लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी त्यांचे सहकारी सेवानिवृत्त मानद कॅप्टन सुभेदार परवेझ अहमद यांच्या परिवाराची भेट घेताना
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील सीमावर्ती भागाचा दौरा केला. तिथे त्यांनी पूंछ जिल्ह्यातील काही विभागांना भेट दिली आणि तिथे तैनात असलेल्या सैन्याच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. तसेच त्याठिकाणी तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधला. तसेच नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांच्या सज्जतेचा आढावा घेतला. जवानांचे उच्च मनोबल आणि सतर्कतेबद्दल लष्करप्रमुखांनी त्यांचे कौतुक केले.
या दौऱ्यात त्यांनी आपले माजी सहकारी सेवानिवृत्त मानद कॅप्टन सुभेदार परवेझ अहमद यांची भेट घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लष्करप्रमुखांनी या सीमावर्ती जिल्ह्यातील कामसार गावाला भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी १८ जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये सेवा बजावलेल्या अहमद यांची भेट घेतली.
जुने सहकारी
संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल द्विवेदी यांनी २००२ ते २००५ या काळात या बटालियनचे नेतृत्व केले होते. त्यावेळेसह इतर अनेक प्रसंगी या दोघांनी एकत्र काम केले आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी या बटालियनचे नेतृत्व करत होते. सुभेदार परवेझ अहमद मार्च १९९१ मध्ये सैन्यात सामील झाले आणि २५ वर्षांच्या सेवेनंतर मार्च २०१९ मध्ये निवृत्त झाले. निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्येही भूमिका बजावली. अशा आपल्या जुन्या सहकाऱ्याला भेटून लष्करप्रमुख द्विवेदीही आनंदी झाले.
कोण आहेत सुभेदार परवेझ अहमद?
सुभेदार परवेझ अहमद मार्च १९९१ मध्ये भारतीय लष्करात भरती झाले होते. त्यांनी २५ वर्षांची सेवा पूर्ण करून मार्च २०१९ मध्ये निवृत्ती स्वीकारली. आपल्या सेवाकाळात त्यांनी विविध लष्करी मोहिमांमध्ये आणि प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. अनेक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्यासोबतच त्यांनी अनेक विशेष लष्करी अभ्यासक्रम पूर्ण केले होते. विशेष अभ्यासक्रमांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यांच्या सेवेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये योगदान
निवृत्तीनंतरही सुभेदार परवेझ अहमद स्थानिक समुदायाशी जोडलेले राहिले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी या भागाच्या भौगोलिक माहितीचा वापर करून रसद पुरवठा आणि स्थानिक समन्वयासाठी सैन्याला मोलाची मदत केली होती. या मोहिमेतील त्यांच्या योगदानाबद्दल लष्कराकडून त्यांची दखल घेण्यात आली होती. समाजाप्रती असलेले त्यांचे सातत्यपूर्ण सेवाकार्य आणि लष्कराला दिलेल्या सहकार्याबद्दल जनरल द्विवेदी यांनी अहमद यांना 'व्हेटर्न अचिव्हर अवॉर्ड' देऊन सन्मानित केले.