Bengal Election : विजयी जल्लोषातही जपली संवेदनशीलता; भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम अंत्यविधीसाठी केली वाट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
पश्चिम बंगालमधील हृदयद्रावक घटना
पश्चिम बंगालमधील हृदयद्रावक घटना

 

पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चिंताजनक बातम्या समोर आल्या होत्या. राजकीय कार्यकर्त्यांमधील हाणामारी आणि तोडफोडीच्या घटनांमुळे देशातील मुस्लिमांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. पण आता बंगालमधूनच एक अतिशय दिलासादायक चित्र समोर आले आहे. द्वेष पसरवणाऱ्यांसाठी ही घटना म्हणजे एक सणसणीत चपराक आहे.

जेव्हा राजकारणापेक्षा माणुसकी मोठी ठरते

अशरफ हुसेन यांनी 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ भाजपच्या युवा कार्यकर्त्यांच्या विजयाच्या जल्लोषाचा आहे. सर्वत्र गुलाल उधळला जात होता. डीजेचा दणदणाट सुरू होता आणि कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत होते. त्याचवेळी एका वळणावर एका मुस्लिम व्यक्तीचा जनाजा तिथे पोहोचला.

जनाजा जवळ येताच तिथले संपूर्ण चित्र बदलून गेले. जल्लोष करणाऱ्या तरुणांनी नुसता आवाजच कमी केला नाही, तर स्वतःहून पुढे येऊन जनाजाला वाट करून दिली. गर्दीतून हा जनाजा अत्यंत सन्मानाने पुढे जात असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. याच वेळी काही जणांनी धार्मिक घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना लगेच अडवले आणि शांत राहण्यास सांगितले.

'आम्हाला असाच हिंदुस्थान हवाय!'

हा व्हिडिओ शेअर करताना अशरफ हुसेन यांनी अत्यंत मार्मिक भावना व्यक्त केल्या आहेत. "हार-जीत तर होतच असते, पण अशा गोष्टी खऱ्या अर्थाने मने जिंकतात. आम्हाला असाच हिंदुस्थान हवाय," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत पावणेदोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर एक हजारांहून अधिक जणांनी तो रिट्विट केला आहे. या सामाजिक सलोख्याचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.

घाबरण्याची नाही, तर विचार बदलण्याची गरज

'आवाज द व्हॉईस'चे मुख्य संपादक आतिर खान यांनीही या संपूर्ण परिस्थितीवर आपले स्पष्ट मत मांडले आहे. "बंगाल किंवा आसाममध्ये भाजपच्या विजयामुळे मुस्लिमांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. भाजप असो वा कोणताही अन्य पक्ष, तो देशाच्या संविधान आणि कायद्यापेक्षा मोठा नाही," असे ते म्हणाले.

मुस्लिमांनी आता आपल्या राजकीय विचारांमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. "आपण जर जुन्याच विचारांना चिकटून राहिलो, तर 'व्हिक्टिमहूड सिंड्रोम' (नेहमी स्वतःला पीडित मानण्याची मानसिकता) मधून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही. ही वेळ घाबरण्याची नाही, तर नवीन वास्तव स्वीकारून पुढे जाण्याची आहे," असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

सोशल मीडियावर सकारात्मकतेची लाट

गेल्या पंधरा वर्षांत निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात अशा बातम्या मोठी आशा निर्माण करतात. बहुतांश वेळा सोशल मीडियावर केवळ द्वेष पसरवणाऱ्या गोष्टीच व्हायरल होतात. पण आजवर तळागाळातील समाजात भाईचारा जिवंत असल्याचे बंगालमधील या व्हिडिओने दाखवून दिले आहे. एका बाजूला जल्लोषाचे आणि दुसऱ्या बाजूला दुःखाचे वातावरण असताना, एकमेकांच्या भावनांचा आदर करणे हेच माणुसकीचे खरे लक्षण आहे.

धर्माच्या नावाखाली दरी निर्माण करू पाहणाऱ्या सर्वांसाठी हा व्हिडिओ एक मोठा धडा आहे. निवडणुकांचे निकाल कोणाच्याही बाजूने लागोत, पण परस्पर आदराची ही परंपरा कधीच खंडित होऊ नये, हे बंगालच्या या चित्राने सिद्ध केले आहे. सर्वसामान्य माणूस ज्याची कल्पना करतो, तो हाच खरा हिंदुस्थान आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter