काश्‍मीरमध्ये तीन दिवसांमध्ये चार दहशतवादी हल्ले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 4 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत चार दहशतवादी हल्ले झाले आहेत. जम्मू विभागातील मंगळवारी रात्री कथुआ आणि डोडा जिल्ह्यात लागोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले. कथुआमधील हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. केंद्रीय सुरक्षा पोलिस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान आज हुतात्मा झाला.

डोडा जिल्ह्यात छत्तेरगावला भागात हा हल्ला काल रात्री झाला. तेथील पोलिस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी चौकीवर गावठी बाँबचा हल्ला केला. सुरक्षा दले आणि पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिले. आज सकाळपर्यंत ही चकमक सुरू होती.

घटनास्थळावरून दहशतवादी पळून गेल्यानंतर जखमी जवान व पोलिस अधिकाऱ्याला भादरवाह रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना उधमपूरमधील लष्कराच्या रुग्णालयात हलविण्यात आले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी छत्तरगाला येथे सुरक्षा दल आणि पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी भादरवाह ते छत्तरगाला मार्गावरील सर्व वाहतूक थांबवून शोधमोहीम सुरू केली.

कथुआ जिल्ह्यात सईदा सुखल गावात काल सायंकाळी घुसलेल्या दहशतवाद्यांनी काही घरांमध्ये पाणी मागितले. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. यात ओंकार नावाचा एक ग्रामस्थ जखमी झाला. सुरक्षा दलांनी गावाला वेढा देऊन दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर ‘सीआरपीएफ’च्या जखमी झालेला जवान कॉन्स्टेबल जी.डी.कबीर दास याचा आज मृत्यू झाला.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास झडतीसत्र राबविण्याऱ्या पोलिस पथकावर गंदोह भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहशतवाद्यावर २० लाखांचे बक्षीस
रियासी जिल्ह्यातील पोनी भागात तीर्यथ गावाजवळ दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर रविवारी (ता.९) हल्ला केला. यामुळे बस दरीत कोसळून नऊ जण ठार झाले . ही घटना पाहणाऱ्यांनी वर्णन केल्यानुसार एका दहशतवाद्याचे रेखाचित्र तयार केले असून त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास रिसायी पोलिसांनी २० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. हल्ल्यामागे लष्करे तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

अधिकारी बचावले
दरम्यान, जम्मू-काश्‍मीरचे दोन पोलिस अधिकारी काल दहशतवादी हल्ल्यातून बचावले. दहशतवाद्यांनी त्यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. गाडीत पोलिस उपमहानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक दर्जाचे दोन अधिकारी होते. हल्ल्यातून बचाव करण्यात ते यशस्वी ठरले.