'हृदयदीप' या बानू मुश्ताकलिखित कन्नड लघुकथासंग्रहाच्या 'हार्ट लॅम्प' या इंग्रजीतील अनुवादाला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार मिळाल्याने इथल्या मातीतील अस्सल साहित्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. व्यवस्थेशी दोन हात करून, प्रवाहाविरोधात जाण्याचं धैर्य दाखवून बानू यांनी हे यश मिळवलं असल्यानं त्याची दखल घेणं आवश्यक ठरतं. तीन एप्रिल १९४८ रोजी कर्नाटकातील हसन येथे जन्मलेल्या बानू यांनी गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ लेखन केलं आहे.
चौकटीमध्ये अडकल्याने प्रगतीची, विकासाची दारे बंद झालेल्या आणि त्यानंतर पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हान दिलेल्या महिलांच्या कथा त्यांनी आपल्या साहित्यात मांडल्या. "जो आवाज सुरुवातीला दाबण्याचा प्रयत्न झाला; पण नंतर पेटून उठला त्या आवाजाला हा पुरस्कार समर्पित करीत आहे. गेली अनेक दशके सुरू असलेल्या महिलांच्या संघर्षाचे चीज झाले आहे," असे त्यांनी बुकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हटले आहे.
साहित्य हे रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब असतं, या न्यायानं मुस्लिम समाजातील एका दीर्घ काळाची वेदना मुश्ताक यांनी साहित्यात मांडली आहे. मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुश्ताक यांची पहिली ओळख उर्दूशी झाली; नंतर वडिलांनी त्यांना शिवमोग्गा येथे कन्नड माध्यमाच्या मिशनरी शाळेत घातले. तेथे कन्नड भाषेशी त्यांची मैत्री झाली आणि भविष्यात अभिव्यक्तीची भाषा म्हणून कन्नडलाच त्यांनी प्राधान्य दिलं. शाळेत असताना त्यांनी पहिल्यांदा लेखन केले. कमी वयामध्ये होणारे मुलींचे विवाह पाहून त्या व्यथित झाल्या.
बानू यांनी निग्रहानं शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. रूढीवादी मुस्लिम वातावरण, बुरख्याच्या आड त्यांचे आयुष्य सुरू होते. काही वेगळं करण्याची मनीषा दूर राहून इतर समकालीन मुस्लिम महिलांप्रमाणेच आपले आयुष्य पुढे सुरू राहणार, असे त्यांना वाटू लागले. मात्र, ही चौकट मोडण्याचा निर्धार त्यांनी केला आणि या अस्वस्थतेतच त्यांचे लेखन सुरू झाले. सहा कथासंग्रह, एक कादंबरी, एक लेखसंग्रह, एक कवितासंग्रह असे लेखन त्यांनी केले.
ऊर्दू, हिंदी, तमीळ, मल्याळी, इंग्रजी अशा भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे. वकिलोचे शिक्षण घेतलेल्या बानू यांनी 'लंकेश पत्रिका' नावाच्या एका स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही काम केले. याशिवाय काही काळ बंगळुर येथे नभोवाणीसाठी काम केले. १९८० च्या दशकापासून त्या विविध चळवळींमध्ये सक्रिय होत्या. सन २००० मध्ये मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये प्रवेश मिळण्याच्या हक्काची बाजू लढविल्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर समाजाने तीन महिन्यांचा बहिष्कार घातला होता. यावेळी त्यांना अनेक धमक्यांचे फोन आले, तर त्यांच्यावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला.
चिक्कमंगळूर येथील बाबा बुदनगिरी दर्याला मुस्लिमांनी भेट देण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांविरोधात बानू यांनी सन २००० मध्ये 'कोमू सौहार्द वेदिके' या संस्थेसोबत आंदोलन केले. मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्याच्या अधिकाराचे बानू यांनी त्यावेळी समर्थन केले होते. सामाजिक जीवनातही त्या कायम सक्रिय आहेत.
लेखक, साहित्यिक समाजात वावरत असताना एखाद्या मुद्द्यावरून विशिष्ट भूमिका घेत नसल्याचे वारंवार म्हटले जाते. मात्र, बानू मुश्ताक यांनी वेगवेगळ्या काळामध्ये सातत्याने भूमिका घेतली आणि एक कार्यकर्त्या म्हणून रस्त्यावर उतरल्या. रूढी, परंपरांविरोधात त्यांनी नेहमीच चिकित्सक प्रश्न उपस्थित केले. "कोणतीही गोष्ट लहान नसते, माणसाच्या अनुभवांच्या गाठोड्यात प्रत्येक धागा संपूर्णतचं ओझं वाहत असतो. या अनुभवाच्या शिदोरीतूनच 'हृदयदीप' हे पुस्तक तयार झाले आहे. एकमेकांमध्ये दुही माजवणाऱ्या सध्याच्या जगात, साहित्य हे अजूनही एक पवित्र स्थान आहे. पानांच्या रूपातून आपण एकमेकांच्या मनात स्थान निर्माण करू शकतो," असे बुकर मिळाल्यावर त्या म्हणाल्या होत्या.