आखाती देशांमधील संघर्षामुळे १,२०० भारतीय विमाने रद्द; मंत्रालयाने दिले प्रवाशांना महत्त्वाचे आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पश्चिम आशियातील (West Asia) वेगाने बदलणाऱ्या आणि तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक हवाई वाहतुकीला मोठा तडाखा बसला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांची १,२०० पेक्षा जास्त आणि परदेशी विमान कंपन्यांची तब्बल ३,८८० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्षामुळे अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र (Airspace) बंद केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. ज्या ठिकाणी प्रवाशांची संख्या जास्त आहे, तिथे विमान कंपन्यांना अतिरिक्त विमाने तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आजचे नियोजन आणि पर्यायी मार्ग

विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी भारतीय विमान कंपन्या आज ५८ विशेष उड्डाणे चालवणार आहेत. यामध्ये इंडिगोची ३० आणि एअर इंडिया तसेच एअर इंडिया एक्सप्रेसची २३ उड्डाणे समाविष्ट आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भारतीय कंपन्यांनी आपल्या वेळापत्रकात बदल केले असून, प्रतिबंधित हवाई क्षेत्र टाळून पर्यायी मार्गांनी (Alternative Routings) उड्डाणे सुरू केली आहेत.

तिकीट दरांवर नियंत्रण

उड्डाणे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर विमान तिकिटांच्या दरात अवाजवी वाढ होऊ नये, यासाठी मंत्रालय विमान कंपन्यांच्या सतत संपर्कात आहे. तिकीट दरांवर सरकारची करडी नजर असून, प्रवाशांना परतावा (Refund) मिळवण्यासाठी किंवा प्रवासाची तारीख बदलण्यासाठी सहकार्य करण्याचे आदेश सर्व एअरलाईन्सना देण्यात आले आहेत.

मंत्रालयाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या उड्डाणाची सद्यस्थिती संबंधित विमान कंपनीकडून तपासून घ्यावी आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा. सद्यस्थितीत ७ पेक्षा जास्त देशांनी आपले हवाई क्षेत्र अंशतः किंवा पूर्णपणे बंद केले असून, जीपीएस (GPS) जामिंगसारख्या तांत्रिक अडचणींमुळेही विमान प्रवासावर परिणाम होत आहे.