'तहव्वुर राणाला फॅसेलिटी नको, फाशी द्या' - तौफिक मोहम्मद

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 19 d ago
तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणावर बोलताना २६/११ च्या हल्ल्यातील जखमींना वाचवणारे तौफिक मोहम्मद.
तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणावर बोलताना २६/११ च्या हल्ल्यातील जखमींना वाचवणारे तौफिक मोहम्मद.

 

मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या झाल्या आहेत. याच कारण ठरतयं २६/११ च्या हल्ल्याच्या मुख्य आरोपींपैकी एक असणाऱ्या तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण. ९ मार्चला रात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेने राणाला भारतात आणले. राणाचे प्रत्यार्पण हे भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याचं मोठं यश मानलं जात आहे.

मुंबईत नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटल, ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे याठिकानावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. २६/११ च्या या हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर शेकडो जन जखमी झाले होते. सेंट जॉर्ज हॉस्पिटल समोरील छोटू चायवाला म्हणून प्रसिद्ध असलेला मोहम्मद तौफीक शेख दहशतवादी हल्ल्यात थोडक्यात बचावला होता. या हल्ल्यात तौफिक यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले होते. नुकतीच त्यांनी राणाच्या प्रत्यार्पणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  

फॅसेलिटी नको फाशी द्या - तौफिक मोहम्मद 
तब्बल १६ वर्षांनंतर तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे. यावर देशातील विशेषतः मुस्लिम कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. २६/११ हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेले तौफिक मोहम्मद १६ वर्षानंतर पुन्हा माध्यमांच्या समोर आले आहेत. यावेळी तेदेखील असवस्थ असल्याचे दिसले. माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

तौफिक मोहम्मद म्हणाले, “सरकारने २६/११ च्या मुख्य आरोपींपैकी एक असणाऱ्या तहव्वूर ला कोणतीही फॅसेलिटी देऊ नये. तो हीरो नाही तर राक्षस आहे. २६/११ च्या हल्ल्यात कोणाची आई, बहिण, भाऊ, वडील मारले गेले आहेत. त्याला कोणतीही सहानुभूती न देता वेगळी कोठडी न देता सरकारने त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. या दहशतवाद्याला सरकारने १५ दिवसाच्या आत फाशी द्यावी.”

पाकिस्तानला धडा शिकवा
तौफिक पुढे म्हणाले, “दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने वेगळा कायदा बनवला पाहिजे. पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना पाठीशी घालतोय. याचे दुष्परिणाम तिथल्या लोकांना भोगावे लागतात. राणाला अशी कठोर शिक्षा द्यावी की इतर दहशतवाद्यांनी भीतीने थरथर कापायला हवं.” 

इस्लाम कोणालाही मारण्याची शिकवण देत नाही  
दहशतवादी हा कोणत्याही जाती धर्माचा नसतो. त्याला दहशतवादी म्हणूनच सर्वांनी ओळखलं पाहिजे. तौफिक म्हणतात, “राणाचा आणि माझा धर्म एक आहे. राणाने धर्माच्या नावाचा वापर करून सामान्य नागरिकांवर गोळ्या झाडणाऱ्यांना मदत केली. इस्लाम कोणालाही मारण्याची शिकवण देत नाही. इस्लाम हा शांती आणि प्रेमाचा संदेश देणारा धर्म आहे. धर्माच्या नावाखाली हिंसा करणं ही कोणत्याही धर्माची शिकवण नाही. आम्हाला भारतीय मुसलमान असल्याचा अभिमान आहे. कोणत्याही दहशतवाद्याला कोठर शिक्षा मिळाली पाहिजे.” 

२६/११ च्या हल्ल्याविषयी तौफिक यांच्या आठवणी 
या हल्ल्याविषयी तौफिक सांगतात, “२६/११ च्या रात्री मी चहाचे पैसे आणण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेलो होतो. मी तेव्हा १९/२० वर्षांचा असेन. रात्रीचे ९: ५४ मिनिट झाले असतील. स्टेशनवर त्यावेळी ४००० पेक्षा जास्त लोक होते. बकरी ईदचा महिना होता. त्यामुळे मुस्लिम समाजाचे आणि इतर नागरिक घरी जाण्यासाठी तिकीट काढण्याच्या लाइनमध्य उभे होते. त्यावेळी ऑनलाइन तिकीट नव्हत. तिकीट काढण्यासाठी गर्दी असल्याने तिकीट मास्टरने मला काही वेळाने पैसे घेऊन जाण्यास सांगितले. त्यांचं ऐकून मी रेल्वे स्थानकाच्या बाहेर माझ्या मित्राच्या दुकानात उभा राहिलो. मला आजही आठवतं त्या दिवशी भारत आणि इंग्लंडची क्रिकेट मॅच सुरू होती. अचानक स्टेशनमध्ये फटाक्यांचा आवाज आला. मला वाटलं की इंडियाने मॅच जिंकली म्हणून फटाके फोडत असतील. पण स्टेशनमध्ये कोण का फटाके फोडेल अस मला वाटलं. फटाक्यांचा आवाज वाढत असल्याने  मी ते पाहण्यासाठी पुन्हा स्टेशनमध्ये गेलो. त्यावेळी त्या आतंकवाद्यांच्या दोन्ही हातात बंदुका आणि पाठीवर बॅग होत्या. ते अंदाधुंद फायरिंग करत होते."

