उस्ताद विलायत खाँ यांचा हळुवार 'कोमल गांधार'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
उस्ताद विलायत खाँ
उस्ताद विलायत खाँ

 

'संगीत' ही मालिका लिहीत असताना गेल्या सहा महिन्यांत काही बुजूर्ग गायक-वादकांची फार सुंदर पुस्तके हाती आली. त्यातील काही चरित्रे आहेत, तर काही आत्मचरित्रे! ही पुस्तके प्रायः इंग्रजी व हिंदी या भाषांमधील आहेत. त्यात पंडित कुमार गंधर्व, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गंगूबाई हनगल आणि बेगम अख्तर यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय एक वेगळे पुस्तक प्रकाशित झाले असून ते पंडित रविशंकर यांच्या प्रथम पत्नी अन्नपूर्णादेवी यांनी लिहिले आहे. हिंदुस्थानी संगीताचा गेल्या शतकाचा इतिहासच या पुस्तकांमधून आपल्या पुढे उलगडतो आहे. 

संगीताबद्दल लिहिताना-बोलताना अभ्यासकांची नेहमीच अडचण होते. साहित्य, चित्र, शिल्प या कलांच्या आस्वाद-समीक्षा प्रक्रियेत हातात एखादे पुस्तक वा चित्र वा शिल्प असू शकते. परंतु संगीताबद्दल लिहिणे, बोलणे म्हणजे आसमंतात विरलेल्या अदृश्‍य नादाबद्दल बोलण्यासारखे आहे. तंत्रज्ञानामुळे ध्वनीफिती वा चित्रफितींमध्ये संगीताचे जतनीकरण होऊ लागल्यामुळे हिंदुस्थानी संगीतातील आठवणी आणि आख्यायिकांचे गहिवर मागे पडायला हरकत नाही. अन्य कलांप्रमाणे संगीताचे दस्तऐवजीकरण व्हावयास हवे. 

एखाद्या घराण्याच्या गायकीचा वा वाद्यवादनाचा अभ्यास करणाऱ्याला कलावंताचे चरित्रात्मक तपशील गोळा करावे लागतात. सुदैवाने कुमारेजी, भीमसेन, मल्लिकार्जुन मन्सूर, अल्लादिया खॉं, मोगुबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर, किशोरी आमोणकर यांसारख्या कलावंतांविषयी मराठीत विपुल लेखन झाले आहे. वृत्तपत्रीय लेखन, मुलाखती याबरोबरच बहुतेकांची चरित्रे मराठीत आली आहेत. एवढेच कशाला ,ख्यातनाम सतारवादक यांच्या तीन आत्मचरित्रांपैकी एक 'राग-अनुराग' हे अहमदनगरचे लेखक व बंगाली भाषेचे तज्ज्ञ श्री. विलास गीते यांनी मराठीत अनुवादित केले आहे. 

रविशंकर यांनी 'माय लाईफ माय म्युझिक' हे आत्मचरित्र 1968 साली इंग्रजीत लिहून प्रसिद्ध केले. त्यानंतर 'राग-अनुराग' बंगाली साप्ताहिकातून क्रमशः प्रकाशित झाले. तिसरे पुस्तक 'रागमाता' जॉर्ज हॅरिसन यांनी शब्दबद्ध केले असून १९९७मध्ये जेनेसिस पब्लिशिंग लिमिटेड या अमेरिकी संस्थेने प्रकाशित केले आहे. पहिल्या आत्मचरित्राला यहुदी मेन्युहिन या ख्यातकीर्त व्हायोलिनवादकाने प्रस्तावना लिहिली आहे.

भक्तांची जुगलबंदी
या पार्श्‍वभूमीवर विख्यात सतारवादक विलायत खॉं यांच्या 'कोमल गांधार' या पुस्तकाचा हिंदी अनुवाद हाती आला आहे. विलायत खॉं हे गौरीपूर घराण्याचे सतारवादक. त्यांना त्यांचे वडील इनायत खॉं यांच्याकडून सतारवादनाचा वारसा मिळाला. १९२८मध्ये गोकुळ अष्टमीला खॉंसाहेबांचा जन्म पूर्व बंगाल येथे झाला.

खॉंसाहेबांचा सतारवादनाचा बाज पूर्णतया भिन्न आहे. रविशंकर यांना तुलनेने लोकप्रियता अधिक लाभल्यामुळे तसेच रविशंकर यांनी परदेशात दीर्घकाळ वास्तव्य केल्यामुळे त्यांना वेगळे 'वलय' लाभले. पूर्वी कुमार प्रेमी आणि भीमसेन भक्त यांच्यात सतत वाद झटत. एकमेकांची तुलना केली जाई. कुमारजींच्या तुलनेत भीमसेन अधिक व्यापक श्रोतृसमुदायाला परिचीत होते आणि आहेत. 

