जम्मू-काश्मीरमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये सोमवारी केबल कार यंत्रणेत (गोंडोला) अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे ३०० पर्यटक अनेक तास हवेतच अडकले. ६५ वेगवेगळ्या केबिनमध्ये हे पर्यटक अडकले असून, मुसळधार पावसामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
दुपारच्या सुमारास हा बिघाड झाल्यानंतर लगेचच विविध यंत्रणांच्या मदतीने मोठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली. पहिल्या पाच तासांत १७९ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात अधिकाऱ्यांना यश आले असून, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही केबिन जमिनीपासून तब्बल ५०० फूट उंचीवर असल्याने पर्यटकांना बाहेर काढण्यास जास्त वेळ लागत आहे.
मुसळधार पावसात लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे बचावकार्य
या दुर्घटनेनंतर गुलमर्ग केबल कार सेवेच्या दोन्ही टप्प्यांचे (Phases) कामकाज तात्काळ स्थगित करण्यात आले आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराचे जवान युद्धपातळीवर काम करत आहेत.
केबल कार यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले. "सर्व केबिन सुरक्षित आहेत आणि प्रशिक्षित पथके जमिनीवर काम करत आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही," असे मुख्यमंत्र्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
राज्यपाल आणि लष्कराकडून मदतकार्यावर देखरेख
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक (DGP) नलीन प्रभात यांना स्वतः गुलमर्गला जाऊन बचावकार्याची देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत संयुक्त पथके पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सनेही (Chinar Corps) या मोहिमेत तातडीने मदत सुरू केली आहे.
गुलमर्ग गोंडोला सेवा आशियातील सर्वात मोठी आणि उंच केबल कार प्रणाली मानली जाते. यापूर्वी २५ जून २०१७ रोजी वादळामुळे झाड उपटून केबिनवर पडल्याने सात जणांचा मृत्यू झाला होता, तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती. आगरा येथे झिपलाईन केबल तुटून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने पर्यटनातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.