भारतातच सेमीकंडक्टरचे उत्पादन घेण्यासाठी मोदी सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडे सेमीकंडक्टर प्लांटसाठी टाटा आणि इतर कंपन्यांनी अब्जावधींचे प्रस्ताव मांडले होते. यातील 'टाटा ग्रुप'च्या प्रस्तावाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. यामुळे 'मेक इन इंडिया' अभियानाला मोठा बूस्ट मिळणार आहे.
देशात एकूण तीन सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहेत. यातील दोन प्लांट गुजरातमध्ये तर तिसरा आसाममध्ये असणार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. टाटा कंपनी तैवानच्या पॉवरचिप सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्परेशन (PSMC) या कंपनीसोबत मिळून गुजरातमध्ये देशातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारणार आहे.
गुजरातच्या धोलेरा गावात हा पहिला प्लांट उभारण्यात येईल. यासाठी 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्लांटमध्ये ऑटोमोटिव्ह, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, डेटा स्टोरेज, डिस्प्ले ड्रायव्हर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सेक्टर अशा विविध सेक्टर्ससाठी सेमीकंडक्टर चिप्स बनवण्यात येतील.
टाटाचा दुसरा सेमीकंडक्टर प्लांट हा आसामच्या मोरीगांवमध्ये उभारण्यात येणार आहे. आसाममधील प्लांटसाठी 'टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
गुजरातमध्ये आणखी एक प्लांंट
गुजरातच्या साणंद गावामध्ये देखील एक सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे. सीजी पॉवर (CG Power) आणि जपानची रेनेसा कंपनी मिळून याठिकाणी 7,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्लांटमध्ये दिवसाला तब्बल 15 मिलियन चिप्स तयार होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. याव्यतिरिक्त अमेरिकेतील मेमरी चिप बनवणारी कंपनी मायक्रॉन (Micron) ही गुजरातमध्ये आधीपासूनच 22,516 कोटींची गुंतवणूक करून चिप असेंब्ली युनिट उभारत आहे.