भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम

 

भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी सांगितले. सुब्रह्मण्यम यांनी नमूद केले की, “आज आपण चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आपली अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलरची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीचा हवाला देत सुब्रह्मण्यम म्हणाले की, "भारत आता जपानपेक्षा मोठा आहे. २०२४ पर्यंत भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आपल्यापेक्षा मोठे आहेत. नियोजित धोरणे आणि विचारपूर्वक पावले उचलली, तर पुढील अडीच-तीन वर्षांत आपण तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू."

आयएमएफने एप्रिलमध्ये प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक अहवालात म्हटले होते की, "२०२५ मध्ये भारत ४.१९ ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारत जपानपेक्षाही पुढे असेल."

आयएमएफने नमूद केले की, "भारताचा नाममात्र जीडीपी २०२५ (आर्थिक वर्ष २६) मध्ये ४.१८७ अब्ज डॉलर असेल, जो जपानच्या अंदाजित ४.१८७ अब्ज डॉलरपेक्षा किंचित जास्त आहे." आयएमएफच्या आकडेवारीनुसार, भारताचे दरडोई उत्पन्न २०१३-१४ मधील १,४३८ डॉलरवरून २०२५ मध्ये दुप्पट होऊन २,८८० डॉलर झाले आहे.

आयएमएफच्या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, भारतीय अर्थव्यवस्था २०२५-२६ मध्ये ६.२ टक्क्यांनी वाढेल. यंदाची अर्थव्यवस्था यापूर्वीच्या ६.५ टक्के अंदाजापेक्षा कमी आहे. याचे कारण जागतिक अनिश्चितता आणि वाढलेले व्यापारी तणाव आहेत.

आयएमएफच्या म्हणण्यानुसार, “भारतासाठी वाढीचा दृष्टिकोन २०२५ मध्ये ६.२ टक्क्यांसह तुलनेने स्थिर आहे. ग्रामीण भागातील खासगी वापरामुळे ही वाढ समर्थित आहे." अहवालानुसार, जागतिक वाढ २०२५ मध्ये २.८ टक्के असेल. यापूर्वीच्या अंदाजापेक्षा ०.५ टक्के कमी आहे. २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ३ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.