आवाज द व्हॉइस, मुंबई
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत सत्तेची गणिते जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला, तरी बहुमतासाठी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत आपल्या नगरसेवकांची फोडाफोडी होऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (१७ जानेवारी २०२६) सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे.
मुंबईत २२७ जागांच्या सभागृहात बहुमतासाठी ११४ हा आकडा आवश्यक आहे. भाजपने ८९ जागा जिंकल्या असून त्या बहुमतापेक्षा २५ ने कमी आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६५, काँग्रेसने २४, एमआयएमने ८ आणि मनसेने ६ जागा मिळवल्या आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना 'किंगमेकर'च्या भूमिकेत असून, त्यांच्या समर्थनाशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणे अशक्य आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "पुढील महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना नवीन जबाबदाऱ्या देण्यासाठी ही बैठक बोलावली आहे." तर उपमुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने नगरसेवकांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.
मात्र, राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की, शिवसेनेने महापौराच्या पदासाठी आणि स्थायी समितीच्या महत्त्वाच्या जागांसाठी आग्रह धरला आहे. "बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईचा महापौर शिवसेनेचाच असावा, अशी आमची इच्छा आहे," असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. जोपर्यंत महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे नगरसेवक हॉटेलमध्येच राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारच्या 'घोडेबाजारा'ची शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, "आम्ही आणि एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय घेऊ. महापौर कोण आणि किती काळासाठी असेल, हे आम्ही मिळून ठरवू. आम्ही दोघे मिळून मुंबईचा कारभार चालवू."
या सगळ्या घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. ते म्हणाले की, "जे दुसऱ्यांचे लोक घेऊन पळून गेले, त्यांना आता स्वतःचे लोक पळून जातील की काय, अशी भीती वाटू लागली आहे." भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा 'वापरा आणि फेकून द्या' या धोरणाने वापर केला जाईल, असे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तवले.