ते पुढे म्हणतात, " ते फायरिंग बघून मी पटकन तिकीट मास्टरांना सांगितलं गेट लावून घ्या कोणीतरी बॉम्ब फोडत आहे. त्यावर त्यांनी मला सांगितलं शॉट सर्किट झालं असेल अशी चेष्टा करू नकोस पोलिस मारतील. मी त्यांना म्हटल चेष्टा नाही करत, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. गेट लावून घ्या. नंतर मी लोकांना ओरडून सांगत होतो प्लॅटफॉर्म मधून बाहेर पडा. यानंतर मी पोलिसांना फोन करत हल्ल्याची माहिती दिली.” 

या स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात अजमल अमीर, कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग होता. या दहशतवाद्यांनी स्टेशनवर बेधुंद गोळीबार केला होता. यामध्ये ५८ लोकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी अजमल अमीर कसाबला पकडलं होतं पण त्यांच्या दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला होता.

शेकडो लोकांचे प्राण वाचवणारे तौफिक 
पाकिस्तानी दहशतवादी लोकांना निर्दयीपणे मारत होते. संपूर्ण स्टेशन सुन्न पडलं होतं. लोकांचे जीव जात होते. त्यांना वाचवण्यासाठी कोणी नव्हत. या परिस्थितीविषयी तौफिक सांगतात, “त्यांच्याकडे असणाऱ्या बंदुकांना बघून सुरुवातीला मला कमांडो आहेत का असं वाटलं. पण ते निर्दयीपणे लोकांना मारत होते. ती माणसं नाही तर राक्षसं होती. त्यातील एक जण (कसाब) माझ्याच दिशेने येत होता. त्याने मला शिव्या दिल्या. मी पण मारणार असं मला वाटलं होतं. त्याने माझ्यावर ३ बुलेट फायर केल्या. पण देवाच्या कृपेने मी वाचलो. मग मी स्टेशन मास्टरला सांगून लोकांचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पडलो.”

 
पुढे ते सांगतात, “मी घरी फोन करून बायकोला सांगितलं होत की आज मी घरी येणार नाही. गोळीबारामुळे स्टेशनमधील काचा तुटल्या होत्या. त्या काचा स्टेशन मास्टरांना लागल्या होत्या. संपूर्ण स्टेशन रक्ताने भरलं होतं. लोक जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते. अनेक लोक जखमी झाले होते. मला जखमी लोकांना वाचवायचे होते. मी जखमी लोकांना वाचवण्यासाठी हातगाडीचा वापर केला. लोकांना हातगाडीवर झोपवून सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आणि भायखळाच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले.” 

हा प्रसंग अंगावर काटा आणणारा असला तरी तौफिक यांनी मोठ्या धैर्याने परिस्थिती सांभाळली. त्यांनी मानवतेला सर्वोतोपरी मानून जात धर्म न बघता नागरिकांचे प्राण वाचवले. यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले. या प्रकरणात तौफिक यांनी अनेक वेळा क्राइम ब्रांचमध्ये साक्ष दिली आहे. 

ते म्हणतात, "भारत ही माझी जन्मभूमी आहे. भारतावर झालेला हल्ला माझ्यावर झालेला हल्ला आहे. अडचणीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याची शिकवण मला माझ्या धर्माने दिली आहे. मी कोणतीही अपेक्षा न बाळगता मी जखमी लोकांना मदत केली. या मदतीसाठी मला आजपर्यंत विविध स्तरावरून एकूण  २७ पुरस्कार मिळाले आहेत. माझ्या कामाचे कौतुक करताना त्यावेळी रेल्वे व्यवस्थापकांनी मला ५००० रुपयांची मदत केली होती." 

पुढे ते म्हणतात, "मी आजही सर्वसाधारण माणूस आहे, आजही माझी चहाची गाडी आहे. त्यावेळी मला प्रशासनाने बरीच वचनं दिली होती. अधिकारी म्हणायचे तुम्ही खूप चांगलं काम केलं तुम्हाला शासन काम देईल, वगैरे..वगैरे. पण मला आज १६ वर्ष झाली कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. मला मदत मिळाली नाही याचं दुःख नाही. पण सरकारने या राणावर खर्च न करता देशातील गरिबांसाठी काही तरी करायला पाहिजे. यामुळे आम्हाला चांगलं जीवन जगता येईल." 
 
 -फजल पठाण 
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter