'आमचे राष्ट्रीय हित सर्वप्रथम!'; रशियन तेलाच्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेला ठणकावले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

 

भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पुनरुच्चार करत, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे की, भारत कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही आणि राष्ट्रीय हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. रशियन तेलाच्या खरेदीवरून अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना "अन्यायकारक" ठरवत, जयशंकर यांनी भारताची भूमिका ठामपणे मांडली.

कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना एस. जयशंकर यांनी भारताच्या कणखर भूमिकेचे दर्शन घडवले. ते म्हणाले, "अमेरिकेसोबत आमचे काही व्यापारी मतभेद असले तरी, आम्ही आमचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी कटिबद्ध आहोत. रशियन तेलाच्या खरेदीवरून भारताला लक्ष्य करणे योग्य नाही, कारण इतर अनेक देशही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत."

जयशंकर यांनी सांगितले की, भारत हे प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेसोबत सक्रियपणे चर्चा करत आहे, पण ही चर्चा समानतेच्या पातळीवर होईल. "अमेरिकेसोबत व्यापारी करार करणे भारतासाठी महत्त्वाचे आहे, पण हा करार असा असायला हवा, जिथे आमच्या अंतिम मर्यादांचा (रेड लाईन्स) आदर केला जाईल. काही गोष्टींवर तडजोड केली जाऊ शकत नाही," असे त्यांनी निक्षून सांगितले.

यावेळी त्यांनी भारताची भूमिका केवळ ऊर्जा सुरक्षेपुरती मर्यादित नसून, देशातील शेतकरी आणि लहान उद्योगांचे हित जपण्याशीही जोडलेली असल्याचे स्पष्ट केले. जयशंकर यांच्या या वक्तव्याने, जागतिक राजकारणात भारत आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देत एक आत्मविश्वासपूर्ण आणि स्वतंत्र भूमिका बजावत असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.