हिमाचल प्रदेश, ओडिशा, उत्तराखंडसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, विविध राज्यांतील जनजीवन पावसाने विस्कळित झाले आहे. हिमाचल प्रदेशामध्ये ढगफुटी झाली असून चार जणांचा मृत्यू झाला तर सोळाहून अधिक बेपत्ता आहेत.
पावसामुळे उत्तर ओडिशा, मयूरभंज ववालेश्वर जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरसंकट निर्माण झाले. ९,००० हून अधिक जणांना स्थलांतरित करण्यात आले असून, १०० पेक्षा जास्त गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ओडिशातील बुधाबलंगा, सुवर्णरखा, जंभीरा, जलका, गंगाहार, सोना आणि देव या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून, मयूरभंज येथे पुरामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
हिमाचलमध्ये ढगफुटी
हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याने राज्यात सोमवार रात्रीपासून ते मंगळवार सकाळपर्यंत पावसाने हाहाकार माजविला. मंडी जिल्ह्यातील गोहर, करसोग आणि धर्मपूर क्षेत्रात ढगफुटी झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून १६ जण बेपत्ता झाले. आतापर्यंत ११७जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. हमीरपूरमध्येही ढगफुटी झाल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे.
बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी मंडीत आठ ठिकाणी ढगफुटी झाल्याचे संगितले. प्रारंभिक आकडेवारीनुसार ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोहर उपविभागातील स्यांज येथे नऊ जण बेपत्ता आहेत तर चंबा, हमीरपूर आणि मंडीतील २३३ जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. मंडी येथे सोमवार सायंकाळापासून ते मंगळवार सकाळपर्यंत २१६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडीचे उपायुक्त अपूर्व देवगन यांनी पंधरा ते सोळा जण बेपत्ता असल्याचे सांगितले.
सराज क्षेत्रातील बाडा येथे दोन, तलवडा येथील तीन जण बेपत्ता आहेत. बाडा येथे चार आणि तलवाडा येथे एका मुलीला वाचविण्यात यश आले. मंडी शहरातील विविध ठिकाणाहून ११ जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात यश आले. उपायुक्त अपूर्व देवगन यांच्याकडून बाडा आणि तलवाडासह विविध भागाची पाहणी केली जात आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून बचाव मोहीम सुरू आहे.
गाड्या वाहून गेल्या
करसोग येथील अनेक घरे पाण्याच्या वेढ्यात अडकले आहेत. धर्मपूर क्षेत्रात ढगफुटी झाली असून शरणगाव येथेही मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सिराजच्या वगस्याडसह संपूर्ण भागात ढगफुटीमुळे अनेक घरे, गाड्या पाण्यात वाहून गेल्या आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. गोहर उपविभागात स्यांज नाल्यावर उभारलेले एक घर पुरात वाहून गेले. या ठिकाणी मुलगी आणि आईला वाचविण्यात यश आले
ओडिशात नागरिकांचे स्थलांतर
मुसळधार पावसामुळे ओडिशातील विविध जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. अंदाजे नऊ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मयूरभंजमध्ये सुवर्णरखा आणि जांभिरा नद्यांच्या पुरामुळे सरस्काना आणि रसगोविंदपूर ब्लॉकमधील ६३ ग्रामपंचायतींना मोठा फटका बसला आहे. ६,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बुधबलंगा, देव, गंगाहर आणि सोना नद्यांमुळे झालेल्या अतिरिक्त पुरामुळे मोराडा, शुलियापाडा, सरस्काना, बांगिरीपोसी, बेतानती, बारसाही, गोपाबंधुनगर, करंजिया, जशिपूर आणि कुसुमी येथील १०० हून अधिक गावांमधील स्थिती बिकट झाली आहे.
अन्नपदार्थांचे वाटप
प्रशासनाने ४४ ठिकाणी अन्नपदार्थ तयात करण्याची सोय केली असून, नागरिकांना पॅकबंद अन्नपदार्थांचे वाटप केले आहे. बारिपदा शहरात जारळी आणि सारळी नद्यांच्या पुरामुळे अनेक प्रभागांमध्ये तीव्र जलभराव झाला आहे. सिंमिलिपाल व्याघ्र प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे प्रवेशमार्ग बंद झाला आहे. बालासोर जिल्ह्यात पूरग्रस्त भागांमधून बस्ता, बलीपाल, भोगराई, जलेश्वर, बालासोर सदर आणि रेमुना तसेच जलेश्वर नगरपालिका क्षेत्रातून २,९१६ हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे.