परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
"आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन न करणाऱ्या भारतासारख्या देशांना अन्यायकारकपणे लक्ष्य केले जाऊ नये," अशा कठोर शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले आहे. युक्रेन युद्धाच्या संदर्भात भारतावर केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जयशंकर यांनी भारताची भूमिका ठामपणे मांडली आणि शांततापूर्ण चर्चेचे आवाहन केले.
अमेरिकेने भारताच्या रशियासोबतच्या तेल व्यापारावरून कठोर व्यापारी शुल्क लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर, एका कार्यक्रमात बोलताना एस. जयशंकर म्हणाले, "ज्या देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्यांनी केले नाही, त्यांना अन्यायकारकपणे लक्ष्य करणे योग्य नाही."
एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, "भारत युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या विरोधात आहे आणि आम्ही नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे समर्थन केले आहे. आमचा विश्वास आहे की, कोणतीही हिंसक कारवाई किंवा संघर्ष कोणाच्याही हिताचा नाही."
भारताच्या रशियासोबतच्या संबंधांवर बोलताना ते म्हणाले की, "आमचे रशियासोबतचे संबंध अनेक दशके जुने आहेत आणि ते स्थिर राहिले आहेत. आम्ही आमच्या सर्व भागीदार देशांसोबतचे संबंध जपण्याचा प्रयत्न करत आहोत."
त्यांच्या या विधानामुळे, भारत कोणत्याही बाह्य दबावापुढे झुकणार नाही आणि आपले परराष्ट्र ध- ोरण स्वतंत्रपणेच ठरवेल, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.