कॅन्सरला हरवून तासगावच्या निहा आत्तारची 'कळसूबाई'वर भरारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
'कळसूबाई' शिखरावर पोचल्यावर निहा आत्तार
'कळसूबाई' शिखरावर पोचल्यावर निहा आत्तार

 

मृदगंधा दीक्षित

"मनात जिद्द असेल, तर जगातलं कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं," हे आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो. पण अवघ्या २६ वर्षांच्या एका तरुण मुलीने हे खरं करून दाखवलं आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करत थेट महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर तिने आपला झेंडा रोवला आहे. मृत्यूच्या दाढेतून परतत तासगावच्या निहा परवीन गौस आत्तार या रणरागिणीने चक्क 'कळसूबाई' शिखर आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची 'सांधण दरी' सर करण्याची किमया केली आहे.

कॅन्सरचे आव्हान आणि अंधारातून प्रकाशाकडे...

निहा ही घरातली शेंडेफळ. तिला एक मोठा भाऊ आहे. तिचं संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं असून, तिने एम.ए. आणि बी.एड. पर्यंतची पदवी घेतली आहे. तासगावमध्येच एक-दोन वर्षं शिक्षिकेची नोकरी केल्यानंतर, वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी तिच्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. तिला कर्करोग असल्याचं निदान झालं आणि जणू तिचं जगच थांबलं.

या कसोटीच्या काळाबद्दल सांगताना निहा म्हणते, "तो काळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रचंड अवघड होता. आपण यातून जिवंत बाहेर येऊ की नाही, हेच मला माहीत नव्हतं. पण तेव्हा मनात एकच जिद्द पेटून उठली होती की आता पुन्हा नव्याने उभं राहायचं."

तिच्या या लढाईत तिची आई एखाद्या खंबीर पर्वतासारखी तिच्या पाठीशी उभी राहिली. मुस्लिम समाजात मुलींना मिळणाऱ्या मर्यादित स्वातंत्र्याच्या चौकटीतून बाहेर पडत, निहाने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःची वाट स्वतः निवडली. "माझ्या या यशोगाथेत जर कुणाचं नाव सर्वात आधी घ्यायचं असेल, तर ती माझी आई आहे. जेव्हा कुणीच पाठीशी नव्हतं, तेव्हा तिने मला भक्कम साथ दिली आणि इथवर आणलं. हे वर्ष आमच्यासाठी अतिशय संघर्षाचं होतं. कॅन्सरशी लढत असतानाच मी माझी लाडकी आजीही गमावली... पण, या सगळ्यातून सावरून मी आज त्या शिखरापर्यंत पोहोचू शकले,"

ट्रेकिंगची अनपेक्षित सुरुवात

मुळात निहाला ट्रेकिंगची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती, की डोंगर-शिखरं सर करण्याचं तिने कधी स्वप्नही पाहिलं नव्हतं. कॅन्सरसाठी तिची रेडिएशन थेरपी सुरू असतानाच, तिच्या नात्यातल्या एका बहिणीने तिला 'भ्रमंती एक्सप्लोरर्स अँड ट्रेकर्स' या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केलं. सुरुवातीला ती कोणत्याही ट्रेकला गेली नाही. पण, ग्रुपवरचे निसर्गरम्य फोटो आणि लोकांचे भन्नाट अनुभव वाचून तिला वाटू लागलं की, "जर जुनं सगळं विसरून आयुष्याची नवी सुरुवात करायची असेल, तर हा उत्तम मार्ग असू शकतो."

जवळपास दीड वर्षांच्या प्रदीर्घ आणि थकवणाऱ्या आजारपणानंतर ती पहिल्यांदा घराबाहेर पडली, ती भुदरगड आणि तमाशाचा खडक इथल्या एका छोट्याशा ट्रेकसाठी! तो पहिला अनुभव तिच्यासाठी खूप काही सांगून जाणारा होता. ती म्हणते, "त्या ट्रिपला गेल्यावर मला खरंच खूप फ्रेश वाटलं. तिथे मी नवीन लोकांना भेटले. ते मला कोणत्याही तराजूत तोलत नव्हते. मी आजारी आहे, हे तिथे कुणालाच माहीत नव्हतं. मुळात मला कुणाचीच सहानुभूती नको होती, आणि तिथे मला बाकीच्यांसारखंच अगदी 'नॉर्मल' जगता येत होतं." खऱ्या अर्थाने इथूनच तिचा निसर्गाशी आणि स्वतःशी संवाद सुरू झाला.

"आयसीयूच्या बेडवर आपण मर्जीने गेलो नव्हतो, पण कळसूबाईला..."

