स्वातंत्र्यलढ्यातील ‘या’ अजरामर घोषणांचे जनक होते मुस्लिम स्वातंत्र्यवीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताचा स्वातंत्र्यलढा हा केवळ नेत्यांच्या भाषणांपुरता किंवा सशस्त्र क्रांतीपुरता मर्यादित नव्हता, तर तो घोषणा आणि गीतांनी बुलंद झालेला एक विराट जनआंदोलन होते. या घोषणांमध्ये अशी जादू होती की, त्या ऐकताच लोकांच्या नसानसांत स्वातंत्र्याचे रक्त सळसळू लागत असे. 

या घोषणा क्रांतीची ओळख बनल्या, पण अनेकांना हे माहीत नाही की, स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणाऱ्या अनेक अजरामर घोषणांचे जनक मुस्लिम देशभक्त होते. या लेखातून आपण त्या घोषणा आणि त्यांच्या मुस्लिम जनकांविषयी जाणून घेऊया, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात असामान्य योगदान दिले.

इन्कलाब जिंदाबाद

'इन्कलाब जिंदाबाद' म्हणजे 'क्रांतीचा विजय असो!' ही घोषणा आजही आंदोलने आणि मोर्चांमध्ये तितक्याच जोशात दिली जाते. ही घोषणा ऐकताच शहीद भगत सिंह आणि त्यांच्या साथीदारांची आठवण येते, पण या घोषणेचे मूळ जनक एक मुस्लिम स्वातंत्र्यसैनिक होते. प्रसिद्ध उर्दू कवी, पत्रकार आणि कट्टर स्वातंत्र्यवादी मौलाना हसरत मोहानी यांनी १९२१ मध्ये हा नारा पहिल्यांदा दिला.

कानपूरचे रहिवासी असलेले हसरत मोहानी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी 'संपूर्ण स्वराज्या'ची मागणी केली होती. त्यांनी दिलेला हा नारा इतका प्रभावी होता की, भगत सिंह आणि त्यांच्या 'हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन'ने तो आपला अधिकृत नारा बनवला. या घोषणेने तरुणांमध्ये क्रांतीची अशी ज्योत पेटवली की, ती संपूर्ण ब्रिटिश साम्रा्यासाठी एक आव्हान ठरली.

भारत छोडो आणि सायमन परत जा 

१९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनाने ब्रिटिश राजवटीच्या ताबूत अखेरचा खिळा ठोकला. महात्मा गांधींनी मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावरून 'करो या मरो'चा संदेश दिला आणि संपूर्ण देश या आंदोलनात उतरला. या आंदोलनाचे नाव, म्हणजेच 'भारत छोडो' (Quit India) ही घोषणा कोणी दिली, हे अनेकांना माहीत नाही. ही घोषणा गांधीजींना सुचवणारे व्यक्ती होते युसुफ मेहेरअली.

युसुफ मेहेरअली हे एक तेजस्वी समाजवादी नेते आणि मुंबईचे महापौर होते. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी, गांधीजींनी चळवळीसाठी एका आकर्षक नाऱ्याची गरज असल्याचे म्हटले. तेव्हा युसुफ मेहेरअली यांनी 'Quit India' हा नारा सुचवला, जो गांधीजींना खूप आवडला आणि तोच या ऐतिहासिक आंदोलनाचा नारा बनला.

इतकेच नाही, तर १९२८ मध्ये भारतीयांचा समावेश नसलेल्या सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी 'सायमन परत जा' (Simon Go Back) हा प्रसिद्ध नाराही युसुफ मेहेरअली यांनीच दिला होता.

जय हिंद 

'जय हिंद' ही आज भारताची राष्ट्रीय घोषणा मानली जाते. सरकारी कार्यक्रमांपासून ते लष्करी अभिवादनापर्यंत, सर्वत्र या घोषणेचा वापर होतो. ही धर्मनिरपेक्ष आणि देशभक्तीने ओतप्रोत घोषणा देणारे व्यक्ती होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निकटवर्तीय आणि आझाद हिंद फौजेचे मेजर जैन-उल अबिदीन हसन (आबिद हसन सफराणी).

हैदराबादचे असलेले हसन हे जर्मनीमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते, पण नेताजींच्या आवाहनानंतर ते शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. आझाद हिंद फौजेतील विविध धर्म आणि प्रांतांच्या सैनिकांना एकत्र जोडण्यासाठी एका सामायिक अभिवादनाची गरज होती. तेव्हा हसन यांनी 'जय हिंद' ही घोषणा सुचवली, जिचा अर्थ आहे 'भारताचा विजय असो.' नेताजींना ही घोषणा इतकी आवडली की, त्यांनी तिला आझाद हिंद फौजेची अधिकृत घोषणा बनवले. स्वातंत्र्यानंतर 'जय हिंद' ही संपूर्ण भारताची घोषणा बनली.

सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात प्रत्येक भारतीयाच्या ओठांवर असलेले हे गीत म्हणजे एक प्रकारचे अघोषित राष्ट्रगीतच होते. हे अजरामर गीत २० व्या शतकातील महान उर्दू कवी अल्लामा मोहम्मद इक्बाल यांनी १९०४ मध्ये लिहिले होते. 'तराना-ए-हिंदी' या नावाने प्रसिद्ध असलेले हे गीत भारताच्या सौंदर्याचे आणि विविधतेतील एकतेचे प्रतीक बनले आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणास्रोत ठरले.

सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल में है

'सरफरोशी की तमन्ना...' या ओळी ऐकताच राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाकउल्ला खान यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे बलिदान आठवते. पण ही क्रांतिकारी गझल लिहिणारे शायर होते पाटण्याचे बिस्मिल अझीमाबादी. त्यांनी १९२१ मध्ये ही गझल लिहिली. देशासाठी प्राण अर्पण करण्याची भावना व्यक्त करणारी ही गझल स्वातंत्र्यलढ्यातील तरुणांसाठी शौर्याचे प्रतीक बनली.

भारत माता की जय 

१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचे प्रमुख रणनीतीकार आणि नानासाहेब पेशवे यांचे सल्लागार अझिमुल्लाह खान यांनी 'मादर-ए-वतन, हिंदुस्तान झिंदाबाद' हे घोषवाक्य तयार केले आणि लोकप्रिय केले. 'मादर-ए-वतन' म्हणजेच 'भारत माता'. देशासाठी 'मातृभूमी' ही संकल्पना आणि घोषणा पहिल्यांदाच एका मुस्लिम क्रांतिकारकाने दिली होती. याच घोषणेने पुढे 'भारत माता की जय' या घोषणेसाठी प्रेरणा दिली असे मानले जाते.

या घोषणा केवळ शब्द नव्हते, तर त्या करोडो भारतीयांच्या भावनांचे आणि स्वातंत्र्याच्या तीव्र आकांक्षांचे प्रतीक होत्या. या घोषणा देणाऱ्या मुस्लिम देशभक्तांचे योगदान भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अविभाज्य आणि असामान्य भूमिकेचा पुरावा आहे.