कुमार मुख्यतः अभिजन वर्गातच राहिले. अर्थात ही तुलना अस्थानी आहे. तद्वत रविशंकरांचे मोठेपण मान्य करताना विलायत खॉं यांच्या सतारवादनातील वेगळ्या बाजाचा आदर ठेवायलाच हवा. त्यांच्या वादनात वेगळा गोडवा आहे. नजाकत आहे. गायकी अंगाने वादन करणाऱ्या खॉंसाहेबांच्या बोटात वेगळीच जादू आहे.

धृपदांचे संस्कार
प्रयाग येथील संगीत संमेलनात तरूण वयात विलायत खॉं यांचे सतारवादन झाले आणि संगीत जगताला खॉंसाहेब परिचीत झाले. इनायत खॉं यांच्या आकस्मिक निधनामुळे विलायत खॉं दिल्ली येथे आजोबांकडे आले. आजोळच्या वातावरणात गाण्याचे संस्कार झाले. आजोबा म्हणजे बन्दे हसन खॉं हे गायक होते. त्यांच्याकडून त्यांनी धृपद व ख्याल दोन्हीची तालीम घेतली. कंठसंगीताचे उपयोजन विलायत खॉं यांच्या वादनात दिसते. 

शिवाय मैफलीत काही राग वा भैरवी सतारीवर वाजविताना ते गाऊनही दाखवीत. किरानाचे गायक वहिद खॉं यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. आग्रा घराण्याचे गायक उस्ताद फैय्याज खॉं व महियरचे उस्ताद अल्लाउद्दिन यांचा अप्रत्यक्ष प्रभाव विलायत खॉं यांच्यावर होता. पण त्यांची शैली पूर्णतः भिन्न आहे. खॉं साहेबांच्या मातोश्री देखील संगीताच्या जाणकार होत्या.
 
(अल्लाउद्दिन खॉं यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी या प्रथम दर्जाच्या सतारवादक व उत्तम गुरू आहेत.) 

त्यांनी विलायत खॉं यांच्याकडून रोज बारा - बारा तास रियाज करुन घेतला. विलायत खॉं आणि रविशंकर यांच्या जडणघडणीत काही साम्यस्थळे आढळतात. त्यात गुरूमुखी विद्या ग्रहण करताना करावी लागणारी मेहनत हा समान धागा आहे. खॉंसाहेबांनी तरूण वयात केलेल्या मेहनतीमुळे स्वर, लय, ताल यांवर प्रभुत्व आले. त्यांच्या आलापीत त्यांच्या वादनाचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व दिसते. सतारीच्या जाणकार चाहत्यांना रविशंकर यांच्यापेक्षा विलायत खॉं यांचे पृथगात्मपण लक्षात येते. 

आलाप, जोड, झाला, मिंड, गमक, झमझमा, स्वरलगाव, गतकारी आणि लयकारी या सर्वांवर खॉंसाहेबांचे प्रभुत्व आहे. खॉंसाहेबांनी कधीही देशी- विदेशी श्रोत्यांचा अनुनय केला नाही. जुगल बंद्यांच्या झटापटी केल्या नाहीत. सतारवादनातील कलात्मकता, नजाकत आणि स्वरांचा हळुवारपणा त्यांनी जपला. 'प्लेईंग फॉर गॅलरी' अशी टीका विलायत खॉं साहेबांच्या बाबतीत घडली नाही. एक प्रतिभावंत, बुद्धिमान सतारवादक म्हणून विलायत खॉं यांची ख्याती होती. मैफली, ध्वनिफिती, सप्रयोग मुलाखती यांतून ते संगीतप्रेमींना भेटत. अतिशय कुशलतेने त्यांची बोटे सतारीवरील तारांवर फिरत.  

खॉंसाहेबांनी सतारवादनाची आपली परंपरा पुढे चालू राहावी म्हणून अरविन्द पारीख, पंडित गिरीराज काशीनाथ मुखर्जी, कल्याणी राय, भाचे रईस खॉं आणि बंधू अमृत खॉं यांना उदार हस्ते विद्या दिली आहे. याशिवाय इराणची राणी आणि अफगाणिस्तानचे राजे यांनीही खॉं साहेबांचे शिष्यत्व पत्करले होते. शंकरलाल भट्टाचार्य यांनी मूळ बंगालीतील आत्मचरित्र शब्दबद्ध केले आहे. त्याला 'अनुलेखन' असा शब्द वापरला आहे. बंगालीचा हिंदी अनुवाद मीना बॅनर्जी यांनी केला आहे. त्या भाषातज्ज्ञ व संगीताच्या मर्मज्ञ लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. 