अखेर, 'महाराष्ट्राचं एव्हरेस्ट' म्हणून ओळखलं जाणारं आणि समुद्रसपाटीपासून तब्बल १६४६ मीटर उंचीवर असलेलं 'कळसूबाई' शिखर सर करण्याचा निहाने धाडसी निर्णय घेतला. कॅन्सरच्या उपचारांमुळे तिच्या खाण्यापिण्यावर अजूनही बरीच बंधनं आहेत. तिला तिखट अजिबात चालत नाही, त्यामुळे तिचं जेवण वेगळं बनवावं लागतं. याच सगळ्या कारणांमुळे, ती हा ट्रेक पूर्ण करू शकेल की नाही, अशी रास्त काळजी घरच्यांना वाटत होती. पण निहाचा निश्चय मात्र पोलादी होता.

या प्रवासाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन एखाद्या तत्त्वज्ञासारखा, पण अंगावर काटा आणणारा आहे. ती अतिशय शांतपणे सांगते, "या ट्रेकमध्ये मला असा काही वेगळा संघर्ष करावा लागला नाही. जेवढा संघर्ष मी कॅन्सरशी लढताना केलाय, त्यापुढे हे खरंच काहीच नाही. माझं एकच स्पष्ट मत होतं... आयसीयूच्या बेडवर आपण काही आपल्या मर्जीने गेलो नव्हतो. पण कळसूबाईला आपण आपल्या मर्जीने चाललोय. मग आपल्या मर्जीने निवडलेली गोष्ट तर आपण सहजच पार करू शकतो!"

निसर्गाचा अद्भुत थरार आणि काजव्यांची रात्र

२३ मे २०२६च्या शनिवारी पहाटे २ वाजता या थरारक ट्रेकला सुरुवात झाली. वाटेत दाट धुकं, अंगाला झोंबणारं थंड वारं आणि प्रचंड गारवा होता. आदल्या रात्री त्यांनी जो काजव्यांचा खेळ पाहिला, तो निहासाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखाच होता. "एका हिंदी गाण्यात जसे हिरवे काजवे चमकताना दाखवतात ना, तसं ते सगळं मला नेहमीच कम्प्युटराइज्ड (ग्राफिक्स) वाटायचं. पण जेव्हा मी खरंच माझ्या उघड्या डोळ्यांनी निसर्गाची ती चमचमती रोषणाई पाहिली, तेव्हा मी थक्कच झाले," ती अगदी उत्साहाने सांगते.

कळसूबाईच्या सर्वोच्च शिखरावरून तो उगवता सूर्य पाहताना, निहाला जणू स्वतःच्या आयुष्याचा नवा अर्थ गवसत होता. "कॅन्सरनंतरचं आयुष्य हे जास्त सुंदर आहे. मला कॅन्सर झाला, हे एका अर्थी वाईट नव्हतंच, तर ते माझ्या भल्यासाठीच होतं, याची मला तिथे जाणीव झाली. मी आतून किती कणखर आहे, हे मला या आजारानेच शिकवलं," असं ती मोठ्या अभिमानाने नमूद करते.

केवळ कळसूबाईच नव्हे, तर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि खोल अशी 'सांधण दरी' देखील तिने यशस्वीपणे पार केली. उंचच उंच कातळकडे आणि अरुंद दगडी वाटांमधून दोरीच्या साहाय्याने तिने हा अंगावर काटा आणणारा थरार प्रत्यक्ष अनुभवला.

सांगलीच्या टीमची भक्कम साथ

ही संपूर्ण मोहीम सांगलीच्या 'भ्रमंती एक्सप्लोरर्स अँड ट्रेकर्स'तर्फे सुदर्शन चोरगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. निहाच्या या दुर्दम्य जिद्दीला सुदर्शन सरांनी दिलेल्या "तुम्ही हे नक्की करू शकाल, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात," या शब्दांनी मोठं बळ दिलं.

या साहसी मोहिमेत तब्बल १४ महिला, ३ विद्यार्थी आणि ७ पुरुष सहभागी झाले होते. ट्रेकसोबतच या मोहिमेतून 'प्लास्टिकमुक्त भ्रमंती'चा मोलाचा सामाजिक संदेशही देण्यात आला.

नवीन आयुष्याची सुरुवात...

"महाराष्ट्राचं हे सर्वोच्च शिखर सर करताना माझ्या मनात दाटून आलेल्या भावना व्यक्त करायला मला शब्द सुचत नव्हते. हा ट्रेक माझ्यासाठी नव्या आयुष्याची आणि जिद्दीची एक नवी सुरुवात होती. तिथून दिसणारं ते डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य मी जगले. आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे ते सर्वांनी अगदी भरभरून जगलं पाहिजे," निहा आत्तारने दिलेला हा साधासोपा संदेश प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देणारा आहे.

कॅन्सरने हिरावून घेऊ पाहिलेलं तिचं आयुष्य तिने परत तर मिळवलंच शिवाय त्याच आयुष्याला तिने आज थेट कळसूबाईच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे!


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter