गुजरातच्या कांडला बंदराकडे येणाऱ्या 'मयुरी नारी' या थायलंडचा ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर होर्मुझच्या सामुद्रधुनीत झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सुरू असलेल्या संघर्षामध्ये व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच्या घटनेचा भारताने निषेध केला असून निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालणे टाळले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी 'X' वर यासंदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, "११ मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीत 'मयुरी नारी' या थायलंडच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. हे जहाज भारताच्या कांडला बंदराकडे येत होते. पश्चिम आशियातील संघर्षात व्यापारी जहाजांना लष्करी हल्ल्यांचे लक्ष्य केले जात आहे, ही खेदाची बाब असून भारत याचा निषेध करतो."
या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. वाढत्या हल्ल्यांच्या तीव्रतेवर भारताने टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे नमूद केले की, "या संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय नागरिकांसह अनेक मौल्यवान जीव गेले आहेत. आता या हल्ल्यांची तीव्रता आणि दाहकता अधिकच वाढताना दिसत आहे." भारताने व्यापारी जहाजांना अशा हल्ल्यांतून वगळण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी नौवहन आणि निष्पाप कर्मचाऱ्यांना लक्ष्य करणे किंवा जलवाहतुकीच्या स्वातंत्र्यात अडथळा आणणे टाळले पाहिजे, असे भारताने पुन्हा एकदा ठामपणे सांगितले आहे.
बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने स्वीकारली आहे. थायलंडच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील एकूण २३ कर्मचाऱ्यांपैकी ३ कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. हा हल्ला ओमानच्या समुद्री हद्दीजवळ झाला. जहाजाला आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी लाईफबोटच्या साहाय्याने समुद्रात उड्या घेतल्या, ज्यांना नंतर ओमानच्या नौदलाने वाचवले.
रॉयल थाई नेव्हीचे ॲडमिरल थाडावुत तत्पिताकुल यांनी सांगितले की, बहरीनमध्ये तैनात असलेल्या थाई नौदलाच्या जवानांनी ओमानच्या नौदलाशी संपर्क साधून ही बचाव मोहीम राबवली. दरम्यान, हिजबुल्लाहने तेल अवीव जवळील रामला तळावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने इस्रायलने हाय अलर्ट जारी केला आहे.