भारत बनणार नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका सभेत शेतकऱ्यासोबत संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका सभेत शेतकऱ्यासोबत संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे एका जाहीर सभेत भारताच्या कृषी क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र मांडले. "भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र (Global Hub) बनण्याच्या मार्गावर आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या ११ वर्षांत कृषी क्षेत्रात मोठे बदल झाले असून, कृषी निर्यात जवळपास दुप्पट झाल्याचा दावाही त्यांनी केला.

पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी 'पीएम-किसान सन्मान निधी'चा (PM-Kisan Samman Nidhi) २१ वा हप्ता जारी करण्यात आला. एकाच क्लिकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली.

"NASA सोडून शेती करणारा तरुण भेटला!"

या कार्यक्रमापूर्वी, पंतप्रधान मोदींनी 'दक्षिण भारत नैसर्गिक शेती परिषदे'चे (South India Natural Farming Summit) उद्घाटन केले आणि तेथील प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीचा अनुभव सांगताना ते खूप भारावून गेले होते.

ते म्हणाले, "मी प्रदर्शन पाहत होतो. तिथे मला अनेक शेतकऱ्यांशी बोलण्याची संधी मिळाली. कोणाचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले आहे, कोणी पीएचडी केली आहे आणि त्यानंतर शेती करत आहे. एकजण तर चक्क नासा (NASA) सोडून शेती करत आहे! ते अनेक तरुणांना तयार करत आहेत, प्रशिक्षण देत आहेत. मी हे जाहीरपणे सांगतो की, जर मी आज या कार्यक्रमाला आलो नसतो, तर माझ्या आयुष्यात मी खूप काही गमावले असते. आज इथे येऊन मी खूप काही शिकलो आहे."

तरुणाईचा शेतीकडे कल

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील शेतीचे चित्र बदलत आहे आणि तरुण आता शेतीकडे एक आधुनिक आणि विस्तारण्यायोग्य  करिअर म्हणून पाहत आहेत. "आमची जैवविविधता नवे रूप घेत आहे. यामुळे देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल," असे ते म्हणाले.

"जमीन वाचवायची असेल तर..."

वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. "अलिकडच्या वर्षांत शेती उत्पादनांची मागणी वाढल्याने रसायनांचा वापरही वाढला आहे. परिणामी, जमिनीची सुपीकता कमी होत आहे आणि शेतीचा खर्च वाढत आहे. यावरचा उपाय पीक वैविध्य (crop diversification) आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करणे हाच आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

मुलींच्या फलकाचे कौतुक

भाषणादरम्यान एक रंजक प्रसंग घडला. दोन विद्यार्थिनी पंतप्रधानांचे कौतुक करणारे फलक (placards) फडकावत होत्या. हे पाहताच पंतप्रधानांनी सुरक्षा रक्षकांना ते फलक आपल्याकडे आणण्यास सांगितले आणि त्या विद्यार्थिनींचे कौतुक केले.

या परिषदेत तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ५०,००० हून अधिक शेतकरी, वैज्ञानिक आणि विक्रेते सहभागी झाले आहेत.