पहलगाम हल्ल्यावर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची कतार आणि फ्रान्समध्ये मोर्चेबांधणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताचा दहशतवादाविरुद्धचा ठाम लढा आणि ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगासमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरात दौरे करत आहे. दरम्यान भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी पॅरिसमध्ये फ्रान्सच्या प्रमुख विचारमंचांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने कतारचे परराष्ट्र राज्यमंत्री मोहम्मद बिन अब्दुलअझीझ बिन सालेह अल खुलैफी यांची भेट घेतली. 

पॅरिस दौरा 
माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे नऊ सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. गेल्या महिन्यातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणावर प्रकाश टाकण्यासाठी हे शिष्टमंडळ युरोपीय देशांच्या सहा राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहे.

भारताचे फ्रान्समधील राजदूत संजीव सिंगला यांनी सांगितले, फ्रान्स हा भारताचा धोरणात्मक भागीदार आहे. पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला त्यांचे समर्थन आहे, असे त्यांनी बैठकीच्या सुरुवातीला नमूद केले.

यापूर्वी, शिष्टमंडळाने पॅरिसमधील भारतीय दूतावासात एका बैठकीत फ्रान्समधील विचारमंच, खासदार आणि इतर गटांशी संवाद साधला.  रविशंकर प्रसाद यावेळी म्हटले की, “आमचे ध्येय स्पष्ट आहे. भारताला शांतता आणि सौहार्द हवे आहे. पण त्यासाठी निष्पाप भारतीयांच्या प्राणांची किंमत मोजावी लागणार नाही.” 

“पहलगामसारखा क्रूर हल्ला झाला, तर त्याची किंमत दोषींना मोजावी लागेल. दहशतवादाबाबत संपूर्ण जगाने एकत्र आले पाहिजे. हे जागतिक संकट आहे, जागतिक कर्करोग आहे,” असे ते म्हणाले.

या बहुपक्षीय शिष्टमंडळात खासदार दग्गुबती पुरंदेश्वरी, प्रियांका चतुर्वेदी, गुलाम अली खटाणा, डॉ. अमर सिंग, समिक भट्टाचार्य, एम. थंबीदुराई, माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर आणि माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राजदूत पंकज सरन यांचा समावेश आहे. फ्रान्सनंतर हे शिष्टमंडळ इटलीकडे रवाना होईल. त्यानंतर युनायटेड किंगडम, जर्मनी, डेन्मार्क आणि युरोपीय संघाचा दौरा करेल.

कतार दौरा 
सोमवारी सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने कतारचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मोहम्मद बिन अब्दुलअझीझ बिन सालेह अल खुलैफी यांची भेट घेतली. या भेटीत पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहनशीलतेच्या राष्ट्रीय एकमतावर भारताचे मत मांडले.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ शनिवारी रात्री उशिरा कतारला पोहोचले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आणि ऑपरेशन सिंदूरच्या महत्त्वावर आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद साधण्यासाठी भारत सरकारचा हा उपक्रम आहे.

“आज सकाळी बहुपक्षीय शिष्टमंडळाने परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ. मोहम्मद बिन अब्दुलअझीझ बिन सालेह अल खुलैफी यांची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहनशीलतेच्या राष्ट्रीय एकमतावर भारताचे मत मांडले,” असे कतारमधील भारतीय दूतावासाने एक्सवर पोस्ट केले.

रविवारी शिष्टमंडळाने कतारच्या शूरा परिषदेच्या उपसभापती डॉ. हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली. २२ एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याने २६ जणांचा बळी घेतला. या हल्ल्यानंतर भारताच्या राष्ट्रीय संतापाची भावना त्यांनी मांडली. सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या एकजुटीच्या भूमिकेवर शिष्टमंडळाने भर दिला.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह या शिष्टमंडळात भाजप नेते राजीव प्रताप रुडी, अनुराग ठाकूर, व्ही. मुरलीधरन, काँग्रेस नेते मनीष तिवारी, आनंद शर्मा, टीडीपी नेते लवू श्रीकृष्ण देवरायलू, आप नेते विक्रमजीत सिंग साहनी आणि माजी राजनयिक सय्यद अकबरुद्दीन यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ पुढे दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट देणार आहे.