पहिल्या डिजिटल जनगणनेचा बिगुल वाजला! गृहमंत्र्यांच्या हस्ते ४ डिजिटल साधनांचा शुभारंभ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताची १६ वी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या 'प्रगती' (स्त्री पात्र) आणि 'विकास' (पुरुष पात्र) या दोन शुभंकरांचे (Mascots) अनावरण केले. हे शुभंकर २०२७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पात महिला आणि पुरुषांचा समान सहभाग दर्शवतात. या माध्यमातून जनगणनेचे उद्दिष्ट आणि संदेश सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवले जाणार आहेत.

४ महत्त्वाची डिजिटल साधने

सी-डॅक (C-DAC) या संस्थेने जनगणनेची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी चार प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत:

१. HLBC वेब अ‍ॅप्लिकेशन: उपग्रह प्रतिमांच्या (Satellite Imagery) मदतीने घरांच्या ब्लॉक्सची अचूक मांडणी करण्यासाठी याचा वापर होईल.

२. HLO मोबाईल अ‍ॅप: हा एक सुरक्षित आणि ऑफलाइन अ‍ॅप असेल, ज्याच्या माध्यमातून ३० लाखांहून अधिक प्रगणक (Enumerators) घराघरांत जाऊन माहिती गोळा करतील.

३. सेल्फ एन्युमरेशन पोर्टल: पहिल्यांदाच नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्याची सुविधा मिळणार आहे. १६ प्रादेशिक भाषांमध्ये ही माहिती भरता येईल.

४. CMMS पोर्टल: जनगणनेच्या कामावर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून रिअल-टाइम लक्ष ठेवण्यासाठी ही मध्यवर्ती यंत्रणा असेल.

दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया

  • पहिला टप्पा (एप्रिल ते सप्टेंबर २०२६): यामध्ये घरांची यादी आणि घरांची गणना केली जाईल. प्रत्येक राज्याला या कामासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाईल.

  • दुसरा टप्पा (फेब्रुवारी २०२७): यामध्ये लोकसंख्येची प्रत्यक्ष गणना केली जाईल. विशेष म्हणजे या टप्प्यात प्रथमच जातीनिहाय जनगणनेचाही समावेश असेल.

वेळेची आणि कागदाची बचत

या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जनगणनेचा डेटा थेट सर्व्हरवर जमा होईल, ज्यामुळे कागदी कामाचा पसारा संपणार आहे. तसेच, माहिती संकलित करण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. सुमारे ३२ लाख सरकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार असून, ही जगातील सर्वात मोठी डिजिटल जनगणना ठरेल.