जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात वीरमरण आलेल्या भारतीय लष्कराच्या १० जवानांना आज लष्करी इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. जम्मूत आयोजित पुष्पचक्र अर्पण सोहळ्यात वरिष्ठ लष्करी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहीदांना मानवंदना दिली.
या सोहळ्याला एअर कमोडोर ए. श्रीधर (AOC, जम्मू एअर फोर्स स्टेशन), भीम सेन तुती (IGP जम्मू झोन) आणि लेफ्टिनेंट जनरल पी. के. मिश्रा (GOC व्हाईट नाईट कोअर) यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अपघातात शहीद झालेल्या जवानांमध्ये सवार मोनू, सवार जोबनजीत सिंह, सवार मोहित, दफादार शैलेंद्र सिंह भदौरिया, शिपाई समिरन सिंह, शिपाई प्रद्युम्न लोहार, सवार सुधीर नरवाल, नायक हरे राम कुंवर, शिपाई अजय लाकरा आणि सवार रिंखिल बलियान यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, "डोडा येथील अपघातात आम्ही आमच्या शूर जवानांना गमावले, याचे मला खूप दुःख आहे. देशासाठी त्यांनी दिलेली सेवा सदैव स्मरणात राहील. जखमी जवान लवकर बरे व्हावेत, हीच प्रार्थना. बाधितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे."
ही दुर्घटना डोडा जिल्ह्यातील भद्रवाह येथील खन्नी टॉप परिसरात घडली. लष्कराच्या व्हाईट नाईट कोअरने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशनसाठी जवानांना घेऊन जाणारे वाहन खराब हवामान आणि दुर्गम प्रदेशातून जात असताना रस्त्यावरून घसरले आणि दरीत कोसळले. या अपघातात १० जवानांचा मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लष्कर आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले.
डोडाचे जिल्हाधिकारी (DC) हरविंदर सिंह यांनी सांगितले की, भद्रवाह-चंबा रस्त्यावर साचलेला बर्फ या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जखमी ११ जवानांपैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना विशेष उपचारांसाठी उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे. शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सन्मानाने पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.