चांदोरीतील प्रसिद्ध बारा बलुतेदारांची श्रीरामनवमी

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 12 d ago
चांदोरी येथील मंदिरातील आकर्षक श्रीराम मूर्ती
चांदोरी येथील मंदिरातील आकर्षक श्रीराम मूर्ती

 

श्रीरामजन्माचा उत्सव आजमितीला पारंपरिक जोखडात अडकलेला असताना सर्व जातीधर्मियांचा मिळून ‘एक रामजन्म’ ही संकल्पना चांदोरी गावाने चारशेहुन अधिक वर्षांपासून जपली आहे. बुधवारी (ता. १७) दुपारी १२ वाजता एका अनोख्या पद्धतीने श्रीरामाचा जन्म होणार आहे. सुतारापासून कुंभारापर्यंत बारा बलुतेदार एकत्र येऊन हा श्रीरामजन्ममोत्सव साजरा करीत असल्याने विषमतेच्या जमान्यात त्याचे वेगळे महत्व आहे. 

सुतारकाम करणाऱ्या बांधवाने केलेली रथाची जोडणी, कुंभार बांधवाने खास श्रीराम जन्मोत्सवासाठी बनवलेला रांजण आणि नाभिक बांधवांकडून सूर्याला आरसा दाखवून होत असलेला श्रीरामजन्मोत्सव अशी अनोखी परंपरा चारशे वर्षांपासून चांदोरी गावाने जपली आहे.

आजही हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. या उत्सवाची अख्यायिका आहे. यावनी साम्राज्यात विठ्ठलपंत बल्लाळ यांना प्रवासादरम्यान संगमनेर, जोर्वे गावाजवळील प्रवरा नदीपात्रात अर्घ्य देताना रामपंचायतनाची मूर्ती हाती आली. त्यात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व सिता श्री रामाच्या मांडीवर बसलेल्या अवस्थेत आहे.

वरील पंचायतयान घेत काही दिवस पंचवटी (नाशिक) मध्ये राहिले. परंतु, या ठिकाणी त्यांना मनशांती न मिळाल्याने फिरत चांदोरी (पूर्वीचे चंद्रावती) गावात आले. या ठिकाणी ध्यान धारणा करण्यास उत्तम वाटल्याने ते येथेच स्थायिक झाले. त्यांचे मंदिर बांधण्याचा विचार करून त्याकाळचे चंद्रावती (आजचे चांदोरी) या गावी मंदिर बांधले.

तेच हे श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर दक्षिणाभिमुख असून, पूर्णतः दगडी व सागवानी लाकडात बांधलेले आहे. मठात लाकडी देव्हारा असून, त्यात पितळी पाळण्यात श्रीराम पंचायतन विराजीत आहे. समोरील सभामंडपात काळ्या पाषाणातील दास मारूतीदेखील आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणारा हा उत्सव रामजन्माच्या दिवशी मठाधिपतीच्या रथारूढाने पिंपळपाराला अकरा प्रदक्षिणा घालून सुरू होतो. मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी हे पूर्वीचे बल्लाळ, नंतर गोसावी आणि आता मठाधिपती असल्याने मठकरी किंवा मटकरी आहेत.  

दरम्यान, दुपारी रामजन्म झाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता रामरक्षा वाचन, रात्री ९ वाजता प्रसिद्ध ऋषीकेश रिकामे यांचा हरी संध्या कार्यक्रम मठात होणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्‍वस्त श्रीकांत मटकरी, अजय मटकरी, प्रमोद मटकरी, भूषण मटकरी आदींनी केले आहे.

रामजन्माची अनोखी पद्धत
मंदिराच्या सभागृहात रामपंचायतन पूर्वाभिमुख ठेवले जातात. माध्यान्हीच्या समयी नाभिक समाजाचे मानकरी हातात आरसा घेऊन दूरवर उभे राहतात व आरशावर सूर्याचे प्रतिबिंब आले की ती प्रकाशकिरणे श्रीरामचंद्रांच्या मूर्तीच्या मुखकमलावर पडताच श्रीराम जन्म होतो. मुखकमलावर प्रकाश किरणे पडताच उपस्थित भाविकांकडून गुलाल-खोबरे व फुलांची उधळण केली जाते. श्रीरामनामाचा जयघोष होतो आणि हा जन्मोत्सव साजरा केला जातो.

"ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व असलेल्या चांदोरीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रामजन्मोत्सव साजरा केला जातो. राम जन्मासाठी भाविकांचा उत्साह आहे."- अजय मटकरी, चांदोरी

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter