काश्मिरी पंडित, मुस्लिमांतील दुरावा कमी होणार

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
सांस्कृतिक कार्यक्रमातून उभारला जाणार संवादाचा पूल
सांस्कृतिक कार्यक्रमातून उभारला जाणार संवादाचा पूल

 

जम्मू (पीटीआय) : जम्मू- काश्मीरमध्ये आता काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांमधील दुरावा कमी होणार आहे, यासाठी निमित्त ठरले आहे ‘योम-ए-सौत-ए- काश्मीर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. या दोन्ही समुदायांतील कलाकार, लेखक, कवी आणि विद्वान मंडळी एकाच व्यासपीठावर विविध कलांचे प्रदर्शन करणार आहेत. 

गयूर फाउंडेशन आणि जम्मू- काश्मीर अॅकॅडमी ऑफ आर्ट, कल्चर अँड लँग्वेज या संस्थांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ख्यातनाम लेखक- कवी सय्यद गुलाम रसूल गयूर यांच्या नावाने हे फाउंडेशन स्थापन करण्यात आले आहे. गयूर यांची २००५ मध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. फाउंडेशनचे अध्यक्ष शौकत गयूर आंद्रेबी म्हणाले की, ‘‘ काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांमुळे हे दोन समुदाय परस्परांपासून दुरावले होते, त्यांना आता यानिमित्ताने एकत्र आणले जाणार आहे.’’ या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या लेखक आणि कवींमध्ये पी.एन.त्रिसाल, ए.के. दाराकशान आंद्रेबी, पी. एन. शाद, बालकृष्ण सानसासी, पी.एस.बेताब आणि वाली मोहंमद असीर किश्तवाडी आणि गायक कैसर निजामी, दिपाली वत्तल आणि झाहिदा तरन्नुम यांचा समावेश असेल.

याबाबत लेखिका आणि संयोजक पी. एल. पंडिता म्हणाल्या, “या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही समुदायांमध्ये बौद्धिक चर्चा होईल. भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील अशी आशा आम्हाला आहे. दोन्ही समुदायांनी यात उत्साहाने सहभागी व्हावे.”