भारत आणि फिजीदरम्यान संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. भारत दौऱ्यावर आलेले फिजीचे पंतप्रधान सिटिवेनी राबुका यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट झाली. त्यात संरक्षण कृती आराखड्यासह उभय देशामध्ये महत्त्वाच्या करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
फिजीचे पंतप्रधान राबुका तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय भागीदारी आणि परस्पर संबंध प्रगाढ करण्यावर चर्चा केली. तसेच आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, व्यापार आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला. हैदराबाद हाउस येथे उभय नेत्यांची भेट झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण सहकार्यावर कृती आराखड्याची घोषणा केली.
पंतप्रधान राबुका यांच्यासोबतच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी एक कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. भारत आणि फिजी यांच्यातील महासागरांचे अंतर असले तरी दोन्ही देशांच्या आकांक्षा एकाच नौकेत स्वार झाल्या आहेत. दोन्ही देश मुक्त, सर्वसमावेशक, सुरक्षित आणि समृद्ध भारत-प्रशांत क्षेत्राला पाठिंबा देतात. त्यानंतर भारत आणि फिजी यांच्यात सात महत्त्वाच्या करारांवर तसेच सामंजस्य करारांवरही सह्या करण्यात आल्या.
यानुसार भारत फिजीच्या सागरी सुरक्षेला बळकटी देण्यासाठी प्रशिक्षण आणि उपकरणांच्या स्वरूपात सहकार्य करणार आहे. तसेच फिजीमध्ये १०० खाटांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी करणे, जनऔषधि केंद्रांची सुरुवात, ई-संजीवनी टेलीमेडिसिन सेवा आणि जयपूर फुट शिबिरासारख्या आरोग्य कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे यावरही दोन्ही देशांची सहमती झाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी फिजीचे पंतप्रधान राबुका यांनी राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधिस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही ते भेट घेणार आहेत.