संगीत विषयक लेखन, संशोधनात त्या मग्न असतात. सत्तावीस छोट्या -छोट्या प्रकरणांमधून खॉं साहेबांचा चरित्रपट, आठवणी आणि त्यांच्या संगीत विषयक विचारातून उलगडत जातो. एकशेसत्तर पानांमध्ये शेवटी खॉं साहेबांच्या रचना स्वरलेखनासह दिल्या आहेत. 'कोमल निषाद' या शिर्षकाच्या प्रकरणात परिया धनाश्री, दरबारी कानडा, शंकरा व रागेश्री या रागातील खॉं साहेबांच्या बंदिशी दिल्या आहेत. प्रकरणांचे मथळे सुटसुटीत छोटेखानी आहेत. त्यावरून चटकन बोध होतो.

आठवणींना उजाळा
मूळ बंगाली अनुलेखक शंकरलाल भट्टाचार्य यांनी खानसाहेबांची निवेदनशैली तशीच ठेवल्यामुळे हे आत्मपर लेखन सहज साध्य झाले आहे. दोन-चार पानांची छोटी छोटी प्रकरणे आहेत. परंतु ती विलक्षण वाचनीय झाली आहेत. अगदी लहानपणी १९३३मध्ये म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी विलायतने सतार शिकायला 'अब्बां'कडे सुरूवात केली. त्यावेळी अब्बांकडे डी. टी. जोशी, नंदी बाबू, बिपीन दास, श्रीपती बाबू अशी तरूण मंडळी शिकायला येत.

'शुरूआत' या प्रकरणात जुन्या आठवणींना विलायत खॉं यांनी छानदार उजाळा दिला आहे. वयाच्या आठव्या वर्षी विलायतने जाहीर जलश्‍यात वाजविले. भूपेन घोष यांनी ती 'म्युझिक कॉन्फरन्स' भरविली होती. श्रोतेही दिग्गज होते. त्यात ओंकारनाथ ठाकूर, रवि ठाकूर, केसरबाई केरकर, अब्दुल अजीज खॉं, जमीरूद्दिन खॉं साहेब, हाफीजअली खॉं, दिलीपचंद्र बेदी, भास्कर राव, हिराबाई बडोदेकर अशी वलयांकित मंडळी होती. फैय्याज खॉंही होते. अब्बांचे मत मात्र अनुकूल नव्हते. 

भूपेन बाबूंनी इनायत खॉंना आग्रह केला तेव्हा स्टेजवर आलेल्या विलायतने भैरवी वाजविली. अब्बा पुन्हा नर्व्हस झाले. अब्बांना असं नाराज झालेलं विलायतने कधी पाहिले नाही. एवढ्यात थिरकवासाहेब आले. आल्या आल्या म्हणाले, "इनायत खॉं, मै बजाऊँगा विलायत के साथ।" आणि जिंदगीतला विलायत खॉंचा पहिला परफॉर्मन्स रंगला. अहमदजान थिरकवांच्या साथीने 'इतिहास' घडला. १९३६ ची ही आठवण विलायत खॉं यांच्या मनात लख्ख जागी होती.

घरात गाणं बजावणं होतंच. अब्बांची तालीम देण्याची खास पद्धत होती. पल्टे कसे घोटवायचे याचे तंत्र तरूण विलायतला त्यांनी आस्ते आस्ते शिकवलं. सुरांची दुनिया, तिथलं राज्य आणि तिथले कायदेकानून काही वेगळेच असतात असं खॉं साहेब म्हणतात. ते म्हणतात, "मी शामकल्याण वाजवीत होतो. मात्र अब्बांच्या वादनात 'कामोद'चेच अंग (फ्रेजेस) त्यात दिसू लागले." मग त्यातले भेदाचे बारकावे पित्याने पुत्राला समजावून दिले. 

'दिल से चाहना और मन से समझना' हे पितापुत्रांच्या गुरूमुखी विद्यादानाचे तंत्र होते. 'वारनमे अपनी सोच (विचार) चाहिए' हे अण्णांनी विलायत खॉंच्या मनावर लहानपणी बिंबवल्यामुळे पुढे खॉं साहेबांनी आपली सतार वादनात पृथगाव्य शैली निर्माण केली आणि त्यामुळे विलायत खॉं आणि रविशंकर यांना स्वतंत्र निजखूण (आयडेंडिटी) प्राप्त झाली.

पुस्तक मुळातून वाचायला हवे. शिष्य, समकालीन गायक वादक, ठुमरीसारखे गानप्रकार या साऱ्यांचे वर्णन मोजकं आणि चित्रमय शैलीत केलं आहे. ते मुळातून वाचायला हवं, किंवा अनुवादनाची वाट पाहायला हवी! नवी दिल्ली येथील कनिष्क पब्लिशर्सने अतिशय देखण्या स्वरूपात पुस्तक छापले आहे. छायाचित्रांऐवजी पेंटिग्ज्‌ छापली आहेत. 'पोट्रेट पेंटिंग' म्हणून त्या व्यक्तिचित्रांची स्वतंत्र दखल घ्यायला हवी!

