राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सौदीत दाखल; द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमवेत सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमवेत सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान

 

रियाध 

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सौदी अरेबियातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. याशिवाय परस्पर हिताच्या अनेक मुद्द्यांवरही विचारविनिमय झाला.

अजित डोवाल रविवारी रियाधमध्ये पोहोचले. विमानतळावर त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. सौदी अरेबियातील भारताचे राजदूत सुहेल खान आणि सौदी अरेबियाचे राजकीय व्यवहार उपमंत्री सौद अल-सती यांनी त्यांचे स्वागत केले.

या दौऱ्यात अजित डोवाल यांनी अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या. त्यांनी सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान आणि ऊर्जा मंत्री अब्दुलअजीझ बिन सलमान यांची भेट घेतली. तसेच सौदीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुसैद अल-ऐबान यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने 'एक्स' या समाजमाध्यमावर एका पोस्टद्वारे या दौऱ्याची माहिती दिली. या महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध आणि सद्यस्थितीतील प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा झाल्याचे दूतावासाने स्पष्ट केले. परस्पर हिताच्या इतर अनेक विषयांवरही दोन्ही बाजूंनी संवाद साधला.

 

पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चा सुरू आहे. या आठवड्यात पाकिस्तानमध्ये या चर्चेची दुसरी फेरी होण्याची दाट शक्यता आहे. नेमक्या याच अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांचा हा सौदी दौरा होत आहे.

यापूर्वी ११ आणि १२ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची पहिली फेरी पार पडली होती. पण या प्रदीर्घ चर्चेत कोणताही अंतिम करार होऊ शकला नाही.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter