गगनयानातील अवकाशवीर देशाची शान - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 4 Months ago
गगनयान मोहिमेत भरारी घेणाऱ्या चार अंतराळवीरांसोबत हस्तांदोलन करताना पंतप्रधान
गगनयान मोहिमेत भरारी घेणाऱ्या चार अंतराळवीरांसोबत हस्तांदोलन करताना पंतप्रधान

 

"आपल्या साहसी अंतराळवीरांसाठी सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवाव्यात." असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेतील चार अंतराळवीरांची नावे जाहीर करताना मंगळवारी केले. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला अशी त्यांची नावे आहेत. पंतप्रधानांनी या चौघांना अंतराळवीरांचे मानचिन्ह बहाल केले. मोदी म्हणाले, "अंतराळवीरांना भेटण्याची आणि त्यांची ओळख देशाला करून देण्याची संधी आज मला मिळाली, याचा आनंद आहे. मी संपूर्ण देशाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. तुम्ही आजच्या भारताची शान आहात." पंतप्रधानांनी आज केरळचा धावता दौरा केला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेस (इस्रो) विक्रम साराभाई केंद्राला (व्हीएसएससी) भेट देऊन त्यांनी गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांच्यासमवेत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय मंत्री मुरलीधरन आणि 'इस्रो' चे अध्यक्ष एस. सोमनाथ होते. मोदी यांनी भारताच्या चार 'गगनवीरां' ची नावे जाहीर करीत उपस्थितांसमोर अंतराळवीरांचे मानचिन्ह बहाल केले.

त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांनी टाळ्या वाजवून भारत मातेचा जयजयकार केला. मोदी म्हणाले, "आपण आज ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार झालो आहोत. काही वेळापूर्वीच देशाला प्रथमच आपल्या 'गगनयान' मधील प्रवाशांची ओळख झाली. ही केवळ चार नावे किंवा चार व्यक्ती नाहीत तर १४० कोटी आकांक्षांना अवकाशात घेऊन जाणान्या चार शक्ती आहेत. ४० वर्षानंतर भारतीय व्यक्ती अवकाशात पोहोचणार आहे. पण यावेळी वेळही आपली आहे, उलटगणतीही आपलीच आहे आणि रॉकेटही आपलेच आहे. देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्रात महिला शक्तीला खूप महत्व दिले जात आहे. चांद्रयान असो की गगनयान, महिला शास्त्रज्ञांशिवाय कोणत्याही मोहिमेची कल्पना केली जाऊ शकत नाही"

"गगनयानमध्ये वापरण्यात येणारी बहुतांश उपकरणे भारतीय बनावटीची असल्याचे ऐकून मला खूप आनंद झाला. जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असतानाच गगनयानही देशाच्या अवकाश क्षेत्राला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. हा मोठा योगायोग आहे." असे मोदी म्हणाले. 

तीन योजनांचे उद्घाटन
अवकाश क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या महत्त्वाच्या तीन योजनांचे उ‌द्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. श्रीहरिकोटा येथोल सतीश धवन अवकाश केंद्रातील पीएसएलव्ही एकीकरण सुविधा, विक्रम साराभाई अवकाश केंद्रातील (व्हीएसएससी) ट्रायसोनिक विंड टनल' आणि तमिळनाहतील महेंद्रगिरी येथील 'इस्रो' च्या प्रपोल्शन इमारतीमधील 'सेमी-क्रायोजेनिक इन्टिग्रेटेड इंजिन अँड स्टेज टेस्ट' या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. या योजनांसाठी सुमारे अठराशे कोटी रुपये खर्च आला आहे.