"मी जेलस नव्हतो!" - पंडित रविशंकर
पंडित रविशंकर यांनी उस्ताद विलायत खॉं यांच्याबद्दल लिहिताना म्हटले आहे, "विलायत खॉं आणि मी यांच्यामध्ये लोक वर्षानुवर्षे स्पर्धेची भावना चेतवीत आहेत, याचा आमच्या स्नेहावर काही परिणाम झाला का असं तुम्ही विचारलंत. प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. आम्ही इतर कुणा कलाकाराशी स्वतःची तुलना करून प्रगती करण्याचा प्रयत्न करतो याची कबुली द्यायलाच हवी. विलायत आणि मी दोघांच्याही बाबतीत हे खरं आहे. मला स्पर्धक मानून विलायत खॉंनी स्वतःच्या वादनात कितीतरी प्रगती केली आहे. 

आणि मला जेव्हा अमेरिकेत हार्ट कंडिशनसारखा विकार झाला तेव्हा त्याला वाटलं असेल, आता कुणाशी स्पर्धा करण्याकरिता वाजवू? कुणी खरोखरंच कलाकार असेल तर असं वाटणारंच! माझ्या बाबतीत म्हणायचं तर मी विलायतबाबत जेलस नव्हतो. कारण माझ्या आणि त्याच्या वादनाचा मार्ग अलग आहे हे मला ठाऊक होतं. मी जे वादन करतो ते त्याच्या क्षेत्राच्या बाहेरचं आहे. आणि तो ज्या प्रकारचं वादन करतो त्या प्रकारात तो सिद्ध पुरुष आहे. त्यात त्याला कोणी स्पर्धा करू शकत नाही; त्याच्या उंचीपर्यंत पोचू शकत नाही! पण लोक आम्हाला चेतवण्याचा प्रयत्न करतात."
 
('राग अनुराग' या पंडित रविशंकर यांच्या मूळ बंगाली आत्मचरित्राच्या विलास गीतेकृत मराठी अनुवाद (पृष्ठ १७५) प्रथम आवृत्ती १९९७)

"बहुत बहुत गजब की ठुमरी थी सिद्धेश्‍वरी देवी की"
"दरबारी राग मला झपाटून टाकतो. फैय्याज खॉंच्या दरबारीने मी भारावून गेलो. मुश्‍ताक हुसेन यांचा दरबारीही असाच! केदार आणि कामोद हे राग ऐकावेत ते माझे आजोबा बन्दे हुसेन खॉं यांचेच! बडे गुलाम अली यांचा मालकंस ऐकला आणि अंतर्यामी वादळंच उठलं! अब्दुल करीम खॉं आणि इनायत खॉं यांची भैरवी विसरणंच अशक्‍य! ओंकारनाथांचा जो 'देस' राग ऐकला त्या प्रत्येक स्वरांची आठवण आहे. 'बिहाग' राग ही तर आमच्या घराण्याचीच जहॉंगीर आहे म्हणा ना! अमीर खॉं साहेबांची आणि माझी वेगळीच दोस्ती जमली. 

त्यांचं गाणं, त्यांचा सांगीतिक विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्व यांची खूप मोठी छाया माझ्यावर पसरून राहिलीय. ते जे काही गायचे त्यावर त्यांचीच मुद्रा उमटायची! त्यामुळे त्यांनी गायिलेल्या सर्व रागांच्या आठवणी मी मनात जपल्यात! निसार हुसेन खॉं साहेबांच्या तिलक कामोरचे वर्णन मी 'बहुत बढिया' असंच करीन! ठुमरी ऐकायची तर बिसमिल्ला खॉं यांचंच नाव मनात येतं. सिद्धश्‍वरी देवींची ठुमरी मोठी गहजब माजवीत असे! बडे गुलाम, रसूलन बाई, बडी मोतिबाई म्हणजे बहोत खूब! ठुमरीचं कुठलंही अंग त्यांच्या गाण्यात आलं नाही असं व्हायचं नाही! "अल्लाउद्दिन खॉं साहेब तो बडे गुणी आदमी थे. व्हेरी ग्रेट आर्टिस्ट ऍण्ड ग्रेट मास्टर अल्सो!"
 
('कोमल गांधार' या विलायत खॉं यांच्या हिंदी आत्मचरित्रातून (पृष्ठ ९१))

कोमल गंधार
उस्ताद विलायत खॉं 
मूळ अनुलेखन :शंकरलाल भट्टाचार्य
बंगालीतून हिंदी अनुवाद : मीना बॅनर्जी
पृष्ठे - 170 

- रुपाली राऊत, अपर्णा फडके
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter