Petrol Diesel Price Hike : इंधन दरवाढीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला महत्त्वाचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 58 m ago
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीला जागतिक संकट म्हटले आहे. इंधनाचा तुटवडा होणार या भीतीने नागरिकांनी पेट्रोल-डिझेलचा नको तितका साठा करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. साठवणुकीमुळे पुरवठा साखळीवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.६१ रुपये आणि डिझेलच्या दरात २.७१ रुपयांची वाढ करण्यात आली. इराण संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने गेल्या दोन आठवड्यांत झालेली ही चौथी दरवाढ आहे. या वाढीमुळे देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत निवडणुका संपताच सरकारने ग्राहकांवर बोजा टाकल्याचा आरोप केला आहे.

इंधनाचा साठा न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
विरोधी पक्षाच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा केवळ भारताचा प्रश्न नसून जागतिक संकट आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जगातील अनेक देशांनी इंधनाबाबत आणीबाणी घोषित केली आहे. काही ठिकाणी दोन दिवसांचे लॉकडाऊनही लावण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडेही पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होत असून काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

शेतकरी सध्याच्या हंगामात कॅनमधून डिझेलची मागणी करत आहेत, त्यांना ते पुरवले जात आहे. मात्र, भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीने मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, पंपांवर गोंधळ घालणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

NEET पेपर लीक प्रकरणावर कठोर भूमिका 
NEET UG-2026 पेपर लीक वाद आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय केला आहे. केंद्र सरकार आणि परीक्षा प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांना अटक केली आहे. आगामी पुनर्रचना केलेली परीक्षा (Retest) अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दावा केला आहे की, नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून त्यांच्या १८ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. याशिवाय, आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाशिक, पुणे आणि संभाजीनगरच्या जागांवर चर्चा सुरू असून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल.