ChatGPT ची क्रेझ ओसरली; 'जेमिनी' आणि 'ग्रोक'ला नागरिकांची पसंती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात 'एआय'च्या जगात आता मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. ओपनएआयच्या प्रसिद्ध 'चॅटजीपीटी'चा दबदबा काहीसा कमी होऊ लागला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, चॅटजीपीटीच्या ट्रॅफिक शेअरमध्ये घट झाली आहे. दुसरीकडे, गुगलचे 'जेमिनी' आणि इलॉन मस्क यांच्या एक्सएआयचे 'ग्रोक' हे प्लॅटफॉर्म वेगाने लोकप्रिय होत असून त्यांनी बाजारात आपला हिस्सा वाढवण्यास सुरुवात केली आहे.

सिमिलरवेबच्या ताज्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात एआय चॅटबॉटच्या क्षेत्रात चॅटजीपीटीने एकहाती वर्चस्व गाजवले होते. मात्र, आता वापरकर्ते इतर पर्यायांकडे वळत आहेत. नोव्हेंबर महिन्यात चॅटजीपीटीच्या वेबसाईटवरील ट्रॅफिकमध्ये काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. त्याच वेळी गुगलच्या जेमिनी आणि परप्लेक्सिटी यांसारख्या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

गुगलने आपल्या एआय मॉडेलमध्ये केलेले महत्त्वाचे बदल आणि अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये जेमिनीचे केलेले इंटिग्रेशन याचा मोठा फायदा कंपनीला मिळत आहे. त्यामुळे सामान्य वापरकर्ते गुगलच्या एआय टूल्सकडे आकर्षित होत आहेत. दुसरीकडे, इलॉन मस्क यांचे 'ग्रोक' हे टूल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर उपलब्ध असल्याने त्यालाही चांगली प्रसिद्धी मिळत आहे. या स्पर्धकांमुळे चॅटजीपीटीच्या वर्चस्वाला आता खऱ्या अर्थाने आव्हान निर्माण झाले आहे.

अहवालातील माहितीनुसार, चॅटजीपीटी अजूनही मार्केट लिडर आहे, परंतु त्याची वाढ काहीशी मंदावली आहे. पूर्वी एआय चॅटबॉट वापरणाऱ्यांपैकी बहुतांश लोक फक्त चॅटजीपीटीवर अवलंबून होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. लोकांकडे आता एकापेक्षा जास्त आणि तितकेच सक्षम पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे येत्या काळात एआय क्षेत्रातील ही स्पर्धा आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.