भारतीय अधिकाऱ्यांनी सौदीला भेट देऊन घेतला हज यात्रेच्या तयारीचा आढावा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 16 d ago
सौदी अरेबियामध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाचे मुख्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर कुमार आणि संयुक्त सचिव सीपीएस बक्षी यांचे स्वागत करताना सौदीचे अधिकारी.
सौदी अरेबियामध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाचे मुख्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर कुमार आणि संयुक्त सचिव सीपीएस बक्षी यांचे स्वागत करताना सौदीचे अधिकारी.

 

हजयात्रा म्हणजे इस्लाममधील तीर्थयात्रा. पात्र मुस्लिमांना आयुष्यात एकदातरी मक्केत जाऊन पाच दिवसांची ही यात्रा करणे आवश्यक असते. भारतातून दरवर्षी लाखो भाविक ही यात्रा करतात. यावर्षी भारताकडून १,७५,०२५ लाख भाविक हजयात्रेसाठी मक्का येथे जाणार आहेत. 

भारतीय हज यात्रेकरूंसाठी केद्र सरकारकडून अनेक सोयी सुविधा देण्यात येतात.  सोबतच सौदी अरेबियात गेल्यावर भारतीयांची यात्रा सुखकर व्हावी यासाठीदेखील सरकार प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून अल्पसंख्याक मंत्रालयाचे मुख्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर कुमार आणि संयुक्त सचिव सीपीएस बक्षी यांनी नुकतीच सौदी अरेबियाला भेट दिली. हज यात्रेच्या तयारीचा सखोल आढावा घेऊन भारतीय हज यात्रेकरूंना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांना सगळ्या सोयी मिळतील याची काळजी घेणे हा या भेटीचा उद्देश होता.

या वर्षी हज कधी 
२०२५ वर्षाची हज यात्रा जूनच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. इस्लाम मधील हज ही महत्त्वाची यात्रा आहे. ही यात्रा पाच दिवस चालते. हजयात्रा सौदी अरेबियातल्या मक्का शहरात होते. जगभरातून लाखो मुस्लिम लोक त्याठिकाणी एकत्र येतात.  इस्लामच्या पाच मुख्य कर्तव्यापैकी हज एक आहे. ही यात्रा इस्लामच्या कॅलेंडरच्या बाराव्या महिन्यात( अल-हिज्जा) महिन्यात होते. 

हज यात्रेकरूंना भारताकडून कोणत्या सुविधा 
भारत सरकार हज यात्रेकरूंना चांगल्या सोयी देण्यासाठी काम करत आहे. सरकारने एक खास अ‍ॅप बनवलं आहे. या अ‍ॅपचे नाव हज सुविधा अ‍ॅप 2.0 आहे. या अ‍ॅपमुळे यात्रेकरूंना विमानाची माहिती, मीना इथल्या जागांचा नकाशा आणि आरोग्याच्या टिप्स मिळणार आहेत. तसेच मक्का आणि मदिना इथे राहण्यासाठी चांगली जागा मिळेल. यामध्ये लिफ्ट आणि हरमच्या जवळ राहण्याची सोय आहे. प्रवासासाठी नवीन आणि आरामदायी बस दिल्या जाणार आहेत. हज यात्रेकरूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास डॉक्टर आणि मदतनीस नेमले आहेत. यामध्ये १५० यात्रेकरूंमागे एक मदतनीस असणार आहे. 

सौदी अरेबियाने हज २०२५ साठी भारताला १,७५,०२५ चा कोटा दिला आहे.. यातले ७० टक्के  लोक हज कमिटी ऑफ इंडियामार्फत जातील. तर ३० टक्के लोक खासगी हज ग्रुपमधून जातील.
  
हज ही इस्लाममधली सर्वात मोठी आणि पवित्र यात्रा आहे. ती मुस्लिम लोकांना एकत्र आणते. मक्केतल्या काबा इथे सगळे एकसारखे पांढरे कपडे घालून प्रार्थना करतात. हज यात्रेदरम्यान यात्रेकरू अनेक धार्मिक कृती करतात यामध्ये अराफातच्या मैदानात प्रार्थना, मीना इथे राहणं आणि काबाभोवती प्रदक्षिणा करणं. ही यात्रा मन शुद्ध करते.

हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी जानेवारी महिन्यात सौदी अरेबियाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी २०२५ च्या हजसाठी करार केला होता. त्यांनी जेद्दा आणि मदिनातल्या हजसाथीच्या तयारीचा आढावा घेतला होता. यावेळी सौदी अधिकाऱ्यांशी बोलून भारतीय यात्रेकरूंना चांगल्या सोयी देण्यावर लक्ष दिलं.  

हज यात्रा ही फक्त धार्मिक यात्रा नाही तर भारत आणि सौदी अरेबियामधल्या मैत्रीचं एक उदाहरण आहे. भारत सरकारने यंदा केलेली तयारी पाहता भारतीय यात्रेकरूंना चांगला अनुभव मिळण्याची शक्यता आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter