणे सुरवातीला दुर्लक्षित राहू शकतात, मात्र खालील लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवे. वारंवार तहान लागणे आणि जास्त पाणी पिणे, वारंवार लघवीला जावे लागणे (विशेषतः रात्री), अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे, सतत थकवा जाणवणे आणि अशक्तपणा, जखमा लवकर न बरे होणे, डोळ्यांसमोर धुकेचे वाटणे किंवा दृष्टी कमी होणे, हात-पायांना मुंग्या येणे किंवा खाज सुटणे, ही लक्षणे दिसतात.

आनुवंशिकता (कुटुंबात कोणाला असल्यास धोका वाढतो), लठ्ठपणा आणि कमी व्यायाम, असंतुलित आहार (जास्त साखर, तेलकट पदार्थ), तणाव आणि अनियमित झोप, वाढते वय (४० वर्षांनंतर धोका जास्त). भारतात शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे मधुमेह झपाट्याने वाढत आहे. मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही, मात्र योग्य व्यवस्थापनाने सामान्य जीवन जगता येते. प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी संतुलित आहार घ्यावा. साखर, मैदा आणि तेलकट पदार्थ कमी करा. हिरव्या भाज्या, फळे, धान्य, डाळी आणि नट्स जास्त खा. छोट्या-छोट्या जेवण घ्या. नियमित व्यायाम करा. दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे चालणे, धावणे, योग किंवा जिम. व्यायाम इन्शुलिनची कार्यक्षमता वाढवतो. वजन नियंत्रण करताना बीएमआय २३ पेक्षा कमी ठेवा. नियमित तपासणी करावी. ४० वर्षांनंतर दरवर्षी रक्तातील साखर तपासा. औषधे आणि इन्शुलिन डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. तणाव कमी करा आणि पुरेशी झोप घ्या.

जागतिक मधुमेह दिवस दरवर्षी नोव्हेंबरमध्ये साजरा केला जातो. २०२५ ची थीम 'जीवनाच्या विविध टप्प्यांत मधुमेह' आहे, जी बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत मधुमेहाच्या व्यवस्थापनावर भर देते. भारतात अनेक रुग्णांना त्यांच्या आजाराची माहितीच नसते, त्यामुळे गुंतागुंत वाढते. मधुमेह हा 'सायलेंट किलर' आहे, मात्र जागरूकतेने आणि योग्य काळजीने त्याला नियंत्रित करता येते. आजपासूनच निरोगी जीवनशैली स्वीकारा आणि आपल्या कुटुंबीयांना जागरूक करा. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे ! डॉ. साकिब सय्यद हे युनायटेड सिटी हॉस्पिटलला पूर्ण वेळ रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

(लेखक हे फिजिशियन व इन्टेनसिव्हिस्ट आहेत.)



Latest News