इस्राईलने अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

 

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने मांडलेला युद्धविराम प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला आहे. या निर्णयामुळे गाझामधील इस्राईली  हल्ले आणि तणाव पुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. इस्राईली अधिकाऱ्यांनी सांगितलं, की अमेरिकन मध्यस्थांनी रात्रीच्या वेळी हा प्रस्ताव मांडला होता, पण इस्राईलने तो स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच गाझावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा हेतू पुन्हा एकदा ठामपणे मांडला आहे.

अमेरिकेचा प्रस्ताव काय होता?
अमेरिकेने गाझामधील इस्राईली  हल्ले थांबवण्यासाठी आणि 10 बंधकांची सुटका करण्यासाठी एक प्रस्ताव मांडला होता. यानुसार, हमासने या बंधकांची सुटका करावी, त्याबदल्यात गाझामध्ये मानवीय मदत पोहोचवली जाईल आणि 70 दिवसांचा युद्धविराम लागू केला जाईल. यानंतर कायमस्वरूपी शांततेच्या दृष्टीने चर्चा सुरू होईल. मात्र, इस्राईलने हा प्रस्ताव नाकारला. एका वरिष्ठ इस्राईली अधिकाऱ्याने सांगितलं, “हा करार म्हणजे हमाससमोर शरणागती पत्करण्यासारखं होतं. आम्ही हे मान्य करू शकत नाही.”

इस्राईलचा ‘विटकॉफ फ्रेमवर्क’
 नेतन्याहू यांनी मार्च २०२५ मध्ये मांडलेल्या ‘विटकॉफ फ्रेमवर्क’ प्रस्तावावर इस्राईल ठाम आहे. या प्रस्तावात ५० दिवसांचा युद्धविराम, काही इस्राईली बंधकांची सुटका आणि दीर्घकालीन युद्धविरामावर चर्चेचा समावेश आहे. मात्र, यात गाझातून इस्राईली सैन्य मागे घेणे किंवा पॅलेस्टाईन कैद्यांची सुटका याबाबत कोणताही उल्लेख नाही. या दोन मागण्या हमासच्या प्रमुख मागण्या असल्याने दोन्ही बाजूंमधील चर्चा रखडली आहे.

युद्धविरामाच्या चर्चेला खीळ
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, इस्राईल  आणि हमास यांच्यातील परस्परविरोधी मागण्यांमुळे कोणताही तोडगा निघालेला नाही. हमासला गाझातून इस्राईल ी सैन्याची पूर्ण माघार आणि फिलिस्तीनी कैद्यांची सुटका हवी आहे, तर इस्राईल  हमासचा पूर्ण नायनाट आणि गाझावर नियंत्रण ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. 

७ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्राईलवर केलेल्या हल्ल्यात सुमारे १, २००  लोक मारले गेले आणि 250 जणांना ओलीस ठेवण्यात आलं. याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने गाझावर हवाई आणि भूहल्ले सुरू केले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, या युद्धात आतापर्यंत ५१, २४०  पेक्षा जास्त पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. यात बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे. गाझातील ७० टक्के इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, २१ लाख लोक विस्थापित झाले आहेत. मानवीय मदत, अन्न, पाणी आणि औषधांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वीही हमासच्या युद्धविराम प्रस्तावांना वेडसर ठरवत नाकारलं आहे. एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते,  “हमासचा पूर्ण नायनाटहाच इस्राईल च्या सुरक्षेचा एकमेव मार्ग आहे. हमासला सत्तेत ठेवणं म्हणजे आणखी एका हत्याकांडाला आमंत्रण देण्यासारखं आहे.” इस्राईलने रफाह शहरातही सैन्य कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. या शहरात लाखो विस्थापित पॅलेस्टाईन नागरिक आश्रयाला आहेत.